पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना देवडीग्रामस्तांनी हाकलून लावले
अगोदर दुष्काळ आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पुरता नाडला गेला.ही झाली अस्मानी..आता सुलतानीचा अनुभव राज्यातील शेतकरी घेत आहेत.नुकसानीचे पंचनामे हा फार्स सध्या राज्यात सुरू आहे.शंभर टक्के नुकसान झाले असल्यानं नुकसान भरपाई देखील गाव घटक धरून मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.त्याला शासकीय यंत्रणा आणि विमा कंपन्या कशी बगल देत आहेत याचं उत्तम उदाहरण आज आमच्या बीड जिल्हयातील देवडी या गावातच बघायला मिळालं.वडवणी तालुक्यातील अनेक गावात ऑगस्टपर्यंत पाऊस झाला नव्हता.त्यामुळं खरीपाची पिकं जळून गेली.सोयाबीनची देखील हीच अवस्था झाली.त्यामुळं शेतकर्यांनी त्यावर आौत फिरविले आणि ही वस्तुस्थिती कृषी विभागाला कळविली होती.त्यानंतर कृषी विभागानं देवडी गावच्या पंचक्रोशीतील गावांची पीक पाहणी करून तो अहवाल तहसिलदार वडवणी यांना 06-08-2019 रोजी लेखी स्वरूपात कळविला होता.या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की,’देवडी,वडवणी,कान्हापूर,मामला,लक्ष्मीपूर,ढोरवाडी,साळिंबा,पिंपरखेड,कवडगाव,हरिश्चंद्र पिंपरी,या गावांची शिवार पाहणी केली असता असं निदर्शनास आलंय की,या गावातील शेतकर्यांनी खरीप हंगामात लागवड केलेल्या दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्रफळावरील खरिपाची पिके जळून गेली आहेत,पीक परिस्थिती अतिशय गंभीर आहेत.आठ दिवसात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे ‘ हा अहवाल तहसिलदारांना गेल्यानंतरही दहा दिवसात पाऊस झाला नाही..त्यामुळं पीकं जळून गेली हे वास्तव आहे.सोयाबीन,कपाशी व अन्य पिकांचा त्यात समावेश आहे.
नंतर अतिवृष्टी झाली.राहिलेली पिकं त्यात वाहून गेली.आता सरकारनं आदेश दिल्यानुसार कृषी विभागाचे अधिकारी देवडी गावात पंचनामे करण्यासाठी आले होते.पंचनामे करताना नुकसानीचे फोटो काढून पाहिजेत असा आग्रह ते धरत होते.सोयबीनसह अनेक पिकं दुष्काळातच जळून गेलेली असल्यानं आणि त्यावर शेतकर्यांनी पाळ्या घालून त्या जमिनी रब्बीसाठी तयार केलेल्या असल्यानं नुकसान झालेल्या सोयाबीनचे फोटो कोढून काढणार ? पिकाचं नुकसान झालंय काही पिकांचं दुष्काळानं तर काही पिकाचं अतिवृष्टीनं ..नुकसान मात्र झालंय.जूनमध्येच शेतकर्यांनी पिकांचे विमे भरलेले आहेत आणि आज सरकार विचारतंय नुकसान झालेली पिकं आहेत कुठं. ? हा सारा भंपकपण आहे। . स्पष्ट असं दिसतंय की,सरकारच्या नियतीतच खोट आहे.विमा कंपन्यांना वाचविण्यासाठी सरकार ही सारी नाटकं करीत आहे.ही बाब लक्षात आल्यानंतर देवडीकरांनी पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना हाकलून लावले..सरसकट नुकसान भरपाई द्यावी,सरकारनं आता जास्त शेतकर्यांचा अंत पाहू नये..अन्यथा शेतकर्यांचा उद्रेक झाला तर राज्यात मोटीच अशांतता निर्माण होईल हे नक्की.