———————————————————
मुंबईतील अंधेरी भागात एका वाहिनीच्या महिला पत्रकाराच्या विनयभंगाची घटना तसेच तिच्या बरोबरच्या छायाचित्रकारास झालेल्या मारहाणीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तीव्र शब्दात निषेध करीत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहे.
समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकार म्हटले आहे की, अगोदर एका महिला पत्रकारावर झालेला सामुहिक अत्याचार,त्यानंतर एका हॉटेलात मुंबईतील एका सायंदैनिकाच्या चार महिला पत्रकारांशी केली गेलेली असभ्य वागणूक आणि चार दिवसांपूर्वीच बंगलोरमध्ये एका मंत्र्याने महिला पत्रकारास विवस्त्र कऱण्याचा केलेला प्रयत्न या साऱ्या घटना संतापजनक आणि पत्रकारिता करणे केवळ पुरूषांसाठीच नव्हे तर स्त्रियांसाठीही किती कठिण होत चालले आहे याचा प्रत्यय आणून देणाऱ्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता तरी जास्त अंत न बघता महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा केला पाहिजे .
अंधेरीतील ताज्या घटनेतील पाच आरोपींना अटक करण्यात आली असली तरी आणखी काही आरोपी फरार आहेत.त्यांनाही तातडीने अटक झाली पाहिजे अशी मागणी करतानाच गृहमॅंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशी मागणीही एस.एम.देशमुख यांनी केली आङे.