शाळेत असताना शाळेच्या सहलीबरोबर धारूरचा किल्ला पाहण्याचा योग आला होता.त्या घटनेला आज 40 वर्षे तरी उलटून गेली असतील.नंतरच्या आयुष्यात असंख्य वेळा धारूरवरून जाणं-येणं व्हायचं मात्र मुद्दाम किल्ला पाहण्याचा योग आला नाही. नव्यानं किल्ला पाहण्याची ओढ मात्र कायम असायची.परवा केजला एका कार्यक्रमास जात असताना तो योग आला आणि तब्बल दोन तास घालवून धारूरचा किल्ला मनसोक्त पाहिला.साध्या दगडांवर दगड ठेऊन हा किल्ला बांधला गेला आहे.आजही भक्कम आणि प्रशस्त असा हा किल्ला आहे.अगदी धारूरला चिकटूनच पश्‍चिमेला इतिहासातील हा वैभवशाली वारसा आजही बर्‍या पैकी सुस्थितीत उभा आहे.लौकीक अर्थानं हा भुईकोट असला तरी खर्‍या अर्थानं हा मिश्रकोट आहे.किल्ल्याची रचना अशी आहे की,सहजा सहजी किल्ला शत्रूच्या हाती पडणार नाही.तीन बाजुंनी खंदक आहेत.त्यात पाणी सोडलेले असायचे.या खंदकावर उचलता येणारा एक दरवाजा असायचा.हा दरवाजा काढून घेतला की,किल्ल्यात जाणं-येणं बंदच व्हायचं.कारण किल्लच्या चौथ्या बाजुला खोलच खोल दरी आहे.त्यामुळं एक प्रकारे हा किल्ला अभेद्यच होता.सातवाहनच्या काळापासून धारूरची ओळख संपन्न बाजारपेठ अशीच होती.राष्ट्रकुटांनी धारूरचं महत्व लक्षात घेऊन धारूरच्या पठारावर महादुर्ग बांधला.मात्र नंतरच्या काळात चालुक्य,देवगिरीचे यादव आदिलशाही,अहमदनगरचा निजाम आदि राजवटींची या किल्ल्यावर सत्ता राहिली.1795 च्या खर्ड्याच्या लढाईनंतर काही काळ हा किल्ला मराठ्यांकडं देखील होता.मात्र नंतर हा किल्ला हैदराबादच्या निजामाकडं गेला आणि तो स्वातंत्र्यापर्यंत निजामाच्याच ताब्यात राहिला.आदिलशाहीच्या ताब्यात हा किल्ला जेव्हा आला तेव्हा आदिलशाहीचा सेनापती किश्‍वरखान याने या किल्लची पुनर्बांधणी केली.तो नव्यानं उभा केला.मात्र नंतर हा किश्‍वरखान मारला गेला.अहमदनगरचा निजाम मुर्तुजाने किल्ल्याचे आणि शहराचे नाव बदलून ते फतेहबाद ठेवले.याच नावाने नंतर अनेक दिवस धारूर ओळखले जायचे.मोगलांचा सेनापती आझमखानने नंतर किल्ल्यात टांकसाळ सुरू केली.टाकसाळ बुरूज आजही चांगल्या स्थितीत बघायलो मिळतो.जिथं नाणं पाडलं जायचं त्या इमारतीत कोणालाही जाता येणार नाही अशी भक्क्म व्यवस्था या बुरूजाची आहे.किल्ल्यात सोलापूर दिंडी आणि खारी दिंडी असे दोन तलाव होते.असं सांगतात की,या तलावातला पाणी अगदी परवा परवा पर्यंत धारूरच्या जनतेला प्यायला दिलं जायचं.आज मात्र हे पाणी वापरलं जात नाही.किल्ल्याच्या समोरून जो खंदक होता तो ही आजही बुजला गेला असला तरी किल्ल्याची तटबंदी आजही साबूत आहे.महाव्दाराची रचना मुरूड जंजिर्‍याच्या किल्ल्यासारखी आहे.म्हणजे जवळ गेल्याशिवाय दरवाजा कोठे आहे याचा थांगपत्ता लागत नाही.शत्रूंवर पाळत ठेवण्यासाठीची व्यवस्था,निवास व्यवस्था,बैठक व्यवस्था,स्नानगृह अशा इतर किल्ल्यांमध्ये जशा व्यसस्था असतात तशा सार्‍या सुखसोयी या किल्लतही होत्या हे आजही दिसते आहे.थोडक्यात एक भक्कम-मजबूत असा हा किल्ला आहे.परंतू मराठवाडयाप्रमाणंच हा किल्लाही उपेक्षित,दुर्लक्षित आणि अज्ञानवासात राहिला आहे.धारूरचा उल्लेख किल्ले धारूर असा केला जातो.म्हणजे या ठिकाणी किल्ला आहे हे  समजत असले तरी बीड जिल्हयातील किती लोकांनी हा किल्ला पाहिला असेल याबद्दल मी साशंक आहे.बीडचे पर्यटक कोकणात जातात आणि मराठवाडयाच्या बाहेर असणार्‍यांना मराठवाडयात काही पाहण्यासारखं आहे हेच मान्य होत नाही.अजिंठा-वेरूळ,देवगिरीचा किल्ला,बिबी का मकबरा या खेरीज मराठवाडयात पाहण्यासारखं काहीच नाही असंच मराठवाडयाबाहेरच्या पर्यटकांना वाटतं.त्यामुळं मराठवाडयाकडं पर्यटनवाढीच्या दृष्टीनं कधी विचारच झाला नाही.त्यामुळं धारूरच्या किल्ल्याला दररोज शंभर पर्यटक देखील भेट देत नाहीत ही शोकांतिका म्हणावी लागेल.

दुष्काळी टुरिझमचा प्रदेश अशीच मराठवाडयाची ओळख झालेली आहे.दुष्काळाशिवायही आमच्याकडं अनेक गोष्टी आहेत की,पुण्या-मुंबईच्या पर्यटकांनी मुद्दाम यावं आणि त्या पाहाव्यात.नळदुर्ग किल्ला,कंधारचा किल्ला ही त्यापैकी काही उदाहरणं .अगदी बीडचं कंकालेश्‍वर मंदिर देखील एक वास्तुकलेचा अनोखा आविष्कार आहे.परंतू हे सारं वैभव बाहेर माहितीच नाही.ते माहिती करून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नही कोणी केलेला नाही.मुरूड जंजिरा किंवा माथेरानची आज जी ख्याती सर्वदूर पसरली आहे त्यामध्ये मिडियाचा मोठा वाटा आहे.सातत्यानं तिथलं बातम्या,तिथला निसर्ग लोकांपर्यत पोहोचविण्याचं काम स्थानिक पत्रकारांनी केलं आहे हे मी स्वतः अनुभवलं आहे.मराठवाडयातही हे व्हायला पाहिजे.आमच्याजवळ बघण्यासारखं काय आहे हे आम्हालाही माहित नसेल तर पर्यटकांनी मराठवाडयात येऊन इथलं ऐतिहासिक,धार्मिक वैभव पाहावं अशी अपेक्षा तरी कशी करणार ? रायगड,प्रतापगडावर सहली घेऊन जाणार्‍या मराठवाडयातील शाळांनी या दौर्‍यात धारूर,नळदुर्ग आणि इतर ठिकाणांचा अंतर्भाव का करू नये ? याचं मला नेहमी आश्‍चर्य वाटतं.मराठवाडयात रस्ते नाहीत,दळणवळणाची साधनं नाहीत म्हणून पर्यटक मराठवाडयात येत नाहीत हे रडतराऊंसारखं आहे.कारण मुरूड जंजिर्‍याला जायला आजही धड रस्ता नाही,माथेरानचा डोंगर चढून तीन किलो मिटर तर चालत जावं लागतं ( आज माथेरानची राणी आहे पण ती मध्यंतरी एक-दीड वर्षे बंदच होती ) तरीही पर्यटक तिकडे जात असतील आणि आपल्याकडं येत नसतील  तर आपलं काही तरी चुकतंय हे नक्की..

धारूरपुरतंच बोलायचं तर हे आडमार्गावरचं गाव आज मुख्य रस्त्यावर आलं आहे.पंढरपूरःखामगाव हा महामार्ग धारूरचा चेहरा-मोहराच बदलून टाकणारा ठरला आहे.बीड जिल्हयात इतरही नऊ महामार्गांचं काम सुरू आहे..नगर-बीड हे अंतर आता दोन तासापेक्षाही कमी वेळात पार करणं शक्य होत आहे.बीड -सोलापूर,बीड-औरंगाबाद,बीड-नांदेड,बीड औरंगाबाद हे रस्ते आता अंतिम टपप्यात आहेत.मात्र हे बदल पुण्या-मुंबईच्या पर्यटकांच्या कानावर घालावे लागतील.त्यासाठी सरकार एवढीच जबाबदारी स्थानिक माध्यमांची देखील आहे.तसेच पर्यटनस्थळांवर विविध उपक्रम राबविणे हे देखील स्थानिक नगरपालिकांनी केलं पाहिजे.जंजिरा महोत्सव,अलिबाग महोत्सव,माथेरान महोत्सव साजरे करून तिकडं पर्यटकांना आकर्षित केलं जातंय.त्याच धर्तीवर आपल्यालाही महोत्सवांचं आयोजन करावं लागेल.धारूरचे पत्रकार मित्र अनिल महाजन,साकीर,सोनटक्के आदि पत्रकार किल्ल्या पाहतांना माझ्या समवेत होते.त्यांनी किल्ला महोत्सवाची संकल्पना बोलून दाखविली आहे.त्याचं स्वागत केलं पाहिजे.स्थानिक नागरिकांनीही यात रस दाखविला पाहिजे.कारण पर्यटक वाढले तर गावात आर्थिक सुबत्ता येते,व्यापार-उदीप भरभराटीस येतो हे अनेकदा सिध्द झालं आहे.असं झालं तर मराठवाडयातील जनतेचं शेतीवरील अवलंबित्व अपोआप कमी होईल आणि येथील जनतेला उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत तयार करता येतील.हे नक्की.दुष्काळावर मात करण्याचा हा देखील एक उपाय होऊ शकतो यात शंका नाही.

एस.एम.देशमुख 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here