सरकारी वृत्तवाहिनी ‘दूरदर्शन’ अर्थात ‘डीडी’ आपला लोगो नव्या रूपात सादर करणार आहे. यासाठी सर्व भारतीयांना संधी देण्याची योजना डीडीने आखली आहे. सध्याचा दूरदर्शनचा लोगो हा ५८ वर्षे जुना लोगो आहे. त्यामुळे आता नव्या लोगोसाठी स्पर्धा घेण्याचे डीडीने जाहीर केले आहे. यासाठी तब्बल १ लाख रूपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

डीडीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दूरदर्शनच्या लोगोसोबत अनेक वर्षांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. खासगी वाहिन्यांच्या तुलनेत तरूणांच्या नव्या पिढीला याच्याशी जोडले जाणे आवश्यक आहे. यासाठीच डीडी आता नवा लोगो आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी डीडी सर्व भारतीयांना या स्पर्धेसाठी आंमत्रित करीत आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला १३ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यासाठी एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची एकच प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच ही स्पर्धा जिंकल्यानंतर संबंधीत व्यक्ती किंवा संस्थेला आपल्या लोगोच्या डिझाइनवर कॉपीराईटचा अधिकार ठेवता येणार नाही. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दूरदर्शनच्या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दूरदर्शनने अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. ज्या काळात खासगी वाहिन्यांचा उगमही झाला नव्हता. त्या काळात ‘महाभारत’, ‘रामायण’, ‘मालगुडी डेज’, ‘ब्योमकेश बक्षी’, ‘देख भाई देख’, ‘फौजी’, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, ‘हम लोग’, ‘उडाण’, ‘तहकीकात’, ‘बुनियाद’, ‘नुक्कड’, ‘वागले की दुनिया’, ‘द जंगल बुक’, ‘शक्तिमान’ आणि अनेक मालिकांनी देशभरातील जनतेचे मनोरंजन केले होते. त्यामुळे यांच्या आठवणी अजूनही लोकाच्या मनात ताज्या आहेत.

— लोकसत्तावरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here