दिल्लीच्या वैभवात भर घालणारं ‘आपलं महाराष्ट्र सदन’ 

0
1073

दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाला महाराष्ट्रात जेवढी निगेटीव्ह प्रसिध्दी मिळाली तेवढी काही वाईट स्थिती महाराष्ट्र सदनाची नक्कीच नाही.बांधकामात कोणी किती मलिदा लाटला या वादाबद्दल मी इथं sadan-2बोलत नाही.ज्यांनी हातमारी केलीय त्यांना कायद्यानं काय शिक्षा व्हायची ते होईल पण मला चर्चा करायची आहे ती महाराष्ट्र सदनाच्या दुसर्‍या बाजुची,जी की आतापर्यंत लोकांच्या समोर आलेलीच नाही.महाराष्ट्राची पत आणि प्रतिष्ठा वाढविणारी आणि दिल्लीच्याही वैभवात भर घालणारी आपल्या महाराष्ट्र सदनाची इमारत दिल्लीत दिमाखानं उभी आहे असं माझं मत  ही वास्तू पाहिल्या- पाहिल्या झालं.अन्य बाबींबद्दलही ज्या पध्दतीनं नाकं मोडली गेली तसंही काही जाणवलं नाही.

महाराष्ट्र सदन मराठीतच बोलते.म्हणजे सारे कर्मचारी मराठी भाषक आहेत.स्वागतही मराठी भाषेतच होतं.त्यामुळं आपण दिल्लीत आहोत की पुण्यात असाही प्रश्‍न निर्माण होतो.महाराष्ट्रात कोणत्याही विश्रामगृहात गेलात तरी तेथे मिळणारी वागणूक संताप आणणारी,’आम्ही तुम्हाला खोली देतोय ते तुमच्यावर उपकारच करतो आहोत’ अशा पध्दतीची असते.महाराष्ट्र सदनात तसं दिसलं नाही.(  सुधीर मुनगंटीवारांना आलेल्या अनुभवानंतर परिस्थितीत सुधारणा झालेली असू शकते.ते काही असलं तरी आम्हाला आलेला अनुभव आमच्या सार्‍या गृहितकांना  तडा देणारा,म्हणूनच सुखद होता. ) अत्यंत आदबीनं स्वागत होतं.त्यामुळं तिथं बोलायला जागा नाही.इमारतीतील टापटीप,स्वच्छतेलाही मी शंभर पैकी शंभर मार्क देईल. कॅन्टीनमधील मराठी मेनूच्या चवीबद्दल नक्कीच तक्रार करता येऊ शकते,पण ते फार महत्वाचं आहे असं मला वाटत नाही.महाराष्ट्र सदनात ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत त्या क्वचितच राजधानीतील अन्य राज्याच्या भवनांमध्ये असतील .सदनात स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे.भव्य सभागृह आहे.विशेष म्हणजे ग्रंथालय आहे आणि त्यात चांगली मराठी पुस्तकंही आहेत.पत्रकार परिषदेसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि पत्रकारांसाठीही स्वतंत्र कक्ष आहे.खासदार समन्वय कक्ष,बॅक्क्वेट हॉल,डायनिंग हॉल,जिम्नॅशियम ,अत्यांवश्यक शॉपिंग कक्ष,जीवनावश्यक वस्तुंचे केंद्र,सास्कृतिक केंद्र ,क्लास रूम,अभ्यासिका,बिझनेस सेंटर सारख्या विविध सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत.स्वागत कक्षाला लागूनच असलेला भव्य हॉल तेथे असलेले यशवंतराव चव्हाण,सावित्रीबाई फुले यांचे पुतळे आणि येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधून घेणार्‍या भव्य दोन समया आणि या सर्वांची आकर्षक मांडणी या गोष्टी इमारतीच्या वैभवात नक्कीच भर घालतात.मराठी मुलखातीतील वैभव दाखविणार्‍या सुरेख पेंटिग्ज बहुतेक भिंतीवर आकर्षक पध्दतीनं लावलेल्या असल्याने इमारत अधिकच देखणी होते.हे सारं पहात असताना ,प्रत्यक्ष अनुभवत असताना आपण महाराष्ट्र सदनात आहोत की,दिल्लीतील एखादया पंचतारांकित हॉटेलमध्ये याबद्दल प्रश्‍न निर्माण होते. राज्यपाल,मुख्यमंत्री ,अन्य मंत्र्यांसाठी जे सुट आहेत ते बघायला मिळाले नाहीत मात्र सामांन्यांसाठी जे सुट आहेत त्यांची भव्यता पाहिल्यानंतर व्हीव्हीआयपींच्या कक्षाची कल्पना आपण नक्कीच करू शकतो.इतरांसाठी जे कक्ष आहेत ते प्रशस्त सर्व सुखसोयींनी युक्त असल्यानं रेस्ट हाऊसच्या आपल्या परंपरागत कल्पनेला नक्कीच येथे छेद बसतो,आणि एका देखण्या वास्तूत,प्रसन्न जागेत ,चांगल्या कक्षात राहिल्याचा आनंद आपण नक्कीच उपभोगू शकतो.

तब्बल 6.18 एकर परिसरात विस्तारलेल्या  महाराष्ट्र सदनाचे 1लाख 73 हजार 290 स्वेअर फूट बांधकाम झाले आहे . सदनात 138 कक्ष आहेत.मंत्री,आमदार आणि वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी राखीव असलेले कक्ष वगळता सामांन्य जनांसाठी 80 कक्ष उपलब्ध आहेत.यामध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचाही समावेश आहे.2 राखीव कक्ष अपंग व्यक्तींसाठीही आहेत. महाराष्ट्र सदन ज्या जागेत आज उभे आहे त्या जागेचा इतिहासही मोठा आहे.1970 चे 1999 असा तब्बल 29 वर्षे पाठपुरावा केल्यानंतर भारत सरकारने ही जागा ‘जशी आहे तशी’ या तत्वावर महाराष्ट सरकारला हस्तांतरीत केली.त्यानंतरचा काही काळ अतिक्रमणं हटविण्यात गेला.मग काही दिवस येथे छोटसं विश्रामगृह सुरू केलं गेलं.मात्र दिल्लीत महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय झाला आणि 12 डिसेंबर 2006 रोजी प्रत्यक्ष बांधकामास सुरूवातही झाली आणि  12 जुलै 2012 ला इमारत बांधून पूर्ण झाली.म्हणजे बांधकाम सहा वर्षे चालले . इमारतीची रचना महाराष्ट्रातल्या वाडा संस्कृतीसारखी आहे.त्यासाठी ढोलपुरी दगडांचा वापर केला गेला आहे.परिसरात कारंजे,परावर्तीत होईल असा मोकळा सूर्यप्रकाश,आणि सभोवताली नयनरम्य हिरवळ .महत्वाच्या ठिकाणी लॅन्डस्केप केलेले आहे.इमारत दिल्लीच्या ल्युटन झोनमध्ये असल्याने दोन पेक्षा जास्त मजले बांधण्याची अनुमती नाही.ही मर्यादा लक्षात घेत इमारत बांधली गेली आहे.रस्त्यावरूनच भव्य-दिव्य दिसणार्‍या या इमारतीच्या दर्शनी भागातच छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले यांचे भव्य पुतळे महाराष्ट्राच्या कर्तृत्वाची ,वैभवाची साक्ष देतात.

देशातील सर्वच राज्यांची आपली भवनं दिल्लीत आहेत.मात्र याबाबतीत आपण नंबर एक आहोत.अन्य कोणत्याही भवनापेक्षा आपलल्या  महाराष्ट्र सदनाची वास्तू  सर्वात भव्य ,देखणी ,सर्व सुविधांनी युक्त अशी आहे.दिल्लीत अनेक प्राचीन इमारती आहेत,उत्तुंग मनोरे आहेत,तेथे चित्तवधक कलाकुसरही बघायला मिळते.अशा या दिल्लीच्या वैभवात भर घालणारे महाराष्ट्र सदन आहे यात शंकाच नाही.मात्र या वास्तुला पहिल्यापासून या ना त्या कारणांनी नकारात्मक प्रसिध्दी मिळत गेली. त्यामुळं इमारतीबाबतची  दुसरी बाजू वाचकांसमोर आलीच नाही.त्यातून समज असा निर्माण झाला की,महाराष्ट्र सदन म्हणजे महाराष्ट्रात गावोगावी दिसणार्‍या विश्रामगृहाची ( रेस्ट हाऊस )सुधारित आवृत्ती असेल.मात्र प्रत्यक्ष अनुभवांती आपला हा समज नक्कीच खोटा ठरतो.कारण आपल्या सरकारी विश्रामगृहाबाबतच्या सर्व कल्पना कालबाहय ठरविणारी ही सरकारी वास्तू आहे हे नक्की.त्यामुळं दिल्लीत आपण कुठेही थांबलेले असा, मुद्दाम महाराष्ट्र सदनाला भेट द्यावी आणि ते जवळून पहावं अशी ही वास्तू आहे.

आम्ही चार दिवस महाराष्ट्र सदनात होतो,ही वास्तु पाहून आम्ही प्रभावित तर झालोच पण या भव्य नगरीत महाराष्ट्र सदनामुळे येणार्‍या मराठी माणसाची किती मोठी सोय झालीय याचीही जाणीव आम्हाला झाली .जे झालं ते झालं.ही वास्तु जपली पाहिजे याबाबत दुमत असू नये.,सरकार बदलल्यामुळं या वास्तूकडं उपेक्षेनंही पाहण्याची गरज नाही,वास्तुचं जतन व्यवस्थित व्हावं,जे अर्धवट प्रकल्प आहेत ते पूर्णत्वास न्यावेत आणि ही वास्तू कायमस्वरूपी अशीच देखणी,चकाकती राहिल याची काळजी घेतली जावी एवढीच अपेक्षा आहे,कारण दिल्लीत मराठी माणसाला थांबण्यासाठी एवढ्या स्वस्तात एवढी चांगली सोय अन्यत्र कुठेही होऊच शकत नाही.

शोभना देशमुख 

महाराष्ट्र सदन पत्ता

नवीन महाराष्ट्र सदन

कस्तुरबा गांधी मार्ग,कॅनॉटप्लेस,

नवी दिल्ली

दुरध्वनी क्रमांक -०११-२३३८०३२८

( महाराष्ट्र सदनासाठीचं बुकिंग मुंबईत मंत्रालयात केलं जातं )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here