पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत खामगावमध्ये गुन्हा दाखल
राज्यातील तीसरा तर विदर्भातील पहिला गुन्हा

मुंबईः पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत राज्यातील तीसरा गुन्हा आज बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथे दाखल झाला.राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर म्हणजे 8 डिसेंबर नंतर चार पत्रकारांवर हल्ले झाले.त्यात किनवट,जालना येथे नव्या कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले मात्र पिंपरीि-चिंचवडमधील पत्रकारावर झालेला हल्ला व्यक्तिगत कारणांवरून झालेला असल्याने पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला नाही.मात्र तीन गुन्हे दाखल झाल्याने पत्रकार संरक्षण कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होईल की नाही या चर्चेला विराम मिळाला आहे.ठिकठिकाणच्या पत्रकारांनी जागरूकता दाखवत नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल याची काळजी घेतल्याने पत्रकारांच्या एकजुटीचे पुन्हा एकदा राज्यात प्रत्यय  आला  आहे.

खामगाव येथील एका बेकायदेशीर फटाका दुकानावर कारवाई कऱण्यासाठी तहसिलदार आणि पोलिसांचे पथक घटनास्थळावर गेले होते.दुकानाला सील लावण्याची कारवाई सुरू असताना पत्रकार शिवाजी भोसले वृत्तसंकलनाचे काम करीत होते.आपल्या मोबाईलमधून ते शुटिंगही करीत होते.हे पाहून अग्रवाल फटाका केंद्राचे सुनील अग्रवाल,संगीत अग्रवाल आणि त्यांच्या सहकारयांनी पत्रकारास धक्काबुक्की करीत जिवे माऱण्याची धमकी दिली तसेच मोबाईलची मोडतोड केली.ही घटना एक जानेवारीची .या घटनेची तक्रार शिवाजी भोसले यांनी खामगाव पोलिसांत दिली.मात्र आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे आवश्यक होते.त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे,बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन आणि त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.यावेळी टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.पोलिस प्रमुखांनी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल कऱण्याचे आश्‍वासन दिले होते.त्यानुसार आज तीनही आरोपीं विरोधात प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि संस्था ( हिंसक कृत्य मालमत्तेचं नुकसान किंवा हानी प्रतिबंधक ) अधिनियम 2017 च्या कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास कायद्यातील तरतुदीनुसार डीवायएसपी प्रदीप पाटील करीत आहेत.हा गुन्हा अजामिनपात्र असून आरोपीवरोधात गुन्हा सिद्द झाला तर त्याला तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी खामगाव पोलिसांना धन्यवाद दिले असून पत्रकारांनी कुठेही हल्ला झाल्यास जागरूकपणे नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल याची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत..

.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here