पत्रकारितेलाच ‘गुडबाय’

1
935

शिर्डीच्या राजेंद्र भुजबळ यांनी पत्रकारितेला राम राम  का 

केला ?  डोळ्यात पाणी आणणारं वास्तव 

आज सकाळी  व्हॉटस अ‍ॅपवरील एक पोस्ट वाचून व्यथित  झालो.शिर्डीतील इलेक्टॉनिक मिडियाचे पत्रकार राजेंद्र भुजबळ यांची ती पोस्ट आहे.गेली बारा वर्षे राजेंद्र भुजबळ पत्रकारितेत सक्रीय आहेत.निःपक्ष आणि निर्भिडपणे पत्रकारिता करण्याबाबत त्यांचा शिर्डीत नावलौकीक आहे. याची शिक्षा त्यांना एकदा त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्तानं मिळाली होती.मात्र नंतरही ते घाबरले नाहीत। समाजकंटकांच्या विरोधात त्यांनी अनेक बातम्या दिल्यानंतर त्यांना जिवेमारण्याच्या धमक्या यायला लागल्या.दररोज हितसंबंधियांकडून होणार्‍या या त्रासामुळे ते आणि त्याचं सारं कुटुंब आज तणावाखाली आहे. स्वतः साडेतीनशे फुटाच्या घरात राहणार्‍या भुजबळ यांचं छोटसं कुटुंब आहे.घराचा आधारही तेच आहेत..सततच्या धमक्यानं त्रस्त झाल्यानं काल त्याच्या मुलानं जी सूचना आपल्या वडिलांनी केली ती पाहून कुणाच्याही डोळ्याच्या कडा ओल्या होतील.मुलगा म्हणतो, ‘पप्पा,पत्रकारिता सोडा,पाहिजे तर मी नोकरी करून घर चालवतो,तुम्ही आम्हाला हवे आहात ” अशी आर्त साद आपल्या वडिलांना घातल्यानंतर हतबल झालेल्या भुजबळ यांनी दोन्ही चॅनलचा राजीनामा काल पाठवून दिला आहे.आज पत्रकार सहकार्याब्ददल ऋुण व्यक्त करणारी पोस्ट त्यांनी टाकली .भुजबळ यांची व्यथा ही खरं तर प्रातिनिधीक आहे.महाराष्ट्रात विरोधात बातम्या दिल्यात म्हणून पत्रकारांवर हल्ले होतात,मालकांवर दबाव आणून त्यांच्या नोकर्‍या घालविल्या जातात,खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि आता सातत्यानं धमक्या देऊन त्यांनी पत्रकारिता सोडूनच जावे असे वातावरण तयार केले जात आहे.शंकर साळुंकेवर मानसिक आघात झाल्याची पोस्ट मी टाकली तेव्हा एका मित्राने पत्रकारांनी मानसिकदृष्टया एवढं दुबळं असून चालत नसल्याचे तत्वज्ञान पाजळले होते.राजेंद्र भुजबळ यांच्या निर्णयाच्या बाबतीतही काही जण त्यांना भेकड म्हणून संबोंधतील मात्र राजेंद्र भुजबळ भेकड नाहीत.सकाळी मी त्यांना बोललो.त्यांनी मी कुणाला घाबरत नाही असे मला सांगितले.पण कुटुंब म्हणूनही काही जबाबदार्‍या असतात,आपण करीत असलेल्या कामामुळे कुटुंब स्वास्थ्यच बिघडत असेल तर त्या कामाला हट्टापायी चिकटून राहण्यातही अर्थ नसतो असं त्याचं म्हणणं आहे त्यामुळे मी पत्रकारितेलाच रामराम करतोय असं त्यानी सांगितलं।त्यांची ही भूमिका कोणालाही मान्य करावी लागेल अशीच आहे.कारण आपण जे काम करतो त्यानं कुटुंबं सुखी व्हायच्या ऐवजी दुःखच त्यांच्या वाट्याला येत असेल तर ते काम कऱण्यात काही हाशिल नाही हे खरंय.मी राजेंद्र भुजबळ याना ओळखत नाही पण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या प्रत्येक वाक्यातील त्यांचा सच्चेपणा जाणवत होता.

सततच्या धमक्या ,झालेला जीवघेणा हल्ला याला वैतागून पत्रकारिता अनेकांनी सोडली आहे.मात्र राजेंद्र भुजबळ यांनी व्यक्त होत पत्रकारांवर होणार्‍या अन्यायला वाचा फोडली आहे.भुजबळ यांची ही व्यथा समजून घेत नवे भुजबळ तयार होऊ नयेत म्हणून आपण काही करायचं की,’सोडताय ना पत्रकारिता सोडा,तुमच्यावाचून पत्रकारिता थांबणार नाही’ म्हणत त्यांच्या रिक्त जागेवर चढाओढ करीत आपली वर्णी लावून घ्यायची याचा विचार झाला पाहिजे.आज भुजबळांची जी अवस्था झाली ती कदाचित उद्या आपलीही होऊ शकते .पत्रकारिता आणि ती देखील प्रामाणिकपणे कऱणे किती जिकरीचे होत आहे हे दररोज घडत असलेल्या अशा  घटनांवरून दिसून येत आहे.’राजीनामा देऊ नका,अशी विनंती मी त्यांना केली आहे,मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि महाराष्ट्रातील तमाम पत्रकार  तुमच्या पाठिशी आहोत असाही शब्द मी त्यांना दिला आहे.शिर्डीला यायचं असेल तर आम्ही तिकडंही येतो असंही त्यांना स्पष्ट केलं आहे’.त्यामुळे त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे पाहू यात आता भुजबळ काय निर्णय घेतात ते…मात्र भुजबळांवर खरोखरच पत्रकारिता सोडण्याची वेळ आली तर धमक्यांना घाबरून पत्रकार घरी बसतात असा मेसेज जाऊ शकतो.त्यातून हल्ले आणि धमक्या वाढू शकतात.आज सकाळीच मुंबईहून पत्रकार शकिल यांचाही फोन आला होता.त्यांना एक नगरसेवक खोटे गुन्हे दाखल करायची धमकी देत आहे अशी त्यांची तक्रार होती.हे सारं संतापजनक आहे.हे थाबायचं की,लोण आपल्यापर्यत येऊ द्यायचं हे प्रत्येकांनं तपासून पाहावं.ज्याच्यावर अन्याय झाला त्या पत्रकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे.अन्यथा हा सिलसिला चालूच राहिल.

एक गोष्ट खरी की,राज्यातील पत्रकारांना सरकारनं वार्‍यावर सोडलं आहे.’पत्रकारांवरचा हल्ला अजामिनपात्र ठरवावा’ ही मागणी पंधरा वर्षापासून होत असताना सरकार त्याकडे लक्ष देत नाही.कायदा करण्यास अक्षम्य टाळाटाळ करीत आहे.कायदा झाला तर सारं थांबेल असं नाही पण कायद्याचा वचक नक्कीच बसेल आणि भुजबळ यांच्या सारख्या पत्रकारांवर पत्रकारितेलाच गुडबाय म्हणण्याची वेळ येणार नाही.कायद्यासाठी सरकारवर दबाब वाढवावा लागेल हे नक्की।

राजेद्र भुजबळ यांची मुळ पोस्ट त्यांच्याच शब्दात वाचा.

!!!!  नम्र आव्हान !!!
माझे सर्व पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार यांना आज जाहीर पने आणि नम्र पने माझ्या भावना मांडत आहे.मित्रांनो 12 वर्षाच्या पत्राकारीकता मध्ये तुमचे मार्गदर्शन ,सहकार्य व मोलाची साथ मला लाभली कधी कधी माझ्या अनेक चुकाही झाल्या असतील त्या मी नम्र पने स्वीकारतो माझ्या मुळे अनेकांची मने दुखावली असतील म्हणून मी आपल्या सर्वांची नम्र माफी मागतो.
आज मला अनेक जीवे मारण्याच्या धमक्या आल्या खरं तर मी त्यांना कधीच भीक घालत नाही घाबरत नाही आणि घाबरणार तर मुळीच नाही .मी प्रामाणिक तेचा रस्त्यावर चालत होतो पण अचानक माझी आई,पत्नी व लहान मुलांच्या डोळ्यात कालच्या प्रकारामुळे पाणी बघितले माझा मुलगा म्हणाला पप्पा मी काम करेल तुम्ही पत्रकारिकता सोडून द्या कारण तुमच्या शिवाय आम्हाला कुनाचा आधार नाही.म्हणून आज मी पत्रकारिकता सोडत असून काम करत असलेल्या दोनही चॅनेल ला राजीनामा पाठविला आहे.
मित्रांनो भविष्यात असेच प्रेम आणि संबंध राहू द्या हीच माफक अपेक्षा करतो आणि पत्रकारिकता सॊडतो.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !!
       राजेंद्र भुजबळ शिर्डी

1 COMMENT

  1. सर्वच पत्रकार संघटनानी एकत्रपणे पुढे येवून पत्रकार सरंक्षण कायदा अमलात आणणेसाठी प्रयत्न केले गेले पाहीजेत त्यासाठी ग्रामीण पत्रकाराना विश्वासात घेवून काम केले तर शहरातील पत्रकाराना देखील बळ मिळेल व तळागाळातल्या पत्रकाराला मुक्तपणे वावरता येईल असे वाटते …(गणेश आळंदीकर ,अध्यक्ष बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ (रजिस्टर्ड २००५ ) मोबाईल ..९४२३०२०२५५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here