टिळकांच्या पुतळ्यासाठी हवे योगदान

0
687

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये लोकवर्गणीमधून लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्यासाठी लोकमान्य टिळक प्रतिमा संकल्प मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक विचारमंचातर्फे या मोहिमेची बुधवारी पुण्यात घोषणा करण्यात आली. 
राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मंचातर्फे करण्यात आले. मंचातर्फे या मोहिमेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. मंचाचे अध्यक्ष शैलेश टिळक, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, गुरुजी तालीम गणेशोत्सव मंडळाचे प्रवीणसिंह परदेशी, नगरसेविका मुक्ता टिळक आदी या वेळी उपस्थित होते. 

महाराष्ट्र सदनामध्ये टिळकांचा पुतळा नसणे, ही राज्यासाठी खेदजनक बाब आहे. तेथे टिळकांचे यथोचित स्मारक व्हावे, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीसाठी मेघडंबरी उभारताना लोकमान्यांनी लोकवर्गणीतूनच निधी गोळा केला होता. त्यामुळेच या उपक्रमासाठीही लोकवर्गणीतूनच निधी गोळा व्हावा, ही मंचाची भावना असल्याचे शैलेश टिळक यांनी सांगितले. प्रत्येकी १० रुपये देऊन नागरिकांना या उपक्रमामध्ये सहभागी होता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. गणेशोत्सव आणि लोकमान्यांच्या मंडालेहून सुटकेच्या घटनेची शताब्दीपूर्ती विचारात घेऊन, यंदा हा उपक्रम आखण्यात आला आहे. लोकसहभागातून टिळकांचा पुतळा उभारून, तो राज्य सरकारमार्फत दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये बसविण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले. 

अधिक माहितीसाठी संपर्क 
या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ०२०-२४४३०३५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंचातर्फे करण्यात आले आहे.( मटावरून साभार )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here