बर्लिन
प्रेषित मोहम्मदांची वादग्रस्त व्यंगचित्रे छापल्याबद्दल फ्रान्सच्या चार्ली हेब्डो या व्यंगसाप्ताहिकाला दहशतवादी हल्ला सोसावा लागला असतानाच रविवारी याच कारणासाठी जर्मन वृत्तपत्रही लक्ष्य झाले. चार्ली हेब्डोतील वादग्रस्त व्यंगचित्रे हॅम्बर्गर मॉर्गेनपोस्ट या दैनिकाने पुन्हा प्रसिद्ध केल्याबद्दल रविवारी या वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बर्लिनमधील या वृत्तपत्राच्या ऑफिसवर दगडफेक करण्यात आली. आगीचे गोळेही फेकण्यात आले. यामध्ये वृत्तपत्राच्या संग्रहालयाचे नुकसान झाले. दुपारच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच जळलेली कागदपत्रे बाहेर काढण्यात आली. हल्ला झाला त्यावेळी कार्यालयातील कोणीही कर्मचारी हजर नसल्याने कोणालाही इजा झाली नाही, असे सांगण्यात आले. ‘स्वातंत्र्य असायलाच हवे’ या मथळ्याखाली या वृत्तपत्राने चार्ली हेब्डोमधील वादग्रस्त व्यंगचित्रे पुन्हा प्रसिद्ध केली होती.
प्रेषित मोहम्मदांविषयी प्रसिद्ध होणाऱ्या व्यंगचित्रांचा संताप म्हणून बुधवारी पॅरिसमधील चार्ली हेब्डोच्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला करून संपादकासह १२ पत्रकारांची हत्या केली होती. या हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना पॅरिसच्या पोलिसांनी शुक्रवारी कंठस्नान घातले. दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. याच कृत्याच्या निषेधार्थ जर्मनीतील अनेक वृत्तपत्रांमध्ये गुरुवारी पहिल्या पानावर या साप्ताहिकातील वादग्रस्त व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली होती.