एन.एच-17- वादे हवेत,वांदे कायम

0
958

एन.एच-17 ः वादे हवेत,वांदे कायम
मुंबई -गोवा महामार्गाचं रखडलेलं काम लगेच सुरू होईल असं आश्वासन सरकारनं सभागृहात दिलं होतं.बाधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर अगोदर 30 मार्च,नंतर 30 एप्रिल आणि नंतर 31 मे पर्यत अर्धवट अवस्थेत पडलेलं काम सुरू होईल असा वादा केला होता.मंत्री महोदय एवढ्यावरच थांबले नाहीत तर कामावर देखरेख ठेवण्यासाठी आपण दरमहा प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी करू असेही त्यांनी जाहिर केलं होतं.यापैकी काहीच झालं नाही.मंत्री महोदयांनी एक वेळ तर पेणला भेट दिली पण रखडलेलं काम काही सुरू झालं नाही.कोकणात 15 मे पासून वळवाचा पाऊस सुरू होतो.जूनच्या पहिल्या आठवडयातच मोसमी पाऊस सुरू होतो.अशा स्थितीत हाती असलेल्या कालावधीत रस्त्याचं काम पूर्ण होणं शक्य नाही.दुसरीकडं रस्तयाची अशी दुर्दशा झालीय की,नको तो प्रवास असं वाटायला लागलंय.लोक आता पत्रकारानाच शिव्या द्यायला लागलेत,नव्हतं होत रूंदीकरण तर हरकत नव्हती.पहिले रस्ते तरी बरे होते.आता जागोजागी रस्ते फोडून ठेवलेत.डायव्हर्शनमुळंही टॅॅफिक जॅम होते.पावसाळ्यात तर या डायव्हर्शनची आणखी वाट लागणार आहे.थोडक्यात काय तर कोकणातील जनतेच्या नशिबी मात्र अच्छे दिन आलेच नाहीत.सरकारची संवेदनशीलता बोथट झालेली असल्यानं आता पत्रकारांनी तरी किती वेळा आंदोलन करायचं हा देखील प्रश्नच आहे.( सोबतचं छायाचित्र रस्त्याची अवस्था दाखवू शकतंय)

महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण होऊन त्यावरुन वाहतूक चालू झाली आहे. परंतु कोकणवासीयांच्या जिव्हाळय़ाचा प्रश्न असणारा मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम म्हणजे निव्वळ घोषणांचा सुकाळ आणि नियोजनाचा दुष्काळ अशी परिस्थिती दिसून येत आहे.

रायगड जिल्हय़ातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन रस्त्यावर उतरुन देखील संघर्ष केला. अखेर पनवेल ते इंदापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास सुरुवात झाली. हे काम अत्यंत धिम्या गतीने होत आहे. काही महिन्यांपूर्वी युती शासनामधील मंत्रिमहोदयांनी या कामाची पाहणी करुन ३0 मार्च, ३0 एप्रिल व ३१ मेपर्यंत कोणकोणती कामे पूर्ण होणे गरजेचे आहे, याबाबत सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र या पाहणी दौर्‍यानंतर कोणत्याही प्रकारे चौपदरीकरणाच्या कामास गती मिळालेली नाही. चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर डायव्हेशन देण्यात आले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. कोकणामध्ये १५ मे पासून वळवाचा पाऊस व जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते. हाती असलेल्या कालावधीत रस्त्याच्या दुरुस्तीची कामे होणे शक्य नाही. तरीदेखील युती शासनामधील जबाबदार मंत्र्यांकडून चौपदरीकरणाच्या कामाबाबत सवंग घोषणा करणे चालूच आहे.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण याबाबत देखील केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी घोषणा केली आहे. कोकण रेल्वेची सुरुवात रोहा येथून होत असली तरी पनवेल ते रोहा या मार्गांच्या दुपदरीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. सदरचे काम पूर्ण होण्यासाठी अजून एक ते दीड वर्षाचा कालावधी निश्‍चित लागेल. याबाबतची वस्तुस्थिती जाणून न घेता केवळ घोषणा करणे आणि कोकणवासीयांना स्वप्न दाखविणे असा प्रकार चालू असल्याचे चित्र या मार्गावरुन प्रवास करताना दिसून येत आहे. मंत्रीमहोदय आणि आमदार यांच्या ताफ्यात उच्च बनावटीच्या गाड्या असल्याने त्यांना जनतेला कोणत्या त्रासातून सामोरे जावे लागत आहे, याची कल्पना नाही. येणार्‍या पावसाळय़ात पुन्हा एकदा कोकणवासीयांना महामार्ग व रेल्वे या दोन्ही मार्गांवरुन जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.
यामुळे कोकणवासीयांसाठी महामार्ग चौपदरीकरण व रेल्वे दुपदरीकरण म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि नियोजनाचा दुष्काळ अशीच परिस्थिती आहे. यंदाच्या वर्षी महामार्गावरुन तसेच रेल्वेमार्गे प्रवास करणार्‍या चाकरमान्यांकडे संपर्क साधला असता त्यांनी जुना महामार्ग चांगला होता. आता नवाही नाही जुनाच तर नाहीच, अशी अवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here