बातमी अत्यंत धक्कादायक तेवढीच ह्रदयद्रावक आहे.बैतूल हा मध्यप्रदेशातील आदिवासी बहूल जिल्हा.येथून जनमत बैतूल नावाचं दैनिक एक स्थानिक पुढारी काढतात.या दैनिकात प्रदीप उर्फ मोनू रैकवार संपादक म्हणून कार्यरत होते.त्याचं प्रिन्टलाईनवर देखील नाव छापलं जायचं.एका बातमीवरून त्याचं आणि व्यवस्थापनाचे काही मतभेद झाले.त्याची परिणती त्याना कामावरून काढून टाकण्यात झाली.अगोदरच घरची हालाखीची परिस्थिती त्यातच नोकरी गेली.अन्यत्र काम मिळविण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला पण त्यांना काम मिळाले नाही.काही दिवसातच घरात खायचेही वांदे झाले.या परिस्थितीला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली.अगोदरच बेकारीची मार झेलत असलेल्या रेकवार यांच्यासाठी हा धक्का मोठा होता.ते दारूच्या आहारी गेले.त्याचा परिणाम असा झाला की,दोन वेळचं जेवणंही त्यांना मिळेना.गेले काही दिवस ते उपाशी असल्यानं काल त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
मोनूच्या मृत्यूची बातमी साऱ्या गावात पसरली.पत्रकार मोनूच्या घरी आले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की,घरातील नातेवाईकांक डं संपादक राहिलेल्या मोनूच्या अंत्ययात्रेसाठीही देखील पैसे नव्हते.पत्रकारांनी मग आपसात चंदा जमा केला आणि त्यातून जे पेसे उभे राहिले त्यांच्या मदतीनं पोस्टमार्टेम नंतर अत्यंसंस्कार कऱण्यात आले.प्रदीपच्या नशिबानं मृत्यू नंतरही त्याचा पिच्छा सोडला नव्हता.जनमत बैतूल आणि माहिती आणि जनसंपर्क विभागानं मग प्रदीपला पत्रकार मानायलाच नकार दिला.जिल्हयातील काही पत्रकार संघटनांनी मग संबंधिताना प्रेस लाईनवरील त्याचं संपादक म्हणून असलेलं नाव दाखविलं तेव्हा साऱ्यांची बोलती बंद झाली.त्यानंतर पत्रकार संघटनांनी पत्रकारांच्या नातेवाईकांना मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.
विषय इथंच थांबत नाही.पुढाऱ्यांची चमचेगिरी करणारे पत्रकार मग पुढे आले.त्यांनी प्रदीपचा मृत्यू दारूमुळे उठवून या विषयाचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला.सुदैवानं जिल्हयातील आणि राज्यातील प6कार संघटनांनी हा विषय आता गांभीर्यानं घेत सरकारकडून प्रदीपच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार गुरूनाथ नाईक यांच्या संबंधित एक बातमी आली होती आणि त्यांची आर्थिक परिस्थिती किती हालाखीची आहे हे त्या बातमीत विस्तारानं मांडलं गेलेंलं होतं.त्याअगोदर मुंबईत गृहलक्ष्मीच्या माजी संपादीका राऊत आणि नागपूरच्या एका पत्रकाराला कसं हालाखीत जीवन जगावं लागतंय ते समोर आलेलं होतं.काही दिवसांपूर्वी सातारा येथेही बापू आफळे नावाचे पत्रकार गरिबी,बेकारीमुळं मृत्यूमुखी पडले होते.पत्रकारांच्या बाबतीत सातत्यानं घडणाऱ्या या घटना अंगाचा थरकाप उडवित असतात.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत ती यासाठीच.मात्र काही सुखवस्तू पत्रकारांना हे मान्य नसल्यानं सरकार पेन्शन द्यायला उशीर करीत आहे.या विरोधात संघटीतपणे आवाज उठविला नाही तर असे मृत्यू वाढत जाणार आहेत.ज्यांच्यासाठी पत्रकारिता एक व्रत आहे अशा पत्रकारांची स्थिती वाईट आहे.ज्यांनी पत्रकारिताचे धंदा केलाय त्यांना अशा घटनाही थोतांड वाटतात