आपल्या घरच्यांनी केलेलं कौतुक वेगळा आनंद देणारं असतं. .या आपलेपणाचा आनंद मी दोन दिवसापुर्वी बीडमध्ये भरपूर लुटला.पत्रकार संरक्षण कायदा झाल्यानंतर ठिकठिकाणी माझे सत्कार झाले.माझी जन्मभूमी असलेल्या बीडमध्येही तो 1 मे रोजी झाला.माझ्यासाठी हा सत्कार सोहळा अविस्मरणीय होता.याची दोन कारणं आहेत,पहिलं म्हणजे ज्या शहराच्या अंगा-खांदयावर बागडत मी लहानाचा मोठा झालो त्या शहरात आपलं कौतुक होतंय हे तर आनंदाचे एक कारण आहेच त्याचबरोबर जिल्हयातील पाचशेवर पत्रकार माझ्या सत्कारासाठी एकत्र येतात ही गोष्ट देखील माझ्यासाठी वेगळा आनंद देणारी होती.बीडमध्ये पत्रकारांचे विविध गट-तट होते.प्रत्येकानं आपले सवतेसुभे निर्माण करून नव्याना प्रवेशबंदी केलेली होती.ठराविक मंडळी कोणत्यातरी संघटनेचं बिरुद घेऊन मिरवत होती.एकीकडं हल्ले होत होते आणि दुसरीकडं पत्रकारांचे स्थानिक नेते आपल्या कोषातून बाहेर पडत नव्हते.राज्यभर परिषदेची संघटनात्मक बांधणी झालेली होती,बीडमध्ये मात्र पत्रकार विखुरलेले होते.प्रभावी नेतृत्व नसल्यानं स्थानिक पातळीवर पत्रकार वेगवेगळ्या संघटना स्थापन करून अपप्रवृत्तीशी लढत होते,मात्र त्यांना जिल्हायातून बळ मिळत नव्हतं. उलट मोर्चे काढणं,आंदोलनं करणं,कार्यक्रम घेणं हे काय पत्रकारांचं काम आहे काय? असे सवाल करून जिल्हयातील पत्रकारांना नाउमेद केलं जात होतं.परिवर्तनाच्या प्रक्रियेत या स्थितीकडं जास्त काळ डोळेझाक करणं शक्य नव्हतं.सामोपचारानं परिवर्तन घडावं यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले त्यात यश आलं नाही.काही मंडळींना केवळ पदांंमध्येच स्वारस्य असतं.ते नेसल तर संघटना वगैरे गौण ठरतात.अशा मंडळींना बाजुला करून नव्यानं संघटना बांधणी कऱणं आवश्यक होतं.अनिल महाजन आणि अनिल वाघमारे या दोन तरूण पत्रकारांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि जिल्हयात सार्यांनाच आश्चर्य वाटेल असं परिवर्तन घडवून आणलं गेलं.परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी झालेले पाचशेवर पत्रकार माझ्या सत्काराच्या निमित्तानं एकत्र आलेले पाहून पत्रकार जोडोचे माझे स्वप्न किमान बीडमध्ये तरी पूर्ण झाल्याचा आनंद मला मिळाला यात शंकाच नाही.सत्कार आणि विजयी मेळाव्याचा एवढा उत्साह होता की,प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणाहून तर पत्रकार आले होतेच त्याच बरोबर द्रिदुड,आडस,तेलगाव सारख्या गावांमधूनही पत्रकार मोठ्या संख्येनं आले होते.त्यांच्याशी संवाद साधताना मी भारावून गेलो नसतो तर नवल.माझ्यावर प्रचंड प्रेम असलेली ही मंडळी कार्यक्रमानंतर किमान तासभर माझ्याबरोबर जेव्हा फोटो काढत होती तेव्हा आपलेपणाचा हा वेगळा आनंद मी घेत होतो.यातले बहुसंख्य पत्रकार तरूण होते,आणि पत्रकारांनी संघटीत झालं पाहिजे,मराठी पत्रकार परिषदेच्या झेंडयाखाली एकत्र आलं पाहिजे या जाणिवेनं भारावलेले होते.त्यामुळं बीडचा हा विजय मेळावा माझ्यासाठी खर्या अर्थानं आनंद सोहळा ठरला होता.बीडमध्ये पत्रकारांचं भक्कम संघटन उभं राहिलंय याचा आनंद देणाराही हा सोहळा होता यात शंकाच नाही.माझ्या जिल्हयात माझी संघटना मजबूत बनली आहे हे मी आता छातीठोकपणे महाराष्ट्रात सांगू शकतो
बीड माझी जन्मभूमी आहे.माझं अकरावी पर्यंतचं शिक्षणही बीडला झालं.नंतर पदवी मी माजलगावहून मिळविली.पत्रकारिता आणि चळवळीचं बालकडू देखील मला या शहरातूनच मिळालं.पत्रकारितेला सुरूवातही बीड जिल्हयातूनच झाली.पुढं मी औरंगाबादला आलो,रितसर पत्रकारितेची पदवी घेतली आणि पत्रकारितेत रमलो..चळवळ करायलाही मला बीडनंच शिकविलं.अजून मिसूरडंही फुटलेलं नसतानाची एक घटना मला महत्वाची वाटते.मला आठवतंय,ते 72-73 चे दिवस असावेत.मी नववीच्या वर्गात होतो.जिल्हा परिषदेच्या मल्टिपर्पज हायस्कुलमध्ये शिकायचो.मल्टिपर्पज हायस्कुल जिल्हा परिषदेची शाळा असली तरी तेव्हा मल्टिपर्पजमध्ये शिकणे हे प्रतिष्टेचं समजलं जायचं.शाळेचा दबदबा होता.याचं कारण जिल्हयातील सर्वोत्तम शिक्षक या शाळेत होते.गोदाम सर,गोखले सर आदि शिक्षकांनी या शाळेची पत आणि प्रतिष्ठा वाढविलेली होती.काय राजकारण झालं आम्हाला माहिती नाही,ते समजण्याचं तेव्हाचं वयही नव्हतं.पण आठ-दहा विद्यार्थी प्रिय शिक्षकांच्या अचानक बदल्या झाल्या.ही बातमी सर्व विद्यार्थ्यासाठी धक्कादायक होती.मी देखील अस्वस्थ झालो.नववी-दहावीच्या प्रत्येकी चार-चार तुकडया होत्या.आम्ही मधल्या सुटीत सर्व एकत्र आलो,मुख्याध्यापकांना भेटलो.त्यांनी हतबलता दाखविली.मी काही करू शकत नाही म्हणून त्यांनी हात झटकले.’आपण मोर्चा काढू’ अशी सूचना मी केली.आणखी काही विद्यार्थंनी त्याला होकार दर्शविला आणि दुसर्या दिवशी शाळेच्या समोरच असलेल्या जिल्हा परिषदेवर आम्ही मोर्चा काढला.शिक्षणाधिकार्यांना निवेदन दिलं.त्याची बातमी घेऊन आम्ही चंपावतीपत्र आणि झुंजार नेतात गेलो.दुसर्या दिवशी माझ्यासह आणखी तीन-चार मुलांची नावं टाकून ‘यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघााला होता’ अशी बातमी आली.वर्तमानपत्रात पहिल्यांदाच माझं नाव आलेलं असल्यानं तो अक मी अनेक वर्षे सांभाळून ठेवला होता.चळवळीचा हा वसा घेऊन मी पुढं अनेक आंदोलनं लढलो.ती यशस्वीही करून दाखविली.खरं तर बीडमध्ये सत्कार होत असताना या सार्या आठवणींना भाषणातून उजाळा द्यायचा होता.पण कार्यक्रमात अगोदरची काही भाषणं लांबली,पुढं काही भाषणं होणार होती.त्यामुळं मला आवरतं घेत आठ-दहा मिमिटात आदोलनाची माहिती देऊन भाषण थांबवावं लागलं.भाषणं सर्वांचीच उत्तम झाली.सार्यांनीच माझं तोंडभरून कौतूक केलं.पंकजा मुंडे,जयदत्त आण्णा क्षीरसागर,नामदेवराव क्षीरसागर,ओमप्रकाश शेटे,नरेंद्र कांकरिया हे भरभरून माझ्याबद्दल बोलले,भूमीपूत्र म्हणून या सर्वांनी शाबासकी दिली.’आम्हाला अभिमान वाटतो’ असंही म्हटलं.सुभाष चौरे आणि अनिल महाजन यांंचं आपुलकीनं ओतप्रोत भरलेली भाषणं मला नक्कीच नव बळ देणारी ठरली.तत्पुर्वी माझा सपत्निक सत्कार केला गेला.हे सारं होत असताना डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या झाल्या.माझ्या जन्मभूमीत आपण बारा वर्षे लढलेल्या लढ्याची एवढ्या प्रेमानं दखल घेतली गेली यापेक्षा मला आणखी काय हवं होतं ?.या अगोदर तीन-चार वेळा तारखा बदलाव्या लागल्या.मी थोडा वैतागलो.मात्र सुभाष चौरे आणि त्यांच्या सहकार्यांची इच्छा होती की,महाराष्ट्रात कोठेही झाला नाही एवढा दणकेबाज सत्कार बीडमध्ये करायचा.त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली आणि खरोखरच दृष्ट लागावी,कोणालाही हेवा वाटावा,विरोधकांनीही कौतूक करावं असा अविस्मरणीय सत्कार सोहळा सुभाष चौरे आणि त्यांच्या सहकार्यांनी घडवून आणला.सत्काराच्या आणि त्या अगोदरही बीड जिल्हयातील पत्रकारांनी माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल मी जिल्हयातील परिषदेच्या सर्व सदस्यांचे आभारी आहे.विभागीय चिटणीस अनिल महाजन,अध्यक्ष सुभाष चौरे,कार्याध्यक्ष चोपडे,दत्ता अंबेकर,अनिल वाघमारे,संदीप लवांडे ,विलास डोळसे याच्यासहअन्य सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.माझ्यावरचं हे प्रेम कायम असंच असू द्यावं एवढीच या निमित्तानं विनंती.पहिल्यापासून परिवर्तनाच्या चळवळीत असलेले सर्वोत्तम गावरस्कर,राजेंद्र आगवान,नरेंद्र कांकरिया यांनीही कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी जिवापाड मेहनत घेतली,त्यांनाही धन्यवाद.इतर सर्व मित्रांना धन्यवाद.
या निमित्तानं आणखी दोन गोष्टींचा उल्लेख करणं आवश्यक आहे.पहिलं म्हणजे सत्कार समारंभासाठी जो खर्च केला गेला तो पत्रकारांनी आपसात वर्गणी जमा करून केला गेला.त्यासाठी कुणासमोर हात पसरले नाहीत किंवा दमबाजीही केली गेली नाही.बीडमध्ये पत्रकारांनी स्वतःचा कार्यक्रम कोणतीही वसुली न करता केला जाण्याची ही पहिलीच वेळ होती.परिवर्तनातील हा अत्यंत महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं.दुसरी गोष्ट दोन दिवस जिल्हयातील बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये माझ्या सत्काराच्या जाहिराती प्रसिध्द झाल्या होत्या.त्या जाहिराती मोफत,विनामुल्य छापल्या गेल्या होत्या.बीड जिल्हयातील पत्रकारितेत हे देखील पहिल्यांदाच घडत होतं.संपादकांनी माझ्यावर दाखविलेल्या या प्रेमाबद्दल मी त्यांचाही आभारी आहे.दोन पत्रकार एकत्र येत नाहीत या परंपरागत समजाला बीडमध्ये धक्का देण्याचं महत्वाचं काम टीम चौरे यांनी केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.- एस.एम.