“खास पठार”

गार हवा, रिमझिम पाऊस, क्षणात पडणारं कोवळं उन,मध्येच परिसरावर पसरणारी धुक्याची चादर, हिरवाकंच निसर्ग आणि हंगाम सुरू होत असल्याचे सांगावे धाडणारी सुंदर रंगीबेरंगी फुलं… कास पठारावरचं आजचं हे सारं वातावरण, वेड लावणारं.. कासचा हंगाम सुरू झाला असला तरी फुलांचे ताटवे अजून दिसत नाहीत..मात्र अधुन मधुन रंगीबेरंगी फुलं दिसू लागली आहेत.. .. असं सांगितलं गेलं की, एक सप्टेंबर नंतर सारं पठार विविधरंगी फुलांनी अच्छादून जाईल..इथं वेगवेगळ्या जातीची, रंगाची २०० रानफुलं बघायला मिळतात.. ४८ प्रकारची फुलपाखरं आहेत, ४९ जातीचे पक्षी, १८ प़कारचे सस्तन प्राणी, बिबट्या पासून अस्वलापर्यन्तचे हिंस्त्र श्वापदांचा वावर देखील इकडे असतो.. .. कल्पना करा एवढं सारं आहे म्हटल्यावर कासचा नजारा कसा असेल? पृथ्वीवरचा स्वर्गच तो..इथं जे पहायला आणि अनुभवायला मिळतं ते अन्यत्र कोठेही दिसत नाही.. हे विशेष..
२०१२ मध्ये युनोस्कोनं कास पठार जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलं ते इथल्या जैवविविधतेमुळेच.. जगानं ज्या कासवरील जैवविविधतेची दखल घेतली तो परिसर आपण पाहिला नाही याची रूखरूख गेली काही वर्षे होती.. त्यामुळं गुरूवारी मी, बापुसाहेब गोरे, डॉ. मोहन वाघ या मित्रांना घेऊन, कॅमेरयावरची धुळ झटकून कास गाठलं.. सातारयावरून हरिष पाटणे, दीपक प़भावळकर, सुजित अंबेकर, सनी शिंदे, समाधान हेंद़े आदि पत्रकार मित्र बरोबर होतेच .. या पत्रकार मित्रांमुळे कास पठार पर्यटक आणि पत्रकाराच्या नजरेतून बघता आलं..कासची खरी ओळख ही झाली.. कास पठारावर फिरताना सारखं वाटत होतं की, एवढा सुंदर निसर्ग आमच्या जवळ असताना आम्ही केरळ, उटी आणि अन्यत्र का जातो?.. कळत नाही, आम्ही या सुंदर स्थळांची जाहिरात करण्यात कमी पडलो का?.. ते तर एक कारण आहेच..दुसरं कारण “घरकी मुर्गी डाल बराबर” हे ही असू शकतं.. कारण काहीही असो पण आम्ही आमच्या जवळचा हा सौंदर्याचा ठेवा किती अनमोल आहे हे जगाला ओरडून सांगण्यात कमी पडतो हे नक्कीच.. आमच्या पर्यटन विभागाचं हे अपयश म्हणावं लागेल.. .पर्यटन वाढलं तर रोजगार आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतात.. हा अनुभव आहे… त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक कासला यावेत या दृष्टीनं जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत.. .

कासची ओळख फुलांपुरतीच आहे… मात्र तेवढंच नाही.. पर्यटकांनी वर्षभर इथं यावं असं हे ठिकाण आहे .. .. महाबळेश्वरला चिटकून हा परिसर आहे..मुंबई – पुण्याजवळ, हाकेच्या अंतरावर हे थंड हवेचं ठिकाण आहे.. मात्र जेवढे पर्यटक महाबळेश्वरला जातात त्याच्या दहा टक्के पर्यटकही इकडे फिरकत नाहीत.. कास महाबळेश्वर पेक्षा कमी नाही.. कांकणभर सरसच असेल.. इथं डोंगर आहेत, दरया आहेत, गवताळ कुरणं आहेत, झुडपं आहेत, पाणथळ आहेत, कुमुदिनी तलावा सारखे तलाव आणि धबधबे, बघावं तिकडे छोटी मोठी धरणं आहेत… स्वच्छ आणि थंड हवा आहे.. पर्यटकांना आणखी काय हवंय? हे सारं आहे हे लोकांना सांगण्याची गरज आहे.. . मला माथेरानकरांचं नेहमी कौतुक वाटतं.. पर्यटकांनी माथेरानला यावं यासाठी सातत्यानं त्यांचे प्रयत्न सुरू असतात.. .. त्यांनी माथेरान महोत्सव मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य शहरात भरवून आपल्याकडे बघायला काय आहे हे लोकांना ओरडून सांगितलं.. त्याचा फायदा ही त्यांना झाला.. त्याच धर्तीवर इकडे प़यत्न होणं अपेक्षित आहे..

कासवरील फुलांचा हंगाम सुरू झाला असला तरी १ तारखेनंतर खरया अर्थाने फुलोत्सव सुरू होईल.. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो सुरू असेल.. मी परत जाणार आहे.. ज्यांना शक्य आहे त्यांनी या काळात आवश्य कासला भेट द्यावी.. इकडे हेरिटेज वाडी, किंवा निवांत सारखी राहण्यासाठी आणि जेवणासाठी काही उत्तम ठिकाणं आहेत..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here