सर्वश्री भाऊ तोरसेकर, हरीभाऊ नरके आणि अभिराम दीक्षित यांची एका पोस्ट वरची जुगलबंदी वाचली. हे तिघेही महाराष्ट्रातील आज घडीच नामांकित विचारवंत आहेत, माझा तिघांशीही स्नेह आहे, म्हणून हे चौथे मत मांडायचे धाडस करतो.
सूत्र रुपानं मी काही मुद्दे सर्वांच्या विचारार्थ मांडतो. हे मुद्दे या तिघांना उद्देशून नाहीत, या तिघांनी या विचाराला चालना दिली इतकेच. आणखी एक खुलासा म्हणजे मी कुठल्याच विचारधारेला बांधलेला नसलो तरी कोणत्याच विचारधारेचा द्वेष करत नाही किंवा तशी अस्पृश्यता पाळत नाही. म्हणूनंच कोणत्याही विचारधारेचे विश्लेषण करायला मी कचरणारही नाही. मी कुठल्याच एका विचारसरणीला संपूर्ण जगाचे कल्याण करू शकणारी ‘रामबाण विचारसरणी मानीत नाही. मनुष्य, समाज हे अजब रसायन असते म्हणून कुठलाही एकच अवतारी पुरूष अथवा एकच विचारधारा सगळ्या जगाला मोक्ष देऊ शकते यावर माझा अजिबात विश्वास नाही.
मला स्वतःला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे (मी स्वतः जातपात कधीच मानली नाही तरी) हिंदुत्ववादी आणि पुरोगामी दोघांनीही मला जन्माने ‘ब्राह्मण’ असल्याबद्दल अनुक्रमे ‘अहंगंड’ आणि ‘न्यूनगंड’ दिले. हे दोन्ही समान धोकादायक आहे. वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच आहे. येथे ‘मला’ याचा अर्थ माझ्या पिढीला असा घ्यावा.
हिंदू म्हणून आत्मपरिक्षण करणे हिंदुत्ववाद्यांना मान्य होत नाही, सनातनच्या आचरटपणावर काही बोलले की ते लगेच तुमच्यावर “सेक्युलरवादी ऊर्फ मुस्लीम धार्जिणे” असा शिक्का मारतात. या उलट पुरोगाम्यांच्या वाह्यातपणावर बोलायला गेलो की ते आपल्याला ‘संघीय विचारवंत’ ठरवतात, वैचारिक सहिष्णुता बाळगायची संस्कृती आता संपल्यात जमा आहे.
हिंदुत्वाची व्याख्या हिंदुत्वाचे पालन करणारा तो हिंदू अशी करायची की मुस्लीम, ख्रिश्चन द्वेष म्हणजे हिंदुत्व अशी करायची? असा प्रश्न आजकाल पडतो. आजचे हिंदुत्व चातुर्वण्य मानत असेल तर ब्राह्मण म्हणून मला अहंगंड देते. सनातनचे हिंदुत्व हे अशा बावळटपणाचे समर्थन करते. गोळवलकर गुरूजींच्या काळापर्यंत संघही प्रत्यक्षपणे हेच करत होता, चातुर्वर्ण्य न मानण्याची संघाची भूमीका देवरसांपासून सुरू होते असे माझे निरीक्षण आहे, यात त्रुटी असू शकते. तथापि एक महत्वाचे निरिक्षणही इथे नोंदले पाहिजे की हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दोनंच अशा संघटना आहेत ज्या “जातीयवादी” नसून “धर्मवादी” आहेत मात्र हिंदीच्या प्रभावाखाली आपण मराठीतही त्यांना “जातीवादी” म्हणतो. त्या म्हणजे संघ आणि शिवसेना.
सीओईपी मध्ये रा.स्व संघाचे तटस्थ विश्लेषण करणारे व्याख्यान देण्याचा मला योग आला होता. शेवटी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, त्यात एक प्रश्न असा होता की “संघ =ब्राह्मण आणि ब्राह्मण=संघ यावर तुमचे काय म्हणणे आहे”?
यावर मी म्हणालो की १९२० ते १९७० असा काळ गृहीत धरला तर संघच नाही तर काँग्रेस=ब्राह्मण आणि ब्राह्मण=काँग्रेस असे दाखवता येते तसेच समाजवादी=ब्राह्मण आणि ब्राह्मण=समाजवादी तसेच ब्राह्मण=कम्युनिस्ट आणि कम्युनिस्ट=ब्राह्मण असेही दाखवता येते ! याचे एक सरळ सुस्पष्ट कारण म्हणजे हिंदु समाजात शिक्षण सर्वात आधी ब्राह्मणांमध्ये आले, जो समाज सर्वात आधी शिकतो तो व्यवस्थेबद्द्ल सर्वात आधी विचार करेल हे ओघानेच आले आणि म्हणून तो वेगवेगळ्या विचारधारांॅशी सर्वप्रथम जोडला जाणार हेही नैसर्गिकंच आहे. आजच्या निदान महाराष्ट्रीय समाजात तरी संख्येने सर्वाधिक ब्राह्मण संघ विचाराचे आहेेत पण ब्राह्मण म्हणले की तो संघावालाच असणार हा विचार पूर्ण अशास्त्रीय आहे.
आता प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की १९७० नंतर काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट यांच्याकडे ब्राह्मणांची संख्या कमी होते आणि संघात ती टिकून राहते किंबहुना वाढते हे कसे? याचे उत्तरही स्पष्ट आहे. जन्मानुजन्मे वर्चस्ववादाच्या ब्राह्मणी मानसिकतेला संघ धक्काही लावत नाही, उलट त्यांचा ‘सांस्कृतीक राष्ट्रवाद’ ब्राह्मणांना सुखावणारे आचार, विचार आणि उच्चार बाळगतो ! संघात असणारे बहुजन हे तेवढी सहिष्णुता अंगी असते म्हणूनच तिकडे टिकतात.
पण या प्रश्नाचे दुसरेही एक उत्तर आहे. काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट (सर्वांना मिळून यापुढे ‘पुरोगामी’ म्हटले आहे, अर्थात कोण्त्याच अर्थाने मी तिघांना एकाच तराजूत तोलणार नाही, ही फक्त या विवेचनाची सोय) यांच्याकडे संख्येने ब्राह्मण कमी होत गेले आहेत त्याचे कारण त्यांच्याकडे ब्राह्मणांना दिला गेलेला न्यूनगंड ! सतत शिव्याच ऐकाव्या लागत असतील तर तिकडे तेच राहतील ज्यांनी आपल्या अंगी अपार सहिष्णुता बाळगली आहे.
मला असे वाटे की जातीपातींचा सर्वात जास्त विरोध समाजवादी करतात. पण प्रत्यक्ष ‘साधने’च्या पुस्तक विक्री केंद्रात मी जेंव्हा संभाजी ब्रिगेडची पुस्तकं विकायला ठेवलेली पाहिली तेंव्हा मला धक्काच बसला ! हे आजही असेच आहे. अगदी परवा दाभोलकर सरांच्या स्मृती जागरणासाठी मनोहर मंगल कार्यालयात जी सभा लावण्यात आली त्या सभास्थानी बाहेर एका पुस्तकांच्या स्टाॅलवर मा़.म. देशमुखांचे “भांडारकर तो झांकी है, शनिवारवाडा बाकी है” नावाचे पुस्तक विक्रीला ठेवले होते ! ज्ञान भांडारांची तोडफोड करणारांचा वैचारिक अनुनय करण्या इतके वैचारिक दारिद्र्य कुठून आले हे कळायला मार्ग नाही. दाभोलकर सर विवेकाचा आवाज होते, विवेक हा विचारातून येतो, अभ्यास हा त्याचा गाभा असतो, अभ्यास केंद्राची तोडफोड करणारांचा अनुनय दाभोलकर सरांच्या स्मृती प्रसंगी करणे सर्वथा अनुचित ठरते.
पुरोगाम्यांच्या घोषवाक्यात फुले, शाहू, आंबेडकर आहेत मात्र त्याच विचाराचे आगरकर, कर्वे त्यांच्या जातीमुळे वर्ज्य आहेत. वैचारिक विरोधाभास असा आहे की तिकडे सरदार पटेलां़सारख्या कट्टर गांधीवाद्याला आपल्यात घेण्यास ज्यांच्यावर पटेलांनीच बंदी घातली तो संघ आटोकाट प्रयत्न करत आहे आणि इकडे ब्राह्मणांनी वाळीत टाकलेल्या आणि बहुजनांसाठी गीतेला मराठीत आणणार्या ज्ञानेश्वरांनाही जातीवरून वाळीत टाकण्यास पुरोगामी सज्ज आहेत ! दोघांचीही ही राजकीय ओढाताण आपण समजून घेतली पाहिजे.
होय, एक बाजू हिंदुत्ववाद्यांची आहे, दुसरी बाजू पुरोगाम्यांची आहे. पण एक तिसरीही बाजू आहे, ती सत्त्याची बाजू आहे! जो जो विचार सत्त्याच्या अधिकात अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करील तोच विचार काळाच्या ओघात टिकून राहील. विचारधारांचे अभिनिवेश सत्त्यापासून दूर गेले तर आजचा बुद्धीवादी तरूण त्याकडे पाठ फिरवील. आजच्या हिंदुत्ववादी आणि पुरोगामी विचारधारांना लक्षात घेतांना हे मुद्दे दुर्लक्षित करता येणार नाहीत.
(डॉ.विश्वंभर चौधरी यांच्या वॉलवरून साभार )