एक लाख निष्पाण लोकांचे बळी घेणार्या मुंबई-गोवा महामार्गाचं काय करता बोला..
कोकणाच्यादृष्टीनं मुंबई-गोवा महामार्गाचं महत्व वेगळं सांगण्याची गरज नाही.हा महामार्ग चौपदरी झाला तर कोकणच्या विकासाची गाडी सुसाट सुटेल याची मला खात्री आहे.परंतू हे होऊ नये यामध्ये सर्वपक्षीय नेते,अधिकारी आणि इतरांचे हितसंबंध गुंतलेले आहेत.त्यामुळंचं तर कोकणचा विकास असा खड्डयात हेलकावे खात असताना आणि 2008 पासून कोकणातले पत्रकार रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना सारेच नेते गप्पगार आहेत.एखादा लोकहिताचा विषय घेऊन पत्रकार दहा वर्षे सलग पाठपुरावा करतात ही लोकविलक्षण बाब आहे.देशात असं कुठंही घडलेलं नाही.त्यामुळं कोकणातल्या सर्व पत्रकाराचं अभिनंदन करावं लागेल,पण पत्रकाराचं हे आंदोलन यशस्वी होता कामा नये असा जणू चंगच सत्ताधारी आणि कोकणातील सर्वपक्षीय नेत्यांनी बांधला आहे की,काय कळत नाही.जे सरकार सावित्रीवरील पूल पाच महिन्याच्या विक्रमी वेळेत पूर्ण करू शकते मात्र महामार्गाचे काम दहा वर्षे रखडले तरी सरकारला घाम फुटत नसेल तर यामागं नक्कीच कोणाचे तरी हितसंबंध गुंतलेले आहेत हे नक्की .
.2012 ला महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू झालं.हे काम डिसेंबर 2014 ला पूर्ण होणं अपेक्षित होतं.मात्र आता डिसेंबर 2017 आहे.रस्त्याचं काम 25 टक्केही पूर्ण झालेलं नाही.पळस्पे ते इंदापूर या 80 किलो मिटरचंच मी बोलतोय.पुढचं तर अजून काहीच नाही.कधी ठेकेदार बदलो,कधी जमिन संपादनाचा विषय रखडतो तर कधी निधीच मिळत नाही.भूसंपादन अधिकारी तर पाच वर्षात पाच वेळा बदलले.प्रत्येक वेळी परत प्रकल्पग्रस्तांच्या मावेजाचा प्रश्न रेगाळत राहतो.हे सारं ठरवून होतंय हे वेगळं सांगण्याची गरजच नाही.पुणे-नाशिक या महामार्गाचं काम मुंबई-गोवा महामार्गानंतर म्हणजे 2014 ला सुरू झालं.हे काम तीन वर्षात 80 टक्क्यापेक्षा जास्त पूर्ण झालंय.कोणताही वाद नाही,अडथळा नाही.मग सारे वाद कोकणातच कसे निर्माण होत आहेत हे कळत नाही.चौपदरीकरण रखडंलंय आणि जो होता त्या रस्त्याची दुर्दशा झालीय.आम्ही परवा पनवेल ते पेण गेलो.या 30 किलो मिटरमध्ये आमची हाडं खिळखिळी झाली.स्थानिक सांगत होते वडखळच्या पुढं नागोठण्याच्या दिशेनं रस्ता हा रस्ताच राहिलेला नाही.वस्तुस्थिती तशीच आहे.त्यामुळं कोकणात मोठा असंतोष आङे.त्याचं प्रत्यंतर 5 डिसेंबरच्या पत्रकार आंदोलनाच्या निमित्तानं आलं.वडखळ येथे झालेल्या मानवी साखळी आंदोलनात पत्रकार तर होतेच त्याचबरोबर सभोवतालच्या गावातील सरपंच,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं होते.पुर्वी असं व्हायचं नाही.पत्रकाराचं आंदोलन म्हणून सारेच चार हात दूर राहायचे.जनतेचा संताप एवढा वाढलेला आहे की,या स्थानिक लोकप्रतिनिधींना आता दूर राहून चालणारं नाही.त्यामुळं महामार्गासाठीचं आंदोलन आता केवळ पत्रकाराचं न राहता लोकचळवळ होत आहे.हा मोठा बदल आहे.
जण संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी 26 जानेवारी हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतला आहे.26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे.या दिवसाचे पावित्र्य वेगळं सांगण्याची गरज नाही.परंतू गेल्या दहा वर्षात एक लाख निष्पाप लोक रस्त्यावर बळी गेल्यानंतरही जर सरकारचे डोळे उघडत नसताली तर सरकारचं डोकं ठिकाणावर नाही असंच म्हणण्याची वेळ येते.सरकारचं डोकं ठिकाणावर यावं यासाठी 26 जानेवारीचं आंदोलन आहे.या दिवशी कोकणातील पत्रकार आणि सामांन्य जनता काळ्या फिती लावून काम करतील.तसेच ज्या ज्या तालुक्यातून मुंबई-गोवा रस्ता जातो तेथील पत्रकार आणि नागरिक रस्त्यावर उतरून काळे झेंडे हातात घेऊन रस्त्यावर निदर्शने करतील .कोकणातील महामार्गावरच्या प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन होईल.या आंदोलनाच्या तयारीसाठी आम्ही कोकणातील तीनही जिल्हयात जानेवारीत प्रवास करणार आहोत.या दौर्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटून त्यांनीही आंदोलनात उतरावं यासाठी त्यांना गळ घालणार आहोत.हे आंदोलन करण्याची वेळ पत्रकारांवर येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे.त्या अगोदरच रस्त्यावरील खड्डे बुजविले जावेत आणि चौपदरीकरणाचे काम निर्धाऱित वेळेत पूर्ण करावे अशी आमची विनंती आहे.त्यासाठी एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीत नितीन गडकरी यांनाही भेटणार आहे.याबाबत न्यायालयात जाता येईल काय याचा वकिलांशी बोलून विचार केला जात आहे.महामार्गासाठीची ही लढाई आता केवळ लेखणीची लढाई न राहता ती सर्वबाजुंनी लढावी लागणार आहे.त्यासाठी आता कोकणी जनता आणि पत्रकार नक्कीच सज्ज झाले आहेत.वडखळला ही भावना आणि चित्र बघायला मिळाले.खड्यात गेलेला कोकणचा विकास पुन्हा मार्गावर आणायचा असेल तर हा महामार्ग लवकर झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं.
वडखळ आंदोलनासाठी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल आणि पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांनी बरेच परिश्रम घेतले.त्यांचे आभार व्यक्त करणे हा उपचार होईल.मात्र लढेगे,जितेंगे या आवेशानेच आपण पुढची लढाई लढणार आहोत यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत याची ग्वाही देतो.प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नही तेवढेच महत्वाचे आहेत आणि त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे.- एस.एम.देशमुख