कोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र

0
1181

भाजपने कोकणात हातपाय मारण्याचे प्रयत्न आता सोडून द्यायला हरकत नाही.किमान आज जाहीर झालेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल तरी हेच सूचित करतात.पाच-सहा नगरपंचायती आणि चार-दोन नगरपालिका,जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांच्या निकालावरून असा निष्कर्ष आपण कसा काय काढू शकतो ? असा प्रश्‍न  भाजपभक्त विचारू शकतात.अन्य प्रसंगी किंवा अन्य ठिकाणी हा प्रश्‍न  नक्कीच तर्कसंगत ठरू शकला असता.मात्र कोकणातला राजकीय इतिहास आणि साप्रतची स्थिती बघता नगरपंचायतीचे निकालही योग्य तो संदेश द्यायला पुरेसे आहेत हे निर्विवाद. “कोकणात आपल्याला स्थान नाही” हा शोध भाजपला आजच लागलाय असंही नाही. दिल्लीत आणि मुंबईत अधिराज्य गाजविणार्‍या भाजपला ते  नक्कीच माहिती आहे.”कोकणात आपल्याला कोणी विचारत नाही” याची खंतही भाजपला आहेच आहे.त्यामुळं कोकणच्या लालमातीत हातपाय मारण्याचे प्रयत्न भाजप नेते सातत्यान करीत असतात.त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून भाजपनं लोकसभा ,विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा प्रयोग केला.तो सपशेल फसला. शिवसेनेबरोबर असताना पुर्वी जिथं कमल दिसायचं अशा गुहागरसारख्या ठिकाणीही भाजपं वेगळं झाल्यावर  कमळ कोमेजून गेलं.पक्ष कोकणात अदखलपात्र ठरला. पनवेलची विधानसभा आणि नगरपालिका भाजपच्या ताब्यात असल्याचं दिसतंय खरं पण तो आभास आहे.तेथील विजयाचं श्रेय भाजपला देणं ठाकूर पिता-पुत्रांवर अन्याय कऱण्यासारखं होईल.तो विजय निखळ रामशेठ यांचा आणि धनशक्तीचा विजय आहे.त्यामुळे ठाकूर पिता-पुत्र जोपर्यंत भाजपमध्ये आहेत तो पर्यंत समाधानासाठी “पनवेल आमच्याकडं आहे” असं भाजप नेते जरूर  म्हणून शकतात.काही दिवस हे समाधान शेकापवाले उपभोगत होते,नंतर काही काळ कॉग्रेसनं हा आनंद घेतला.आज भाजप पनवेलकडं बघून खूष होतेय.एवढंच.रामशेठ यांनी पक्ष सोडला तर भाजप पनवेलमध्ये झिरो आहे.शिवाय रामशेठ कमळ हातात घेऊन फार खुषीत आहेत असंही नाही.त्यांना जी आश्‍वासनं दिली होती ती भाजपनं पाळली नाहीत अशी त्यांची तक्रार असते. आ.प्रशांत ठाकूर यांना लालदिवा हवा होता.देवेंद्र फडणवीस यांना रामशेठ यांचा राजकीय पुर्वइतिहास आणि त्याचं भाजपमध्ये येण्याचं कारणही माहिती असल्यानं ते त्यांच्या अपेक्षापूर्ण करीत नाहीत.ज्या भागात आपल्याला स्थान नाही आणि भविष्यातही ज्या भागात आपला पक्ष वाढण्याची सूतराम शक्यता नाही अशा कोकणासाठी एक मंत्रीपद देऊन जागा अडविण्यास फडणवीस तयार नाहीत.रामशेठ यांचा राजकीय आवाकाही त्यांना माहिती आहे.रामशेठ यांची नजर पनवेल विधानसभा आणि पनवेल नगरपालिकेच्या बाहेर जात नाही.(ते आपला पेपरही पनवेलच्या बाहेर पाठवायला तयार नसतात..)

म्हणजे पनवेलपुरतंच त्यांनी आपल्या राजकाऱणाला मर्यादित करून घेतलेलं आहे.अन्यत्र त्यांचा करिष्माही चालू शकत नाही हे देखील भाजपनेते ओळखून आहेत. रामशेठ ठाकूर यांना बळ दिलं तरी ते कोकणचे नेते होऊ शकत नाहीत याची खात्री भाजपला आहे.नगरपंचायतीच्या निकालानंतर भाजप नेत्यांच्या या म्हणण्याला अर्थ प्राप्त झाला आहे.पोलादपूर,तळा वगैरे भाग फार दूर आहे.तिथंपर्यत रामशेठ यांचे हात पोहचूच शकत नाहीत.खालापूर तर पनवेलला चिकटून आहे.मात्र तेथे एकही नगरसेवक भाजपला आणि रामशेठ यांना जिंकून आणता आला नाही.पक्षश्रेष्ठींना हे दिसत नाही असे नाही. रायगडमध्ये ज्या पाच नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यातील 82 जागांपैकी भाजपला एकही जिंकता येऊ नये ही गोष्ट सत्ताधारी पक्षासाठी लाजीरवाणीच नाही तर कोकण विषयक राजकारणाची फेरमांडणी करायला लावणारी आणि स्थानिक नेत्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.भाजपच्या पालकमंत्र्यांसाठीही ती काळजी करायला लावणारी गोष्ट आहे.खरं तर रायगडचं पालकमंत्रीपद सेनेला हवं होतं.पक्ष वाढीच्या हव्यासातून ते भाजपनं स्वतःकडं ठेवलं.ते ही हट्टानं.त्यासाठी प्रकाश मेहता यांची व्यवस्था केली गेली.तथापि त्यांनी रायगडच्या जनतेचा पुरता भ्रमनिराश केला.ते अभावानेच रायगडमध्ये दिसतात.रायगडचा सारा कारभार ते मुंबत बसूनच हाकतात.त्यामुळं “उंटावर बसून शेळ्या हाकणार्‍यांना” मतदार निवडणुकीत थारा देत नाहीत याची प्रचिती आली . प्रकाश मेहतांच्या बाबतीतही हेच घडलं.नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्तानं त्यांनी रायगड पिंजून काढला पण त्यांना मतदारांनी स्वीकारलं नाही.जे रायगडात दिसलं तेच रत्नागिरीतही .तिथं ज्या पोटनिवडणुका झाल्या तिथंही दिल्ली आणि मुंबईत सत्तेवर असलेल्या पक्षाला फार प्रकाश पाडता आलेला नाही.उलटपक्षी शिवसेनेनं आपली कामगिरी सुधारली आहे हे चित्र दोन्ही ठिकाणी दिसले. “पहिल्या पासूनच आम्ही कोकणात नाहीत” असं यावरचं भाजपं नेत्याचं कातडीबचाव विश्‍लेषण असू शकतं.ते चुकीचं नाही.पण त्यावेळेस पक्षाकडं सत्ता नव्हती.आज केंद्रात आणि राज्यात पक्षाकडं एकहाती सत्ता आहे.असं असतानाही एका महत्वाच्या प्रदेशात पक्षाला साधा भोपळाही फोडता येऊ नये ही हजम न होणारी बात आहे. कोणताही राजकीय पक्ष सत्तेचा वापर पक्ष वाढीसाठी करीत असतो.भाजप इतर ठिकाणी सातत्यानं हेच करीत  आहे.भाजपचा हा प्रयोग कोकणात मात्र यशस्वी होत नसेल तर भाजपला नक्कीच आत्मपरीक्षण कऱण्याची गरज आहे. खरं तर भाजप आणि शिवसेना हो दोन्ही पक्ष स्वतःला हिंदुत्वादी म्हणवून घेतात.असं असताही कोकणी मतदार एका हिदुत्वाला नाकारतो आणि दुसर्‍याला जवळ करतो असे जर चित्र दिसत असेल तर त्याची नक्कीच काही कारण आहेत.ती कारणं शोधण्याचा भाजप प्रामाणिकणे प्रयत्न करतोय आणि त्यावर उपाय शोधतोय असं कोकणात दिसत नाही.हे करायचे तर अगोदर  कोकणातील प्रजासमाजवादी आणि शेकाप सारख्या समाजवादी , डाव्या विचारांना संपवत शिवसेनेने आपली पाळेमुळे कोकणात कशी रोवली हे तपासून घ्यावं लागेल.शिवसेना हा कोकणी माणसाला आधार का वाटतो,? हे देखील तपासावं लागेलं.ते केल्याशिवाय आणि तो मार्ग अवलंबिल्याशिवाय भाजपला कोकणात जनाधार मिळणे अशक्य आहे.भगवे ध्वज हातात घेतल्यानं जनतेचं पोट भरत नाही.शिवसेनेने रोजगारापासून,मानसिक आधारापर्यंतच्या कोकणी माणसाच्या सार्‍या गरजा पूर्ण केल्यानंच कोकणात शिवसेना घट्ट रोवली गेली.”हाकेला ओ देणारा”, आपल्या हक्काचा पक्ष ही कोकणी जनतेची सेनेबद्दलची धाऱणा आजही बदललेली नसल्यानं रंग भगवा असतानाही भाजपच्या हातातील भगव्या रंगाला कोकणी माणूस का नाकारतो हे लक्षात यावं.डावे,आणि कॉग्रेसवाल्यांकडून उपेक्षा झालेल्या कोकणी माणसाला पहिल्यादा  आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम सेनेनं केलं.हे कोकणी माणूस विसरत नाही आणि म्हणून तो शिवसेनेला अतरही देत नाही.शिवाय  सत्तेचं वाटप करताना भाजपनं शिवसेनेवर अन्याय केला ही कोकणात दिसणारी भावना आहे.त्याबद्दलचा सुप्त राग कोकणात दिसतोच दिसतो आहे.त्यामुळं कोकणात तरी भाजपं शिवसेनेला आव्हान देऊ शकत नाही.शितावरून भाताची परीक्षा या न्यायानंही आपण आजच्या निकालावरून  हा निष्कर्ष नक्की काढू शकतो.भाजपला कोकणात स्थान नाही हे वास्तव अधोरेखीत कऱणारेच आजचे निकाल आहेत.

भाजपची कोकणात वाताहात झालीय आणि दुसरा राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉग्रेसला अच्छे दिन आलेत असं अजिबात नाही.कॉग्रेस या दुसर्‍या राष्ट्रीय पक्षांची स्थिती फार चांगली आहे असं नाही.किंबहुना कोकणात कॉग्रेसची सतत घसऱण सुरू आहे.कॉग्रेससाठी ही अधिक चिंतेची बाब आहे.याचं कारण असं की,कधी काळी कोकणात कॉग्रेसचा बर्‍यापैकी प्रभाव होता.अ.र.अंतुलेंसारखा नेता राज्याचं नेतृत्व करीत होता.तो पक्ष आज आसन्नमरण अवस्थेत येऊन ठेपलाय.  याची कारणमीमांसा त्या पक्षाच्या धुऱीणांनी कऱण्याची गरज आहे.पक्ष सत्तेवर होता तेव्हाही कोकणातील कॉग्रेस आत्मविश्‍वास गमविल्यासारखी सैरभैर झाली होती.राष्ट्रवादीच्या उदयानंतर तर कोकणातील कॉग्रेस नेते अधिकच खचून गेले. मात्र नारायण राणे कॉग्रेसमध्ये गेल्यानं पक्षात नक्कीच थोडं चैतन्य निर्माण झालं .पोटनिवडणुकांतील एका पाठोपाठ एक विजय मिळत  गेल्यानं कॉग्रेसला कोकणात गतवैभव निर्माण होईल असे भाकित राजकीय पंडित व्यक्त करीत होते.राणेंच्या या वादळात सेनेची कोकणात सर्वत्र पीछेहाट  होत होती.सेना विरोधकांसाठी हे चित्र आनंदाचे भरते आणणार होते.मात्र ही स्थिती दीर्घकाळ राहिली नाही.चार-दोन वर्षातच राणेंचं वादळ विसावलं.पुढं तर त्याना आपलं अस्तित्वही टिकविता आलं नाही.निवडणुकीत राणे पिता-पुत्रांचाही पराभव झाला.पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमानं कोकणात वावरू लागली.सत्तेवर असताना नारायण राणेंचा पराभव झाला.सत्ता नसताना विजयमाला सेनेच्या गळ्यात पडली होती.म्हणजे सत्ता तिकडे जनता हा भ्रम तेव्हा दूर झाला होता.भाजपनंही आज हा बोध घेण्याची गरज आहे.आज सेना सत्तेवर असली तरी सत्ता आहे म्हणून कोकण सेनेबरोबर आहे असं नाही.सेना सत्तेत असली तरी या सत्तेत असण्याच्या मर्यादा कोकणी जनतेला ठाऊक असल्यानं ते या सत्तेकडून काही मिळेल अशी अपेक्षा करताना दिसत नाहीत.मुळातच सेना आणि कोकणी माणसांमध्ये निर्माण झालेले गेल्या पंचवीस वर्षाचे नाते हे सेनेचे कोकणातील खरे भांडवल असल्यानं आजच्या निवडणुकातही दोन्ही राष्ट्रीय पक्षांना चारी मुंडया ची त कऱण्यात शिवसेनेला यश आलं आहे.शिवसेनेने रायगडमधील दोन नगरपंचायती जिंकल्या आहेत.अन्य ठिकाणी हा पक्ष दुसर्‍या स्थानावर आहे.सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून सेना पुढे आली आहे.जिल्हयातील नंबर एकचा पक्ष असंच सेनेचं आजचं स्वरूप आहे.तिकडं तळ कोकणातही काही पोटनिवडणुकीत सेनेनं विजय मिळविला आहे.हा विजय दुर्लक्षिता येणारा नाही.शिवसेनेचा आत्मविश्‍वास अधिक वृध्दींगत कऱणारा तो नक्कीच आहे.

प्रादेशिक पक्ष असला तरी राष्ट्रवादी हा कोकणातला एक महत्वाचा पक्ष आहे.राष्ट्रवादीनं रायगडात दोन नगरपंचायती जिंकल्या आहेत.तरीही तळा आणि खालापूरमधील राष्ट्रवादीचा पराभव पक्षासाठी धोक्याची  घंटा आहे. खालापूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व सुरेश लाड करीत आहेत.त्यांच्याच मतदार संघातला हा पराभव लाड यांच्यासमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा नक्कीच आहे.तिकडे तळे शहर सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांच्या मतदार संघात आहे.अगोदरच अवधूत तटकरे शंभर-दीडशे मतांच्या फरकानं विजयी झाले होते.त्यातच तळ्यात आता शिवसेना आलीय.अवधूत तटकरे यांच्यासाठी हे आव्हान न पेलवणारे आहे.अलिबाग नगरपालिका शेकापच्या ताब्यात आहे.आता खालापूर नगरपंचायत शेकापनं जिंकली आहे.शेकापच्या नेत्यांवर विविध आरोप होत असताना हा विजय त्यांच्यासाठी दिलासा देणारा ठरू शकतो.थोडक्यात राष्ट्रीय पक्षांना दणके देणारे आणि प्रादेशिक पक्षांनाही हातचं राखून कौल देणारे आजचे निकाल आहेत.रायगडच्या मतदारांनी ही समयसूचकता नेहमीच दाखविली  आहे.हे निकाल येणार्‍या जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी महत्वाचे होते त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली होती.

एस.  एम . देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here