कोकणात येतेय एमआयएम ?

0
968

हिंदु-मुस्लिम ऐक्याचं अनोख दर्शन नेहमीच कोकणात बघायला मिळतं.हा एकोपा दैनंदिन व्यवहारात तर जाणवतोच त्याचबरोबर मुस्लिम समजातील अनेक कुटुंबांची  आडनावं मराठी असल्यानं  हिंदू-मुस्लीम एैक्याची भावना कोकणात अधिक दृढ झालेली दिसते. दोन्ही समाज परस्पराशी  एकरूप झालेले असल्यानं किरकोळ घटना वगळता कोकणात जातीय दंग्यांचा इतिहास नाही.मात्र अलिकडं राजकारणी जातीयवादाला प्रोत्साहन देत असल्यानं या एकोप्याला कुठंतरी तडा जातोय की काय ? अशी भिती वाटायला लागली आहे.मध्यंतरी रायगड प्रेस क्लबच्यावतीने साजर्‍या केलेल्या जंजीरा मुक्ती दिनाच्या निमित्तानंही वाढत असलेल्या कडवेपणाचा प्रत्यय आला.श्रीवर्धन ,मुरूडला तर मुक्ती दिन साजरा झाला पण म्हसळ्यात मात्र मुक्ती या शब्दाला आक्षेप घेत काहींनी म्हसळ्यात जंजीरा मुक्ती दिनाचा कार्यक्रम होणार नाही याची काळजी घेतली.त्याला स्थानिक राजकारण्यांनीही बळ दिलं.परिणामतः म्हसळा नगरपालिकेत होणारा हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केला गेला. धर्म आणि जातीयवादाची ही विषवल्ली जाणीवपूर्वक तरूणांच्या मनात रूजविण्याचा प्रयत्न काही गट-राजकारणी करीत आहेत.त्याची पुढील पायरी म्हणून आता एमआयएमला कोकणात बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.म्हसळ्यातील काही मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नाराज झालेल्या काही  कार्यकर्त्याननी  पुण्यात जाऊन एमआयएमच्या नेत्यांशी चर्चा केल्याची बातमी आहे.या महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवडयात म्हसळ्यात एमआयएमचा मेळावा घेण्याचे नक्की झाले आहे.या वेळी एमआयएमचे दोन आमदार तसेच काही वरिष्ठ नेते उपस्थित राहतील .म्हसळ्यात जो मेळावा होणार आहे त्यात राष्ट्रवादीचे अनेक स्थानिक मुस्लीम कार्यकर्ते एमआयएममध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा आहे.’सुनील तटकरे यांच्या सामा्रज्याला धक्का देणे आणि त्यांच्या कुटुंबांची मनमानी रोखण्यासाठी एमआयएमचे हत्यार काही मुस्लीम गटांकडून उचललेले जात आहे असे एकूण  चित्र आहे . कोकणात कॉग्रेस खिळखिळी झाल्यानंतर आणि अंतुले यांचे वर्चस्व संपुष्टात आल्यानंतर सुनील तटकरे यांनी मुस्लिम नेत्यांना चुचकारत मुस्लीम व्होट बॅेंकेवर ताबा मिळविला होता.मात्र नगरपंचायतीच्या निवडणुकीत मुस्लिमांना डावलल्याचे निमित्त करीत काहींनी एमआयएमला निमंत्रण दिले आहे.खरंच म्हसळ्यात एमआयएम आली तर तो सुनील तटकरे यांच्या सामा्रज्याला मोठा धक्का  बसेल असे एमआयएमला आवतणं देणारांना वाटतंय.त्यात तथ्य नाही असंही नाही कारण  सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे केवळ पन्नास -साठ मतांच्या फरकाने विजयी झाले होते.अशा स्थितीत मुस्लीम मते एमआयएमकडे वळलली  तर ती तटकरे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.अर्थात राजकारणात काय व्हायचे ते होईल पण एमआयएमचा सगळ्यात मोठा धोका कोंकणातील  सामाजिक एकोप्याला आहे.एमआयएम ही कडवी जातीयवादी संघटना असून पक्षाचे नेते ओवेसी बंधूंच्या जहाल भाषणांनी सामाजिक तणाव निर्माण झाल्याच्या  अनेक घटना देशभर घडलेल्या आहेत..या पार्श्‍वभूमीवर कोकणात एमआयएम येतेय या बातमीने कोकणातील सामाजिक एकोपा कायम राहावा यासाठी प्रयत्न कऱणार्‍यांना नक्कीच चिंतेत टाकले आहे..कोकणात शिवसेनेने प्रभाव निर्माण केलेला आहे.आता एमआयएम येतेय म्हटल्यावर कोकणातही औरंगाबादसारखे मतांचे ( आणि समाजाचेही )  ध्रुवीकरण होणार हे नक्की.त्यातून संघर्षाची बिजेही रोवली जाऊ शकतात.शांत आणि निसर्गरम्य कोकणासाठी ही गोष्ट नक्कीच चिंता वाढावी अशी असणार आहे.अर्थात कोकणातील शांतताप्रिय आणि बंधुभावाने वागणारी जनता एमआयएमचे कितपत स्वागत करील याबद्दलही काहींना शंका वाटते.म्हसळ्यात स्थानिक राजकारणातून हे सारं घडत असलं तरी रायगडमधील अन्य भागातला मुस्लीम समाजाचे यासंदर्भात काय भूमिका असू शकते हे अद्याप समोर आलेलं नाही.

‘ऑल इंडिया मजलीस इत्तेहादूल मुसलमीन’ असे या संघटनेचे पूर्ण नाव आहे.1927 मध्ये हैदराबादेत स्थापन झालेल्या या संघटनेने हैदराबाद मुक्ती नंतरही हैदराबादेत चांगला जम निर्माण केलेला आहे.1984 पासून हैदराबादची लोकसभा जागा एमआयएमच्या ताब्यात आहे.तेलेंगणा विधानसभेतही एमआयएमचे सात सदस्य आहेत .एमआयएमचे महाराष्ट्रात  दोन आमदार निवडून आले असून मराठवाड्यात या पक्षांची चांगलीच पाळेमुळे रूजली आहेत.औरंगाबाद महापालिकेत दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून एमआयएम पुढे आलेला आहे.(एस एम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here