पत्रकार किशोर दवे यांच्या हत्येचा निषेध
गुजरातमधील जुनागड येथील जय हिंद दैनिकाचे ब्युरो चीफ किशोर दवे यांची काल रात्री अत्यंत निर्घृण हत्त्या करण्यात आली आहे.दैनिकाच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर निर्दयपणे वार करण्यात आले आहेत.या हत्याकांडामागे भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री रतिलाल सुरेजा यांचा मुलगा भावेश याचा हात असल्याचा आरोप आहे.या हत्याकांडाचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद तीव्र शब्दात धिक्कार करीत असून आरोपी कोण आहे याची पर्वा न करता त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे.
समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकार ,देशातील पत्रकार किती असुरक्षित आहेत हे गुजरातमधील घटनेने पुनश्च अधोरेखीत केले असल्याने आता केंद्रानेच पत्रकार संरक्षण कायदा करून तो तातडीने देशभर लागू करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.देशाच्या वेगवेगळ्या भागात पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत आणि दर चार-दोन महिन्याने एखादया पत्रकाराला आपले प्राण गमवावे लागत आहेत,या सर्व घटना संतापजनक,निषेधार्थ आणि लोकशाहीच्या नरडीलाच नख लावणार्या असल्याने सरकारला या घटनांकडे मुक-बधिरासारखे बघत बसता येणार नाही. तेव्हा आता आणखी पत्रकारांचे बळी जाण्याची वाट न बघता सरकारने तातडीने कायदा करावा अशी मागणी प्रसिध्दी पत्रकात करण्यात आली आहे. सरकारने कायदा करावा यासाठी देशभरातील पत्रकार संघटनांनी एकत्र येत सरकारवर दबाव आणला पाहिजे असे आवाहनही एस.एम.देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकात करण्यात आले आहे.