आम आदमी पार्टीतल्या सध्याच्या घडामोडी दिल्लीतील मतदारांचा पुन्हा भ्रमनिराश कऱणाऱ्या आहेत. पक्षानं केलेल्या चुकांचे माप मतदारांनी लोकसभा निवडणुकीत आम आदमीच्या झोळीत टाकलं होतं.नंतर केजरीवाल यांनी दिल्लीकरांची माफी मागितली.कॉग्रेसची भ्रष्ट राजवट आणि भाजपने अवघ्या नऊ महिन्यात दाखविलेल्या अरेरावीला कंटाळून दिल्लीच्या मतदारांनी पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला हात दिला.पक्षावर विश्वास टाकला.नेते बदलतील अशीही अपेक्षा दिल्लीकरांना होती.त्यामुळे कोणाच्याही स्वप्नात नव्हते एवढे मताधिक्य,जागा आम आदमीला दिले.अपेक्षा अशी होती की,आम आदमीचे नेते पुन्हा मागच्याच चुका कऱणार नाहीत.पण यह नही सुधरेंगे अशीच आम पक्षाची स्थिती आहे.त्यामुळे पाच साल केजरीवलाच्या घोषणा भलेही कार्यकर्त्यांनी दि्‌ल्ल्या असल्या तरी खरंच हे सरकार पाच वर्षे ही मंडळी चालवू शकेल काय याबद्दल मनात शंका निर्माण होते.
पेशवाईच्या अखेरच्या दिवसात जे वातावरण होतं तसं वातावरण सध्या आम आदमी पक्षात सध्या दिसतंय.कोणाचा पायपोस कोणात नाही,कोणाचा विश्वास कोणावर नाही,कोण कोणाचा विरोधक किंवा कोण कोणाचा समर्थक हे समजणं कठीण झालं आहे.माझ्यामुळंच पक्ष आहे याचा अहंकारही सर्वाच्याच मनात ठासून भरलेला आहे.त्यातून परस्परांच्या तंगडया ओढण्याची स्पर्धा लागली आहे.कोणतीही गोष्ट,कोणतीही चिठ्ठी गुप्त राहात नाही .सत्तेची चटकही सर्वांनाच लागलेली दिसतेय.जे सत्तेवर आहेत ते तोऱ्यात आहेत ज्यांना सत्ता मिळाली नाही ते नाराज आहेत.त्यातून सरकार अस्थिर कऱण्याचेही उद्योग चोरी छुपके सुरू आहेत.तसे आरोप जाहीरपणे व्हायला लागले आहेत.
मुळात प्रश्न एक व्यक्ती एक पदचा होता.खरं तर योगेंद्र य़ादव किंवा प्रशांत भूषण यांनी असा सूर लावण्याची येण्याची वेळच यायला नको होती.अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री होताच पक्षाचे निमंत्रकपद सोडायला हवं होतं.तत्वाच्या गोष्टी करणाऱ्यांनी काही स्वतः काही पथ्य पाळली पाहिजेत.ते होत नाही म्हटल्यावर आवाज व्यक्त झाला.यादव,भूषण यांची मागणी चुकीची नव्हती पण अशी मागणी म्हणजे केजरीवाल यांना विरोध असा अर्थ लावला गेला आणि त्यातून सुरू झाले मग रणकंदन.आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती.योगेंद्र यादव यांना पक्षाच्या पार्लमेंटरी ऍफियर्स कमिटीमधून बाजूला करण्यात आलं आहे.भूषण यांचीही अवस्था अशीच होणार आहे.यादव यांना पक्षाच्या शेतकरी आघाडीचं प्रमुख पद तर भूषण यांना कायदेविषयक आघाडीचं प्रमुखपद दिलं जाण्याची शक्यता आहे.हे दोघाचंही खच्चीकऱणच आहे.यादव आणि भूषण हे दोन पक्षाच्या स्थापनेपासून केजरीवाल यांच्याबरोबर होते.अनेक चढ-उतारात त्यांनी पक्षाला साथ दिली आहे.मात्र त्यांचे पंख छाटण्याचे आता काम सुरू झाले आहे.ते बाजुला गेले की,पक्षावर केजरीवाल यांचा एकछत्री अंमल सुरू होणार आहे.पक्षांतर्गत लोकशाही,साधनशुचितेच्या गप्पा मारणारा आम आदमी पक्ष देखील भाजप किंवा कॉग्रेस पेक्षा वेगळा नाही हे आता समोर यायला लागलं आहे.हळुहळु सत्तेचं राजकारण केजरीवाल आणि मंडळींना कळायला लागलं आहे.ही अधोगतीच्या दिशेने सुरू होणारी वाटचाल आहे.कुठलाही पक्ष असो,संघटन असो जोपर्यत सत्ता नाही तोपर्यत तो व्यवस्थित असतो,सत्ता आणि पैसा आला की,वाद सुरू होतात.आम आदमी पार्टीत हे सुरू झालेलं आहे.पक्षाचे आमदार आज केजरीवाल यांच्याबरोबर असल्याने लगेच सरकारला काही धोका नाही,पण केजरीवाल यांना पक्षांतर्गत लोकशाही मान्य नसेल तर हे आमदार फार काळ एकसंघ राहणार नाहीत.पक्षाचे संस्थापक असलेले यादव आणि भूषण यांची जर अशी अवस्था होऊ शकते तर आपल्यावरही अशीच वेळ येऊ शकते याची भिती पक्षातील प्रत्येक आमदाराला वाटल्याशिवाय राहाणार नाही.त्यामुळे यादव असतील किंवा भूषण असतील यांच्यावर कारवाई करून आपण पक्षातील बंडोबांना इशारा देण्याचा प्रयत्न केला असे जर केजरीवाल गटाला वाटत असेल तर तो आनंद त्यांना चिरकाळ भोगता येणार नाही.कारण यादव आणि भूषण यांचेही पक्षात अनेक समर्थक आहेत.ते गप्प बसून केजरीवाल यांची मनमानी चालू देतील असे नाही.ते पक्ष सोडणार नाहीत आणि त्यांना पक्षातून हाकालणे केजरीवाल यांच्यासाठी एवढे सोपे नाही.त्यामुळे नजिकच्या काळात आम आदमी पार्टीतही मोठा धमाका होऊ शकतो.आम आदमी पार्टीतली ही धुळवड देशातील आम आदमीला नक्कीच अस्वस्थ कऱणारी आहे.( एस.एम.)

LEAVE A REPLY