काश्मीरमध्ये पत्रकाराची हत्त्या

0
1061

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, संपादक शुजात बुखारी आणि त्यांचा सुरक्षा रक्षक दोघे ठार झाले. बुखारी श्रीनगरमधील रायझिंग काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक आहेत. ही घटना सांयकाळच्या सुमारास घडली. हल्ल्याबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. ईदनंतर भारतीय सुरक्षा दले दहशतवाद्यांविरोधात पुन्हा एकदा आक्रमक धोरण अवलंबण्याची शक्यता आहे.

सांयकाळच्या सुमारास श्रीनगरमधील प्रेस कॉलनीतील आपल्या कार्यालयातून बाहेर पडताना बुखारी व त्यांच्या सुरक्षारक्षकावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात बुखारी हे ठार झाले तर सुरक्षा रक्षकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यापूर्वी बुखारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हापासून त्यांना सुरक्षारक्षक पुरवण्यात आला होता. बुखारी यांची धाडसी पत्रकार म्हणून ओळख होती.

मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून ईदच्या आधी दहशतवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला असल्याची टीका केली. त्यांनी बुखारी कुटुंबीयांचे सांत्वनही केले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले. किती दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, बुखारी यांच्यावरच का हल्ला केला याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.(लोकसततवरून)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here