कोकणच्या विकासाचा चारपदरी महामार्ग

मुकी बिचारी कुणी ही हाका

अस्मितेच्या राजकारणाला बरे दिवस आले आहेत.जात,धर्म,भाषा,प्रांत यांच्या अस्मितेचे राजकारण करून सत्ते पर्यंत जाणारे पक्ष, नेते आपण पाहतोय. अशा प्रकारचे राजकारण करून लोकांचे लक्ष वेधता येते.सरकारला अडचणीत आणता येते.स्वतःचा अजेंडा पुढे रेटता येतो,पण लोकांच्या विकासाचे प्रश्न घेवून सरकारकडे गेले तर सरकार लक्ष देत नाही वा ज्या लोकांचे प्रश्न आहे ती लोक लक्ष देत नाहीत.कोणत्याही भागाचा विकास व्हायचा असेल तर पायाभूत सुविधा निर्माण करून देण्याची जबाबदारी सरकारची असते.कोकणात उद्योग,पर्यटन यावे असे वाटत असेल तर चांगले रस्ते,विमान वाहतूक,जल वाहतूक याची व्यवस्था सरकारने करून दिली पाहिजे.
कोकणात रेल्वे आली, सिंधुदुर्गात विमानतळ झाले.आता प्रतीक्षा रत्नागिरी विमानतळाची आणि मुंबई – गोवा चारपदरी रस्त्याची…..
या रस्त्याची जुलै २०२१ पर्यंतची स्थिती काय? कुठं पर्यंत काम झालं आहे? आणखी किती वर्ष या कामाला लागणार आहेत?खड्डे आणि अपघात यातून सुखरूप असा प्रवास कधी सुरू होणार?या सारखे असंख्य प्रश्न कोकणातील लोकांच्या मनात आहे.चौपदरी रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी या मुंबई- गोवा महामार्गावर दररोज एक- दोन अपघात होऊन यामध्ये काहींनी जीव गमावला तर काही जण गंभीर जखमी होऊन ते अपंग झाले आहेत.तर काहींची कुटुंब उध्वस्त झाली.
मुंबई ते गोवा या रस्त्याचे चौपदरीकरणाच्या कामासाठी किती वेळा राजकीय नेते किंवा स्वतःला पुढारी समजणारे लोक रस्त्यावर आले? मराठवाड्यातील बीड मधून कोकणात कामासाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख,दैनिक कृषीवलचे माजी संपादक यांनी मुंबईतील पत्रकार किरण नाईक आणि त्यांच्या सारख्या धडपडणाऱ्या रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील आपल्या पत्रकार मित्रांना सोबत घेवून पळस्पे ते चिपळूण या महामार्गावर अनेकदा आंदोलनांच्या माध्यमातून हा विषय लावून धरला नसता तर जेवढा रस्ता झाला आहे तेवढा ही तो झाला नसता. २ऑक्टोबर २००८ रोजी वडखळ नाक्यावर रायगडच्या पत्रकारांनी चारपदरी रस्त्यासाठी पहिले आंदोलन केले.सतत दोन तीन वर्ष पाठपुरावा केल्यानंतर डिसेंबर २०११ रोजी चारपदरी रस्त्याची पहिली कुदळ मारली गेली.रस्त्याचे श्रेय अनेक जण नंतर घेतील पण आपण तरी याची आठवण ठेवली पाहिजे.
ना लोकांना या विकासाच्या कामात रस आहे ना इथल्या लोक प्रतिनिधींना या कामात रस आहे. रस असलास तर तो कामात ठेकेदारी मिळण्यासाठी आणि टोलची कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी असू शकेल.कोकणी माणूस जाता येता सरकारला दोष देत,काय करायला पाहिजे हे गाडीत बसलेल्या आजूबाजूच्या माणसाला सांगत गावी येईल.मग गावात आल्यावर गावकी आणि भावकी मध्ये गुंतला की या महामार्ग,कोकण विकास या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करेल.पण आता ही मरगळ झटकून टाकायला हवी आणि संबधित यंत्रणेला प्रश्न विचारीत राहिले पाहिजे.
पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरच्या कामाला सुरुवात होवून दहा पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत.काँग्रेसच्या राजवटीत या कामाला सुरुवात झाली.त्यानंतर युतीचे शासन सत्तेवर आले.आणि आता महा विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे.पण इतक्या वर्षात हा रस्ताही पूर्ण होवू शकला नाही. पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी रस्त्याची स्थिती काय?
मुंबई,ठाण्याहून निघाल्या नंतर पेण जवळील रामवाडी,वडखळ येथील रस्त्यावर ब्रीज झाल्यामुळे वाहतूक वेगवान झाली खरी, पण पुढे गडब,देवळी इथ पर्यंत रस्ता सुस्थित आहे. पण पुढे पांडापुर,आमटेम,नागोठणे, वाकण,कशेळी खिंड,खांब,कोलाड, रातवड पुढे अंब्रेला हॉटेल पर्यंत इतकी वर्ष होवून ही प्रगती कुठे मंदावली ? दहा वर्षात पळस्पे ते वडखळ, गडब पर्यंत अंदाजे पस्तीस ते चाळीस किलोमीटर पर्यंतचा सलग रस्ता पूर्ण होवू शकला ? एवढी कासवगतीे कुणा मुळे? पुढे इंदापूर,माणगाव बाय पास कधी पर्यंत पूर्ण होणार ? जून २०२२ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल असे शासनाने माननीय उच्च न्यायालयात सांगितले असताना खरचं हा मार्ग या वेळेत पूर्ण होईल का याची शंका येते. पहिल्या टप्प्याच्या या रस्त्याच्या कामाचा वेग जर दरवर्षी फक्त ९ ते १० किलोमिटर एवढाच असेल तर आणि दहा वर्षा नंतर ही पळस्पे ते इंदापूर हे ८४ किलोमीटरचे अंतर पूर्ण होत नसेल तर या सरकारवर का आणि कशासाठी विश्वास ठेवायचा.
मुंबई ते गोवा या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्या नंतर मुंबई ते कोल्हापूर,मुंबई ते सोलापूर,मुंबई ते धुळे आणि औरंगाबाद हे चारपदरी मार्ग सुरू ही झाले मग कोकणच्या वाट्याला ही उपेक्षा का?
इंदापूर ते हातखंबा, पाली पर्यंत काम ज्या गतीने सुरू आहे ते पाहिल्या नंतर कोकणच्या माणसाच्या सहनशीलतेला सलाम करावासा वाटतो. कशेडी घाट उतरल्या नंतर खवटी पासून भरणा नाका,खेड रेल्वे स्टेशन इथला अपवाद सोडला तर आवाशी फाटा इथ पर्यंत होणाऱ्या टोल नाक्या पर्यंत रस्ता खरचं सुंदर आणि देखणा झाला आहे. लोटे पासून मात्र परशुराम घाट, चिपळूण,सावर्डे,संगमेश्वर, हातखंबा पर्यंत आनंदी आनंद आहे. आरवली ते लांजा या टप्प्यातील तर काम किती तरी दिवस बंदच होते.आता कुठे तरी याही कामाला सुरुवात झालेली दिसते आहे.
ही स्थिती केवळ रस्त्याची नाही तर या मार्गावर असलेल्या एस. टी.डेपोची सुद्धा आहे.पनवेल स्थानकचे नूतनीकरण सुरू आहे पण पुढे रामवाडी,इंदापूर,माणगाव,महाड, पोलादपूर,संगमेश्वर येथली बस स्थानके पुरातत्व विभागा साठी म्हणून शोभून दिसतात.आमच्या किंवा आमच्या आई वडिलांच्या लहानपणी पाहिलेल्या या बस स्थानकामध्ये आजही काडीचाही फरक झालेला नाही…,नाही म्हणायला चिपळूण स्थानकाचे काम सुरू आहे.
पनवेल पासून सावंतवाडी पर्यंत असलेल्या सर्व पक्षीय आमदार,खासदार कोकणातल्या या रस्त्याच्या प्रश्नावर कधी एकत्र येणार आहेत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोबत घेवून केंद्रीय रस्ते मंत्र्यांना कोकणातील जनतेची फिर्याद कधी ऐकवणार आहेत.
५ जुलैला महाराष्ट्र विधान सभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या दरम्यान कुणी तरी आमदारांनी पुढाकार घेवून कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटतील का ?
पनवेल ते सावंतवाडी दरम्यान अनेक अभ्यासू आमदार आहेत त्यांच्या पैकी कुणी तरी पुढाकार घेवून कोकणातील सर्व आमदार,खासदार यांची एकत्रित बैठक मुख्यमंत्री यांच्या सोबत लावली पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टर ला शेवटची डेड लाईन आणि पुरेसा निधी यासाठी आग्रह धरला पाहिजे.या राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांची आहे. खरं म्हणजे या कामासाठी राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे.ती राजकीय इच्छाशक्ती कोणत्याच राजकीय नेता आणि पक्ष यांच्याकडे नसल्यामुळेच दहा वर्षांहून अधिक काळ या रस्त्याचे काम कुर्म गतीने सुरू आहे..
पळस्पे ते झाराप हा चारपदरी मार्ग सरकारनेच न्यायालयाला दिलेल्या जून २०२२ या डेड लाईन पर्यंत पूर्ण झाला पाहिजे.सागरी महामार्ग,जल वाहतूक,रत्नागिरीचे विमानतळ आणि महत्वाचे म्हणजे रामवाडी पासून सावंतवाडी पर्यंतची सर्व एस. टी.स्थानके नव्याने बांधली पाहिजेत. राष्ट्रीय महामार्गाची ही दुरावस्था तर अंतर्गत गावातील रस्ते हा तर चीड आणणारा प्रश्न आहे.तो ही मार्गी लागला पाहिजे, यासाठी या सर्व लोक प्रतिनिधींनी राज्य आणि केंद्र सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. कोकणची माणसं साधी भोळी….. हे गाण्यात जरी ठीक असले तरी त्यांचा फार अंत बघू नका.मुकी बिचारी कुणीही हाका अशी त्यांची अवस्था करू नका एवढीच विनंती.
फक्त कोकणातील माणसांना आणि इथल्या राज्यकर्त्यांना एक आठवण करून देवू इच्छितो. राजकीय इच्छाशक्ती असली तर काय होवू शकते त्याचे एकमेव उदाहरण म्हणजे कोकण रेल्वे…..
जनता पक्षाचे सरकार असताना समाजवादी नेते प्रा.मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी अशीच राजकीय इच्छा शक्ती दाखवली आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन तयार केले आणि कर्ज रोखे उभारून कोकण रेल्वे सुरूही केली.आणि विकासाचे नवं दालन सुरू केले.या समाजवादी नेत्यांनी दाखवलेली इच्छा शक्ती या कोकणातील सर्व पक्षीय आमदार,खासदार यांनी दाखवून कोकणचा विकासाचा महामार्ग लवकरात लवकर सुरू करून द्यावा किमान इथल्या प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदार संघातून जाणाऱ्या रस्त्याचा जरी आग्रह धरला तरी कोकणातल्या विकासाची पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही..

शरद कदम,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here