एक हाक …पत्रकार मित्रासाठी..
अमोल जंगम हा रायगड जिल्हयातील म्हसळ्याचा पत्रकार. अचानक गेला.वय 32 असताना म्हणे ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो आपल्याला सोडून गेला.म्हसळ्यासाऱख्या दुर्गम भागात राहून लेखणीच्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत घेतलेल्या अमोलचं कुटुंबं त्याच्या जाण्यानं स्वाभाविकपणे एकाकी झाल.पत्रकार गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला ना समाजाला वेळ आहे ना सरकारला.अशा स्थितीत संघटनेनं पुढं आलं पाहिजे असं मला वाटतं.प्रकाश काटदरे गेले तेव्हा आपण सर्वांनी मिळून मोठी रक्कम जमा केली.ती त्यांच्या कुटुंबियांना दिली.काटदरेंच्या मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था आपल्याला करता आली.अमोल जंगमच्या कुटुंबाकडं उत्पन्नाचं कोणतंच साधन नाही असं समजलंय.एक सहा महिन्याची मुलगी आहे.
त्यामुळं त्यांना नक्कीच मदतीची गरज आहे.ती दिली गेली पाहिजे.एखादा कार्यक्रम झाला नाही तरी चालेल पण अडचणीत आलेल्या पत्रकाराला किंवा त्याच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे असं मला वाटतं.संघटना त्यासाठीच आहे.कुटुंब समजून आपण एकमेकांना मदत करू शकलो नाही तर ती संघटना असून नसून सारखीच आहे.सुदौवानं रायगडच्या पत्रकारांनी प्रेस क्लबला आपलं कुटुंब समजून नेहमीच अडचणीत आलेल्या पत्रकाराला मदत केलेली आहे.अमोलच्या बाबतीतही निधी जमा करून त्याच्या कुटुंबाला मदत करण्याची प्रेस क्लबची भूमिका स्वागतार्ह आणि कौतूकास पात्र आहे.मी प्रेस क्लबचे सर्व कारभारी आणि पदाधिकारी यांना त्याबद्दल धन्यवाद देत आहे. अमोलकडं अधिस्वीकृती नसल्यानं त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार नाही.त्यामुळं अमोलसाठी रायगडमधील प्रत्येक पत्रकारांनी एक हजार रूपये दिले तर मोठी रक्कम जमा होईल.मराठी पत्रकार परिषद 5,000 रूपये देत असून माझे व्यक्तीगत 1,000 रूपये मी देत आहे.आपण सारे मिळून एक लाख रूपये जमवू शकलो तर फुल नाही फुलाची पाकळी अशी मदत होऊ शकेल.सर्वांनी सहकार्य करावे अशी नम्र विनंती मी करीत आहे.अमोल जंगमच्या कुटुंबाला ज्याला मदत करायची आहे अशा दानशूर मित्रांनी संतोष पेरणे अध्यक्ष रायगड प्रेस क्लब यांच्याशी संपर्क साधावा.त्यासाठी फोन नंबर आहे 08698904001

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here