एका मित्राच्या सदिच्छा…

0
850

दत्ता जोशी हे औरंगाबादचे पत्रकार मित्र.पत्रकार संरक्षण कायद्यासाठी चळवळ सुरू होती तेव्हा त्यांनी आमच्या मागणीसच विरोध दर्शविणारी पोस्ट फेसबुकवर टाकली होती.कायद्याचा दुरूपयोग होऊ शकतो ही त्यांची तेव्हा रास्त तक्रार होती.मात्र तेव्हा मी अशा स्थितीत होतो की,कायद्याला विरोध करणारी भूमिका घेणारा प्रत्येकजण चळवळीचा विरोधक आहे असे समजून मी त्याच्यावर तुटून पडायचो.त्यामुळे दत्ता जोशी यांच्याशीही माझी फेसबुकवर गरमागरम चर्चा झाली.कालातराने कायदा झाला.परवा दत्ता जोशी यांची भेट झाली तेव्हा त्यांना कायदा कसा सर्वसमावेशक आहे हे सांगितले.कथा एका संघर्षाची हे पुस्तकही त्यांना भेट दिले.त्यानंतर खालील पोस्ट त्यांनी टाकली.मी त्यांचा आभारी आहे.दत्ता जोशी यांच्यासारख्या असंख्य मित्रांनी माझ्यावर विश्‍वास दाखविल्यामुळेच मी ही चळवळ पुढे नेऊ शकलो.
——————————————-
परवा पुण्यात एसएम देशमुखांशी गप्पा रंगल्या. एनआयबीएम चौकाच्या परिसरात असलेल्या त्यांच्या फ्लॅटमध्ये आमची भेट झाली. शोभना वहिनींच्या हातची कुरकुरीत खमंग भजी खात पावसाळी वातावरणाला रंगतदार करणार्‍या या गप्पा झाल्या त्या एसएम यांच्या लढवय्या प्रवासाला उजाळा देणार्‍या…! माझ्या भेटीचा अन्य हेतू होताच, पण पत्रकार संरक्षण कायद्याचा विषयही आपोआपच चर्चेला आला. कोणी काहीही म्हणो, एसएम देशमुख ठामपणे उभे नसते तर हा कायदा झाला नसता हे निश्चित…!

त्यांच्यातील लढवय्या पत्रकार अगदी प्रारंभीपासून जिवंत आहे. 1992 च्या सुमारास देवगिरी तरुण भारतात त्यांनी दिलेला लढा मी दुरून पाहिलेला आहे. तेथून ते नांदेडला लोकपत्रमध्ये गेले. तेथेही ‘ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे’चा प्रकार झाला. तेथूनही बाहेर पडले, कृषिवलला गेले. ते इतके रमले की जणू अलिबागकरच झाले. पत्रकार संरक्षण कायद्याच्या आंदोलनात त्यांना ती नोकरी गमवावी लागली आणि पाठोपाठ त्यानंतर मिळालेली दुसरी नोकरीही याच हट्टापायी गेली. लाखभर पगाराच्या दोन नोकर्‍या गमावूनही या माणसाने ‘हट्ट’ सोडला नाही, म्हणूनच कायद्याचे खरे श्रेय त्यांना.

मी याच व्यासपीठावरून या कायद्याला विरोध केलेला होता. तो विषयही गप्पांत आला. मग त्यांनी मला त्यांचे पुस्तक दिले. त्यात हा कायदा आहे. जी भीती होती ती त्यात दूर झालेली दिसतेय. या कायद्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा गैरवापर करणार्‍यावर तितक्याच परिणामकारकपणे कारवाई होऊ शकणार आहे, गुन्हा अजामीनपात्र असला तरी कुणीही उठून गुन्हा दाखल करावा, इतके हे सोपे नाही. उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याने प्राथमिक चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यासच गुन्हा दाखल होऊ शकणार आहे. खोटी तक्रार करणार्‍यास 3 वर्षे तुरुंगवास आणि अधिस्वीकृती रद्द होण्याची शिक्षा आहे. शिवाय 50 हजाराचा दंड वेगळाच. हे ठीक झाले…

पण हा कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी काय मेहनत घेतली, याचा प्रवास देशमुखांनी या छोटेखानी पुस्तकात रंजकपणे चितारला आहे. 2005 ते 2017 या काळातील हा संघर्ष, त्यात मिळालेली साथ आणि आलेले विपरीत अनुभव यांचे उल्लेखही त्यात आहेत आणि राजकीय नेत्यांच्या आश्वासनांचा पोकळपणाही. अशोक चव्हाण असोत की पृथ्वीराज चव्हाण, सगळ्यांनी तोंडाला पाने पुसली. अन्य नेत्यांनी विरोधच केला. या पार्श्वभूमीवर सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याबाबत घेतलेला पुढाकार, विधिमंडळात घेतलेली मंजुरी आणि कायदा राष्ट्रपतींकडे (पर्यायाने संबंधित सुमारे 17 केंद्रीय मंत्रालयांकडे) पाठविण्यासाठी केलेली धडपड या बद्दल एसएम यांनी गौरवोद्गार काढलेले आहेत.

एसएम हा माणूस मुळात चळवळ्या. कृषिवलमध्ये कार्यरत असताना केलेले लेखन, जपलेली सामाजिक बांधिलकी, रायगड जिल्ह्याची साद्यंत माहिती देणारे त्यांचे परिपूर्ण म्हणावे असे पुस्तक… हे सारे त्यांच्यातील जिवंतपणाचे लक्षण आहे. आमच्या मराठवाड्यातला माणूस बाहेर पडायला बिचकतो. त्या पार्श्वभूमीवर एसएम यांनी केलेला चौफेर प्रवास, दूर कोकणात जाऊन फुलविलेले कर्तृत्त्व मला कौतुुकाचे वाटते. कुठल्याही दैनिकाची नोकरी करायची नाही, असे ठरवून चार वर्षांपूर्वी त्यांनी पत्रकारितेला रामराम ठोकला, पण तरीही ते सक्रीय पत्रकार आहेतच… व्यापक समाज हितासाठी ही सक्रीयता कायम राहो ही सदिच्छा…

दत्ता जोशी ,औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here