एकमतच्या पत्रकारांची दिवाळी अंधारात कर्मचार्‍यांनाही अडीच महिन्यापासून पगार नाहीत कर्मचार्‍यांनी मांडली कामगार आयुक्तासमोर कैफिएत

औरंगाबादः इतरांवर होणार्‍या अन्याय,अत्याचाराच्या विरोधात नेहमीच आवेशानं लढा देणार्‍या पत्रकारांवरच अनेकदा अन्याय सहन करण्याची वेळ येते आणि हा अन्याय निवारण करण्यासाठी त्याच्या पाठिशी कोणीच नसते.मजिठियाच्या अंमलबजावणीच्या निमित्तानं याचा अनुभव येत असतानाच आता लातूर आणि औरंगाबाद येथून प्रसिध्द होणार्‍या एकमतचे प्रकरण पुढे आले आहे.पुरोगामी विचाराचे एकमत या नावाने चालणारे हे दैनिक इंडो इंटरप्रायजेस प्र.लिमिटेड या कंपनीच्यावतीन ेचालविले जाते.या दैनिकात औरंगाबाद आवृत्तीत काम करणार्‍या पत्रकार आणि कर्मचार्‍यांना अडीच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने या सर्वांची दिवाळी अंधारात आहे.बोनस तर सोडाच पण थकित वेतनही द्यायला व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्याने या पत्रकार आणि कर्मचार्‍यांनी आज औरंगाबादचे कामगार उपायुक्त अभय गीते यांची भेट घेऊन आपल्याला न्याय मिळावा अशी कैफियत त्यांच्याकडे मांडली आहे.त्यांना त्यासंंबंधीचे निवेदनही दिले असून थकित पगार लगेच मिळावा असा आदेश व्यवस्थापनाला द्यावा अशी मागणी या पत्रकार कर्मचार्‍यांनी केली आहे.उपायुक्तांनी पत्रकारांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पगार मिळावेत यासाठी सर्व कर्मचार्‍यांनी वेळोवेळी तोंडी आणि लेखी मागणी व्यवस्थापनाकडे केलेली आहे.मात्र व्यवस्थापनाने दाद दिली नाही.अडीच महिने पगार नसल्याने कर्मचार्‍यांचे प्रचंड हाल होत आहेत.अगोदरच तुटपुंजे पगार आणि वरती जो मिळतो तो ही पगार बंद असल्याने घरभाडे भरण्यापासून रोजच्या उपजिविकेपर्यंतचे सारेच प्रश्‍न निर्माण झाले आहेत.एकमत हे विलासराव देशमुख यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे दैनिक आहे.काही दिवसांपुर्वीच एकमतने औरंगाबाद आवृत्ती सुरू केली होती.मात्र कर्मचार्‍यांचे पगारच नसल्याने सर्व कर्मचारी त्रस्त आहेत.–एकमतच्या पत्रकारांच्या या लढयात मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती त्यांच्यासोबत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here