उदगीर,अंबाजोगाई,सेलू,ही मराठवाडयातील अशी काही गावं आहेत की,ज्यांनी मराठवाडयातील सांस्कृतिक,शैक्षणिक चळवळ समृध्द केली.उदगीरचं कौतूक अधिक यासाठी की,आंध्र आणि कर्नाटकच्या सीमेवरचं हे गाव.त्यामुळं कन्नड आणि तेलुगू संस्कृतीचाही प्रभाव येथील जनमानसावर असला तरी खास मराठवाडी संस्कृती हे गाव आजही विसरलेलं नाही.सीमेवरच्या गावांची काही दुःख नक्कीच असतात.सीमेवर असल्यानं त्यांची सर्वबाजुंनी उपेक्षाच होते.उदगीरचं काहीसं असंच झालं आहे.सास्कृतिक आणि शैक्षणिकदृष्टय समृध्द या गावाचा विकासाकडं मात्र म्हणावं असं लक्ष दिलं गेलं नाही.अनेकांना असं वाटतं की,लातूरचं विभाजन होऊन उदगीर हा नवा जिल्हा होऊ शकेल.अर्थात जिल्हा झाला म्हणजे विकास होतोच असा दावा कऱण्यासारखी स्थिती नाही.बीड,जालना,परभणी,हिंगोली, या मराठवाड्यातील जिल्हयांची अवस्था पाहिले म्हणजे मी काय म्हणतो याची प्रचिती येईल.या जिल्हयांची लोकसंख्या वाढली,फार तर इमारती वाढल्या पण पागल झालेला विकास इथंपर्यंत पोहोचलाच नाही.उद्या उदगीर जिल्हा झाला तरी फार बदल संभवत नाही.अर्थात हे सारं होईल तेव्हा होईल मात्र आज लातूरहून उदगीरला जायचं म्हणजे एक दिव्य असतं.हाडं खिळखिळे करणार्‍या या रस्त्यावर उदगीरची जनता वर्षानुवर्षे प्रवास करते आहे.उदगीर औरंगाबाद हा महामार्ग धारूर महामार्गे जाणार आहे म्हणे..परंतू या रस्त्याचं काम सुरू असल्याच्या कुठल्याही पाऊलखुणा मला दिसल्या नाहीत.महामार्गाचं चॉकलेट उदगीरच्या जनतेला किती दिवस दाखविलं जातंय माहिती नाही.हा महामार्ग होईल तेव्हा होईल पण लातूर हे जिल्हयाचं ठिकाण आहे.जनतेचा दररोज लातूरशी संबंध येतो तेव्हा हा रस्ता तरी व्यवस्थित व्हायला काय हरकत आहे..मात्र या रस्तयावरून जाताना आपण मराठवाडयात आहोत याची जाणीव सातत्यानं होत असते.

उदगीरची पत्रकारिता मात्र समृध्द आहे.सर्वत्र असतात त्याप्रमाणंच इथंही पत्रकारांच्या दोन प्रमुख संघटना आहेत.पण मला अप्रुप याचं वाटलं की,संघटना भलेही दोन असतील पण सारे पत्रकार एक आहेत.मी ज्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी गेलो होतो तो कार्यक्रम उदगीर तालुका मराठी पत्रकार संघचा असला तरी दुसर्‍या उदगीर तालुका पत्रकार  संघटनेचे बहुतेक सदस्यही या कार्यक्रमास उपस्थित होते.हे चित्र अन्यत्र अभावानेच दिसते.दोन संघटनाचं नातं भारत-पाकिस्तान सारखं असतं.इथं मात्र काही गैरसमजातून,संघटना विभागली गेली असली तरी एकोपा संपलेला नाही हे विशेष.दोन संघटना असल्यानं उपक्रमांची रेलचेल सुरू असते.तरीही सर्वांनी एकत्र यावं असं मला वाटतं आणि मी तसं बोलूनही दाखविलं.कारण  स्थानिक पातळीवर असू देत नाही तर राज्य किंवा देश पातळीवर असू देत सारे पत्रकार एकत्र झाले नाही तर पत्रकारांचे प्रश्‍न सुटणार नाहीत.महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सोळा संघटना एकत्र आल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन केली गेली त्यानंतरच पत्रकार संरक्षण कायदा झाला.हे आपण सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे.कोणतीही एक संघटना किंवा एक व्यक्ती हे यश मिळवू शकली नसती. उदगीरचे पत्रकार या अंगानं नक्कीच प्रयत्न करतील असा मला विश्‍वास आहे.दोन्ही संघटनांचे पत्रकार व्यक्तिगत माझे मित्र आहेत,माझ्यावर प्रेम कऱणारे आहेत.त्यामुळं या सर्वांना भेटून नक्कीच आनंद झाला.लोकांच्या प्रश्‍नांना भिडणारी,समाजाभिमुख पत्रकारिता हे उदगीरच्या पत्रकारांचं वैशिष्टय आता पर्यंत ऐकून होतो ते परवा प्रत्यक्ष अनुभवलं.उदगीरच्या पत्रकारांचा शहरातील प्रत्येक सामाजिक,सास्कृतिक चळवळीत सिंहाचा वाटा असतो हे देखील महत्वाचे आहे.किंबहुना उदगीरची सास्कृतिक चळवळ पत्रकारांना वजा करून पूर्ण होऊ शकत नाही एवढी ही सारी मंडळी चळवळीशी एकरूप झालेली आहे.मराठी पत्रकार परिषदेवरही दिलसे प्रेम करणारी,परिषदेच्या प्रत्येक अधिवेशनात हिरीरिने भाग घेणारी,परिषदेचे प्रत्येक उपक्रम निष्ठेनं राबविणारी ही मंडळी आहे.अशी सारी मंडळी परिषदेबरोबर आहे म्ङणूनच परिषदेचा दबदबा राज्यभर निर्माण झालेला आहे,हे सारं अभिमानास्पद आहे.

मराठवाडयाला पत्रकारितेची मोठी तेवढीच देदीप्यमान पत्रकारितेची परंपरा आहे.आ.कृ.वाघमारे,अनंत भालेराव ही नावं सर्व परिचित असली तरी मराठवाडयात प्रत्येक जिल्हयात अत्यंत निष्ठेनें सचोटिनं पत्रकारिता करणारे किंवा अशी पत्रकारिता करून निवृत्त झालेल्या पत्रकारांची मोठी फळी आहे.जीवनधर शहरकर यांचा अशा पत्रकारांमध्ये आवर्जुन उल्लेख करावा लागेल.लातूरमध्ये आज अनेक पत्रं असली आणि पत्रकारांची संख्याही शेकडयात असली तरी जुन्या काळात जीवनधर शहरकर हे असे पत्रकार होते की,ते बारा वृत्तपत्रांसाठी काम करायचे.निर्भिड,बेडर,सचोटीची पत्रकारितेचा नवा आदर्श जीवनधर शहरकर यांनी लातूरच्या पत्रकारितेला घालून दिलेला आहे.आज ते 89 वर्षांचे आहेत.लातूरच्या पत्रकारितेतील दीपस्तंभ म्हणूनच त्यांच्याकडं पाहिलं जातं.त्यांचा आणि सूर्यप्रकाश धूत या दोन ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार माझ्या हस्ते केला गेला.त्याबद्दल मी उधगीर तालुका मराठी पत्रकार संघाला मनापासून धन्यवाद देतो.अनेकदा आपल्या जवळच्या मानसाचं मोठेपण आपल्या लक्षात येत नाही.ती माणसं उपेक्षितच राहतात.उदगीर तालुका मराठी पत्रकार संघानं असं होऊ दिलं नाही.जीवनधर शहरकरांचा सन्मान त्यांनी केला.त्यांचा सत्कार म्हणजे एक ध्येयवादी ,तत्वनिष्ठ,आणि लोकाभिमूख पत्रकारितेचा सन्मा आहे असं मला वाटतं.कार्यक्रम छानच झाला..कोणाचा नामोल्लेख यासाठी करीत नाही की,कोणी विसरले तर ते नाराज होतील.सर्वांचे अभिनंदन आणि मला एका चांगल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल उदगीरकर तालुका मराठी पत्रकार संघाचे मनापासून आभार.ैया दौर्‍यात परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन,विभागीय सचिव विजय जोशी तसेच लातूर येथील पत्रकार श्री.घोणे हे माझ्या समवेत होते.(SM )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here