आ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..

0
2721

मतमोजणी केंद्रात अनधिकृत प्रवेश केल्याबद्दल शेकापच्या तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक आमदारावर गुन्हा दाखल

शेकापचे आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील, आ. धैर्यशील पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अनिकेत तटकरे यांच्यावर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग येथे 23 मे रोजी नेहुली क्रीडा संकुलमध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. यावेळी शेकापचे आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील, आ. धैर्यशील पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अनिकेत तटकरे यांनी अनधिकृत मतमोजणी ठिकाणी प्रवेश केल्याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक याना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

23 मे रोजी रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अलिबाग मधील नेहुली येथील क्रीडा संकुल येथे सुरू होती. मतमोजणी परिसरात प्रवेश करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळख पत्राद्वारे प्रवेश दिला जात होता. यासाठी ओळखपत्र दाखवून तपासणी करून आतमध्ये सोडले जात होते. ज्यांच्याकडे ओळखपत्रे नव्हती त्यांना प्रवेश दिला जात नव्हता.

23 मे 2019 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शेकापचे आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील (अलिबाग), आ. धैर्यशील पाटील (पेण), राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अनिकेत तटकरे (सुतारवाडी) हे चार जण मतमोजणी ठिकाणी मेन गेटवर आले. यावेळी चौघांही आमदाराकडे निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र नव्हते. यावेळी बंदोबस्तासाठी असलेले अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी डी. बी. निघोट यांनी चारही आमदारांना ओळखपत्र नसल्याने आत जाण्यास मज्जाव केला. त्यावेळी आम्ही आमदार आहोत असे बोलून पोलीस अधिकारी यांच्या बोलण्याकडे व सुचनाकडे दुर्लक्ष करून गेटमधून आत अनधिकृतपणे प्रवेश करून मतमोजणी केंद्रात प्रवेश केला.

याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील, आ. धैर्यशील पाटील व आ. अनिकेत तटकरे यांच्या विरोधात भा.द.वि.क 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई तोडकरी हे करीत आहे.

पत्रकार हर्षद कशाळकर मारहाण प्रकरणीही गुन्हा दाखल

23 मे रोजी मतमोजणी केंद्रात आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील, 25 ते 30 जण कार्यकार्ते यांनी अनधिकृत प्रवेश केला होता. यावेळी लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना जयंत पाटील, पंडित पाटील, अभिजित कडवे व 25 ते 30 जण यांनी मतमोजणी केंद्रात मारहाण केली.

याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील, अभिजित कडवे व इतर यांच्यावर भा.द.वि.क 143, 147, 149, 323, 504 मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3)135, 120 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि सागर कावळे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here