सरकारचा हास्यास्पद युक्तीवाद

0
954

महाराष्ट्रातील आमदारांनी दोन वर्षांपूर्वी विधानसभेत कसलीही चर्चा न करता स्वतःचे निवृत्ती वेतन 25 हजारावरून 40 हजार करून घेतले.तीन लाख कोटी रूपयांचे कर्ज ज्या राज्यावर आहे त्या राज्याच्या तिजोरीवर या निर्णयामुळं दरसाल 30 कोटी रूपयांचे अतिरिक्त बोजा पडलेला आहे.( आमदारांना 25 हजार रूपये पेन्शन असतानाच दरसाल जवळपास 90 कोटी रूपये सरकारी तिजोरीतून जात होते.नंतर पेन्शनमध्ये 15 हजार रूपयांची वाढ केल्यानंतर आणखी 30 कोटीचा बोजा तिजोरीवर पडला ) राज्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या या मनमानीच्या विरोधात राज्यात मोठी संतापाची भावना उमटली.मी देखील अस्वस्थ झालो,संतापलो .त्यातून मी एक जनहितयाचिका 25 ऑगस्ट 2012 रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.त्याची सुनावणी 12 डिसेंबर रोजी झाली.गुजरातसह अन्य काही राज्यात आमदारांना पेन्शन नाही.काही राज्यात अगदी पाच-सात हजार पेन्शन असल्याचे माझ्या वकिलांनी सप्रमाण न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्य न्यायाधीश मोहित शहा आणि न्यायमूर्ती बी.पी.कुलाबावाला यांनी या याचिकेची गंभीरपणे दखल घेत येत्या 19 तारखेपर्यत सरकारने आपले सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावे असे आदेश दिले.

गंमत आणि संतापाची बाब अशी की,काल जी सुनावणी झाली त्यात सरकारतर्फे संसदीय कार्य विभागाचे सहसचिव सुहास देशपांडे यांचे प्रतिज्ञापत्र सादर कऱण्यात आले आहे.यामध्ये पेन्शन वाढीचे समर्थन करताना जो युक्तीवाद केलाय तो केवळ हास्यास्पदच नाही तर राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे.प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, “आमदारांची पेन्शनची मागणी पन्नास हजार रूपयांची असताना सरकारने केवळ पंधरा हजाराची वाढ करीत चाळीस हजार पेन्शन केली आहे..” .धनदांडग्या आमदारांना दहा हजार रूपये कमी देऊन सरकारने राज्यातील जनतेवर महान उपकार केले आहेत असा या प्रतिज्ञापत्राचा अर्थ होतो.माझे वकिल प्रदीप पाटील यांनी प्रतिज्ञापत्राला आक्षेप घेत “त्यात मुळ मुद्याला बगल देण्याचा प्रय़त्न केल्याचे” न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.त्यावर न्यायालयाने सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र नव्याने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.आता 19 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.गेली दोन वर्षे मी या विषयाचा पाठपुरावा करतोय.न्यायालयाचा निकाल माझ्या बाजुने लागला तर गर्भश्रीमंत आमदारांच्या खिश्यात जाणारे महाराष्ट्रातील गरीब जनतेचे 30 कोटी रूपये दरसाल वाचणार आहेत.दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी नक्कीच 30 कोटींची रक्कम मोठी आहे.त्यासाठी आपल्या शुभेच्छा मला हव्या आहेत.(SM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here