आपण जिंकलोत, महाराजांची मानवंदना परत सुरू होणार

1
993

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना गेली अनेक वर्षे मानवदना दिली जायची.दररोज सुर्योदयापुर्वी चार पोलिस गडावर यायचे आणि होळीच्या माळावरील महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना द्यायचे.पोलिसाना दोन अडिच तास गडावर यायला आणि तेवढाच वेळ खाली जायला लागायचा.मात्र नंतरच्या काळात रोप-वे झाल्यानं त्याचं काम बरंच सुलभ झालं.असं असतानाही आर्थिक तरतूद नसल्याचं कारण देत ही मानवंदनेची चांगली पृथा सरकारने अचानक बंद केली.हा निर्णय कोणी घेतला,कोणाच्या सूचनेवरून घेतला गेला.हे गुलदस्त्यात आहे.पण शासकीय मानवंदना बंद पडली.याचं दुःख प्रत्येक शिवप्रेमींना होतं. एकीकडे भिडे गुरूंजींच्या संस्थेचे शिवभक्त कार्यकर्ते उन्हाळा,पावसाळा,किंवा थंडीची तमा न बाळगता दररोज साताऱ्याहून गडावर येतात महाराजांना अभिषेक करतात आणि परत जातात.त्याना कधी कोणाच्या मदतीची, निधीची आर्थिक तरतुदीची गरज भासली नाही.कारण हा प्रश्न निष्ठेचा,शिवरायांवरील प्रेमाचा आहे.राजकारण्याचं शिवरायांबद्दलचं प्रेम केवळ त्यांच्या नावाचं राजकाऱण कऱण्यापुरतंच आहे,हेच मानवंदना बंद करून राजकारण्यांनी दाखवून दिलं .
मागच्या पंधरवाड्यात रायगड प्रेस क्लबची एक बैठक रायगडावर झाली.त्यासाठी रायगडातील बरेच पत्रकार उपस्थित होते.गडावर आमचा सगळ्यांचा मुक्काम होता.या निमित्तानं रायगडावरील प्रश्न आम्हाला अभ्यासता आले.वीज बिल न भरल्यानं वीज पुरवठा खंडित केला गेला होता.त्या संदर्भात संतोष पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिका़ऱ्यांची भेट घेऊन तो विषय मार्गी लावला.पण त्यापेक्षाही गंभीर गोष्ट आमच्यासमोर आली ती,गेली सहा वर्षे होळीच्या माळावर महाराजांना दिली जाणारी मानवंदना बंद असल्याची.या संबंधीची एक पोस्ट काल मी हॉट्‌स ऍपवर टाकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे सर्वत्र संतप्त भावना व्यक्त झाली.एबीपी माझाचे संपादक आमचे मित्र राजीव खांडेकर आणि मी मराठीचे कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांनी हा विषय दिवसभर लाऊन धरला.वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या.निलमताई गोऱ्हे यांनी ही मानवंदना युतीनं सुरू केली आणि आघाडीनं बंद केली असं सांगितलं.हा विषय लोकभावना,लोकश्रध्देचा असल्यान कोणी सुरू केली कोणी बंद केली यात कोणाला रस असण्याचं कारण नाही.आर्थिक तरतूद नसल्यानं ती बंद केली गेली ही संतापाची गोष्ट होती.दोन्ही संपादकांनी हाच मुद्दा रेटून धरला.अखेर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घोषणा करावी लागली की,मानवंदना परत सुरू केली जाईल.त्यांनी तसे आदेश राज्याच्या पोलिस महानिरिक्षकांना दिल्याची बातमी मी मराठीने दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा विषय समोर येताच संवेदनशिलता दाखवत,राज्यांतील जनतेच्या भावनांचा आदर करती मानवदना सुरू कऱण्याचा निर्णय़ जाहीर केला त्याबद्दल सरकारचे आभार.त्याच बरोबर राजीव खांडेकर आणि तुळशीदास भोईटे यांनीही विषयाचं गाभीर्य़ लक्षात घेत हा विषय लावून धरल्याबद्दल दोन्ही संपादकांना मनापासून धन्यवाद.तसेच माझ्या पोस्टवर अनेक मित्रांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून सरकारवर दबाव आणला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.विषयाला वाचा माझ्या पोस्टनं फोडली गेली असली तरी आपल्या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून सरकारला मानवंदना परत सुरू करण्याची घोषणा करावी लागली ही गोष्ट महत्वाची आहे.
एक महत्वाचा विषय काल सकाळी उपस्थित केल्यानंतर रात्रीपर्यत तो मार्गी लागला याचा मनस्वी आनंद काल झाला.रात्री मस्त झोप लागली.

1 COMMENT

  1. एबीपी माझा सारख्या हिंदू,रा.स्व.संघ,भाजप,शिवसेना विरोधी वृत्त वाहिनीच्या संपादकाकडून या विषयाचा पाठपुरावा केला गेला हे कौतुकास्पद आहे. (संदर्भ: मागील महिनाभरात माझा विषेश कार्यक्रमात सन्माननीय श्री. प्रसन्न जोशी यांनी ओकलेली हिंदू विरोधी गरळ आणि उधळलेली मुक्ताफळे). श्री. राजीव खांडेकर हे जर माझ्या अभिप्रायाशी सहमत नसतील तर त्यांना नम्र विनंती की येथून पुढे, मुद्रित माध्यमाप्रमाणे ” या वाहिनीवरील कार्यक्रमांत व्यक्त झालेल्या सर्व मतांशी संपादक सहमत असेल असे नाही” अशी तळटीप सतत दाखवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here