आपची दमबाजी थांबली नाही तर राज्यातील आपच्या कार्यालयासमोर पत्रकार निदर्शने कऱणार

0
677

आपल्या वागण्या-बोलण्यातील दुटप्पीपणा चव्हाट्यावर येत असल्याचे पाहून पिसाळलेल्या आपच्या नेत्यांनी राजकीय विरोधक सोडून माध्यमांनाच आपले विरोधक समजत माध्यमांवर शाब्दिक  हल्ले सुरू केले आहेत.देशातील माध्यमं विकली गेली आहेत,माध्यमांची निवडणूक आयोगाकडं तक्रार केली जाईल इथ पासून सत्ता आल्यास माध्यमवाल्यांना तुरूंगात डांबण्यापर्यतची भाषा आपचे नेते वापरू लागले आहेत.पायाखालची वाळू सरकू लागल्याने आपच्या नेत्यांचा तोल सुटला असल्यानेच ते माध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या वक्तव्याचा आणि माध्यमांना दिल्या जात असलेल्या धमक्यांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज निषेध केला आहे.

आपच्या नेत्यांची ही दम बाजी थांबली नाही तर त्यांच्याच पध्दतीने राज्यातील पत्रकार आपच्या  ठिकठिकाणच्या कार्यालयांसमोर निदर्शने कऱतील असा इशाराही पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने दिला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी  सत्ता आल्यास माध्यमांना तुरूंगात टाकण्याची भाषा काल नागपूरमध्ये शाही खाण्याच्या वेळी केली आहे.त्यांच्या या वक्तव्याचे आज आशुतोष,संजय सिंह आणि अन्य नेत्यांनी दिल्लीत समर्थन केले एवढेच नव्हे तर माध्यमांची निवडणूक आयोगाकडे तक्रार कऱण्याची धमकीही त्यांनी दिली.आपच्या नेत्यांचे हे वर्तन माध्यमांची मुस्कटदाबी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून भारतातील माध्यमं त्यांचा हा प्रय़त्न कदापिही यशस्वी होऊ देणार नाहीत.माध्यम स्वातंत्र्याचे समर्थन करीत लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेले केजरीवाल आज माध्यमांमुळेच आपला दुप्पटीपणा उजेडात येत असल्याने माध्यमांना दम देत सुटले आहेत.त्यांच्या या दमबाजीला देशातील माध्यमं भीक घालणार नाहीत असेही देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here