आधारची माहिती केवळ पाचशे रूपयांत विकली जाते अशी बातमी द ट्रिब्युनच्या प्रतिनिधी रचना खेरा यांनी दिल्यानंतर सरकारच्या नाकाला जबरदस्त मिर्च्या झोंबल्या.सरकारनं याचा इन्कार तर केलाच शिवाय रचना खेरा यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला.मात्र या घटनेला अजून चार दिवसही उलटत नाहीत तोच सरकारनं आता सुरक्षित पर्याय म्हणून व्हर्च्युअल आयडी म्हणजे सांकेतिक आभासी क्रमांक देण्याची सोय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी आधार क्रमांक दिल्यानंतर या व्यक्तींची सर्व माहिती त्र्ययस्थांच्या हाती पडून तिचा दुरूपयोग होऊ नये म्हणून आधारधारकांना आता एकदाच वापरता येईल असा आभासी नंबर देण्याची व्यवस्था केली जात आहे असं सरकारनं जाहीर केलं आहे.याचा अर्थच असा की,रचना खेर यांनी दिलेली माहिती..बातमी बरोबर होती म्हणूनच सरकारला असा बदल करावा लागला आहे.त्यामुळं आता सरकारनं रचना खेर यांच्यावरील गुन्हा मागे घेऊन त्यांची दिलगीरी व्यक्त केली पाहिजे. सविस्तर बातमी खालील प्रमाणे

आधारच्या सुरक्षेसाठी सरकारची नवी योजना;
१२ आकड्यांऐवजी ‘व्हर्च्युअल आयडी’ आणणार

१ जूनपासून ही सुविधा होणार अनिवार्यनवी दिल्ली : आधारचा डेटा सुरक्षित नसल्याचा दावा माध्यमांतील वृत्तांमधून करण्यात आल्यानंतर आधारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब युआयडीने गांभीर्याने घेतली असून आधारचा डेटा अधिक सुरक्षित करण्यासाठी पावलले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आधारच्या १२ आकड्यांऐवजी आता व्हर्च्युअल आयडी आणण्याची योजना सरकारने आखली आहे. याद्वारे प्रत्येक आधार कार्डचा एक व्हर्च्युअल आयडी तयार करता येणार असून तो बदलता राहणार आहे. यामुळे नागरिकांना त्यांचा १२ आकडी आधार क्रमांक कोठेही देण्याची गरज भासणार नाही. तर १६ आकड्यांचा व्हर्च्युअल आयडी द्यावा लागेल. युआयडीच्या माहितीनुसार, व्हर्च्युअल आयडीची ही सुविधा १ जूनपासून अनिवार्य करण्यात येणार आहे.
युआयडीने सांगितले की, १ मार्चपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर १ जूनपासून ती अनिवार्य करण्यात येणार आहे. म्हणजेच १ जूनपासून सर्वच एजन्सींना ही योजना राबवण्यासाठी सोय करावी लागणार आहे. यानंतर कोणतीही एजन्सी व्हर्च्युअल आयडी स्विकारण्यास नकार देऊ शकणार नाही.
व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय? किंवा तो कसा काम करेल?
युआयडीच्या माहितीनुसार, हे मर्यादित केवायसी असेल. यामुळे संबंधित एजन्सींना देखील आधारची डिटेल मिळवण्याची परवानगी नसेल. या एजन्सीदेखील केवळ व्हर्च्युअल आयडीच्या आधारे सर्व काम पूर्ण करु शकेल. यामुळे बँका, फोन कंपन्या किंवा इतर योजनांसाठी आधार क्रमांक देण्याऐवजी हा व्हर्च्युअल क्रमांक द्यावा लागेल या क्रमांकावर संबंधीत एजन्सीला ग्राहकाचे छायाचित्र, घराचा पत्ता आणि नाव यांसारखी माहिती उपलब्ध होऊ शकेल. मात्र, ग्राहकाचा आधार क्रमांक मिळणार नाही. काही सेकंदापुरताच हा व्हर्च्युअल आयडी वैध राहणार असून त्यानंतर नवा आयडी तयार होईल. नवा क्रमांक तयार झाल्यानंतर दुसरा क्रमांक तत्काळ रद्द होणार आहे. त्यामुळे ग्राहकाच्या आधार क्रमांकापर्यंत कोणालाही पोहोचता येणार नाही. किंवा या क्रमांकाची गरजही पडणार नाही. त्यामुळे आधारचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहिल, असा दावा युआयडीने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here