21 मे 1991 चा दिवस आमची सत्वपरीक्षा पाहणारा होता.मी तेव्हा नांदेडच्या लोकपत्रमध्ये वृत्तसंपादक म्हणून कार्यरत होतो.कमलकिशोर कदम यांच्या मालकीचं हे दैनिक सुरू होऊन जेमतेम तीन महिनेही झालेले नव्हते.आरंभीच्या काळात दैनिकात ज्या अडचणी  येत असतात अशा  अनेक अडचणी  आम्ही फेस करीत होतो.एडिशनच्या वेळा पाळता-पाळता सार्‍यांचीच दमछाक व्हायची.’त्या दिवशी’ही आमची अशीच धावाधाव सुरू होती.सायंकाळची 6 ची अकोला-अमरावतीची आवृत्ती 7 वाजता छपाईला गेली होती.पुढच्या आवृत्तीचं काम सुरू होतं..तेवढ्यात अनिकेत कुलकर्णी धावात माझ्याकडं आला.सांगत होता..’एसेम,कॉम्प्युटर सिस्टीम बंद पडलीय..अंक निघणं कठीण आहे’ .नंतर इंजिनिअरला बोलावलं.त्याचे प्रयत्न सुरू होते..मात्र रात्रीचे साडेदहा वाजले तरी कॉम्प्युटर सुरू होत नव्हते.फेब्रुवारीत अंक सुरू झालेला..मे मध्येच अंक निघाला नाही अशी नामुष्कीची वेळ येऊ नये म्हणून माझे हर प्रकारे  प्रयत्न सुरू होते.यश येत नव्हतं.नांदेडला तेव्हा कॉम्प्युटर फार नव्हते.नवीनच टेक्नॉलॉजी होती सारी..त्यामुळं शहरात इतर कोणाची मदत घ्यावी  अशी ही  परिस्थिती नव्हती.

आम्ही सारेच तणावात होतो .एवढयात रात्री साधारण पावणेअकराच्या सुमारास राजीव गांधी यांची हत्त्या झाल्याची बातमी पीटीआयवर आली.ती बातमी वाचून माझ्या पायाखालची वाळूच सरकली.कमलकिशोर कदम तेव्हा कॉग्रेसमध्ये होते.राजकीयदृष्टया आणि वाचकाच्या दृष्टीने  या बातमीचं महत्व वेगळं सांगण्याची गरज नव्हती.राजीव गांधी यांची हत्या झालेली आणि त्याच दिवसी कॉग्रेस नेत्याचा पेपरच निघाला नाही यातून संदेश चुकीचा जाणार होता.त्यामुळं आकाश-पाताळ एक करून मला अंक काढणं आवश्यकच होतं.काय करावं कळत नव्हतं.शिवाय कोणताही निर्णय मी एकटा घेऊ शकत नव्हतो.तेव्हा संतोष महाजन हे आमचे संपादक होते.त्यांना गाडी पाठवून बोलावून घेतले.चर्चा केली.एक पर्याय असा समोर आला की,इलेक्टॉनिक टाइपरायटर आणायचे त्यावर बातम्या कंपोझ करायच्या,त्या कटिंग पेस्टींग करून पानावर लावायच्या आणि त्याची फिल्म काढून प्लेट तयार करायची.दोन इलेक्टॉनिक टाइपरायटर एमजीएममधून मागवून घेतले.तरीही प्रयत्न यशस्वी होत नव्हते.या धावपळीत एक-दीड तास उलटून गेला होता.मधल्या तीन एडिशन गेल्याच नव्हत्या.मात्र काहीही करून शहर आवृत्ती निघणं अगत्याचं होतं.एक कल्पना अशी सूचली की,अंक पूर्ण हातानं लिहून काढायचा.असा प्रयोग यापुर्वी कधी कोणी केल्याचं ऐकिवात नाही.तरीही तो मार्ग चोखळायचं ठरविलं.दुसरा मार्गही नव्हताच. ज्यांचं अक्षर चांगलं होतं अशा सर्व उपसंपादकांना बसवलं.माझंही अक्षर त्या काळात बरं होतं.मी एन्ट्रो वगैरे तयार केला.बातमीचा मथळा आर्टिस्ट कडून तयार करून घेतला.बातमीचं महत्व आणि वर्तमानपत्राची भूमिका बघता अग्रलेखही लगेच जायला हवा होता.संपादकांनी आर्टिस्टला तो डिक्टेट केला.तो पहिल्या पानावर लावला.राजीव गांधींचे अगोदरचे आणि हत्येचे भरपूर फोटो वापरून चार पानी अंक तयार केला.नांदेड,परभणी,हिंगोली,आदि जवळच्या जिल्हयात शहर आवृत्तीच जायची.घटना रात्री साडदहा-अकराची असल्यानं त्या भागात औरंगाबादहून जे पेपर यायचे त्यामध्ये ही बातमी असण्याची शक्यता नव्हती.एजन्टांनाही हे माहिती होते.त्यांचे अंक वाढीसंबंधीचे फोन सारखे खणखणत होते.दररोज आम्ही 30-35 हजार अंक छापायचो.त्या दिवशीची आमची प्रिन्ट ऑर्डर 80 हजारावर गेलेली होती.मशिन आजच्यासारखी हायस्पीड वगैरे नव्हती.अंक छपायला उशिर होणार हे ही दिसत होतं.म्हणजे जे काही करायचं ते गतीनं होणं आवश्यक होतं.पाच-सात उपसंपादक बातम्या लिहित बसले.जेवढं महत्वाचं होतं ते लिहून झालं होतं.प्रतिक्रिया वगैरेही दिल्या गेल्या. चार पानी अंक हातानं लिहून पहाटे अडीचच्या सुमारास छपाईला पाठविला आणि आम्ही सुटकेचा निःश्‍वास सोडला..पहाटे अंक घेऊनच घरी गेलो.अपेक्षेप्रमाणं फक्त लोकपत्रमध्येच बातमी होती.परिणामतः अंकाचं जोरदार स्वागत झाले . आमची अडचण वेगळी होती तरी राजीव गांधी यांची हत्त्या झाल्यामुळं अंक हातांनी लिहून काढलाय असाच वाचकांचा समज झाला  होता.आम्ही परिस्थितीला शरण न जाता जिद्दीनं अंक काढला म्हणून आम्ही सारे खुषीत होतो.

घरी जाऊन जेम-तेम दोन-तीन तास झोपलो असेल..सकाळी दहाच्या सुमारास ऑफीसमधून फोन आला.कमलबाबूंनी तुम्हाला दुपारी एक वाजता ऑफिसमध्ये बोलावलंय असं सांगितलं गेलं.आनंद वाटला.कारण कॉम्प्युटर सिस्टीम बंद पडलीय हे मालकांना माहिती होतं.अशा स्थितीत एसेमनं अंक काढला म्हणून मालक आम्हाला शाबासकी देणार असतील,आमची पाठ थोपटणार असतील म्हणून बोलावलं असेल असा माझा समज होता . एक वाजता आम्ही कार्यालयात पोहोचलो.मालकही आले.गाडीतून उतरतानाची त्यांची देहबोली ते संतापले आहेत असंच सांगत होती.आल्या आल्या त्यांनी विचारलं ‘अग्रलेख कोणी लिहिला’ ?..संतोष महाजन यांनी ‘मीच लिहिलाय’  असं स्पष्ट केलं.त्यावर मी विचारलं काय झालंय ? ..कमलबाबू म्हणाले,’तुम्ही वाचला नाही का अग्रलेख’ ? मी म्हटलं हो..त्यावर त्यांनी पुन्हा वाचायला सांगितलं..तरीही काय झाले हे  काही ध्यानात आलं नाही.अग्रलेखात एक मोठी चूक झालेली होती..अग्रलेख डिक्टेट करताना संपादकांनी राजीव गांधी यांच्या हत्त्येच्या संदर्भात जे ध्यानीमनी नव्हतं तेच घडलं असं सांगितलं होतं.ज्या आर्टिस्टनं अग्रलेख लिहून घेतला होता त्यानं लिहिलाना जे ध्यानीमनी होतं तेच घडलं होतं असं लिहिलं होतं.तेच छापूनही आलं होतं.थोडक्यात ध चा मा झाला होता.म्हटलं तर चूक अक्षम्य होती..विशेषतः लोकपत्र कॉग्रेस नेत्याच्या मालकीचं असल्यानं या चुकीचे वेगळं महत्व होतं.कमलबाबू यांचे पक्षांतर्गत विरोधक त्याचं भांडवल करतील हे उघड होतं.त्यामुळं ते अधिक वैतागले होते..त्यांचा राग स्वाभाविक असला तरी ही चूक ज्या परिस्थितीत झाली त्याचाही विचार मालकांनी करायला हवा होता असं आमचं म्हणणं होतं.मालकांनी आमची सार्‍यांचीच बिनपाण्यानं केली..एवढयावरच ते थांबले नाहीत.लेखी मेमो ही दिला.मला आयुष्यात मिळालेला तो पहिला आणि अखेरचा मेमो होता.या प्रकारानं आमच्या सार्‍या मेहनतीवर पाणी फिरलं होतं.क्षणभर असंही वाटलं की,सर्वांनी राजीनामे देऊन निघून जावं.पण तसं आम्ही केलं नाही.ते योग्यही नव्हतं.कारण परिस्थिती कोणतीही असली तरी चूक झाली होती हे खऱंच होतं.शिवाय ‘कॉम्प्युटर सिस्टीम बंद असली तरी काहीही करून अंक काढाच’ असं काही मालकांनी सांगितलेलं नव्हतं.आमचाच अतिउत्साह आमच्या अंगलट आलेला होता.कॉम्प्युुटर बंद आहेत म्हणून आम्ही अंक काढू शकत नाही असं सांगून आम्ही मोकळं बसलो असतो.पण असं होतं नाही.व्रत म्हणून ज्यांनी हा व्यवसाय पत्करलेला असतो असा कोणताही संपादक,किंवा वृत्तसंपादक असं पलायनवादी भूमिका स्वीकारू शकत नाही.आम्ही तेच केलं.आम्ही व्यवसायाशी इमान राखलं.त्याची शिक्षा आम्हाला मिळाली.मात्र एवढं झाल्यानंतर आम्ही कॉम्प्युटर दुरूस्त होईस्तोवर अंक काढायचा नाही असा निर्णय घेतला आणि पुढील चार दिवस लोकपत्र बंद राहिले.राजीव गांधी यांच्या हत्त्येसंबंधीचा फॉलोअप आम्ही देऊ शकलो नाहीत आणि त्यानिमित्तानं अंक वाढविण्याची संधी आम्हाला कॅश करता आली नाही याचं नंतर अनेक दिवस वाईट वाटत होतं.या घटनेनं दुखावलेले संतोष महाजन कालांतरानं लोकपत्र सोडून गेले.मी नंतर संपादक झालो.पुढं तीन-चार वर्षे झपाटल्यासारखं काम केलं.मात्र 21 मे चा तो दिवस मी कधीच विसरलो नाही.आजही 27 वर्षांपूर्वीचा तो सारा प्रसंग कालच घडलाय अशा पध्दतीनं डोळ्यासमोर उभा राहतो.

पत्रकारिता करताना असे प्रसंग अनेकदा पत्रकारांच्या वाटयाला येत असतात.माझ्याही आले.अशा वेळेसच पत्रकारांचा कस लागत असतो.मी अशा अनेक प्रसंगांना न डगमगता निर्धारानं सामोरं गेलं.त्यातून अडचणी येत गेल्या पण मी तडजोड कधी केली नाही किंवा परिस्थितीला किंवा व्यक्तीला,व्यवस्थेलाही कधी शरण गेलो नाही.

एस.एम.देशमुख

(या मजकुरात वापरलेले 22 मे 1991 चे लोकपत्रचे अंक धनंजय चिंचोलीकर यांनी उपलब्ध करून दिले आहेत.त्यांचे मनापासून आभार.संतोष महाजन ,धनंजय चिंचोलीकर,रवींद्र चिंचोलकर,राजा माने,अनिकेत कुलकर्णी,उमेश कुलकर्णी,रजनीश जोशी,विनोद कापसीकर या सर्व आणि इतर सहकार्‍यांची अंक काढण्यासाठी त्यावेळेस मोठीच मदत झाली होती.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here