‘गोलमाल’ इतिवृत्त

0
826

 कसे असेल ठाणे बैठकीचे इतिवृत्त ,

 जरा नमुना बघा…

 राज्य अधिस्वीकृती समितीची चौथी बैठक
 बैठकीचे इतिवृत्त
 महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची चौथी बैठक समितीचे अध्यक्ष मा.यदुनाथ जोशी सर यांच्या अध्यक्षतेखाली 27 मार्च 2016 रोजी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या वातानुकुलीत मिटिंग हॉलमध्ये संपन्न झाली.या बैठकीस बहुसंख्य  सदस्य हजर होते.त्यातील काही नागपूरहून आले होते,काही नांदेडहून,काही फलटणहून काही औंरंगाबादहून आले होते.थोडक्यात सदस्य महोदय दूरदूरवरून आले होते.काही बसनं,काही रेल्वेनं,काही स्वतःची गाडी घेऊन आले होते.

  बरोबर दहा वाजता अध्यक्षांनी आपले स्थान ग्रहण केले.आज आठवत नाही पण मा.अध्यक्षांनी सभेद शर्ट घातला असावा.चेहराही धीरगंभीर  होता.राज्यातील पत्रकारांच्या प्रश्‍नांची चिंता त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होती. त्यांच्या उजव्या बाजूस ठरलेले सन्माननिय सदस्य विराजमान झालेले होते.डाव्याबाजूस सदस्य सचिव मा. शिवाजीराव मानकर बसले होते.बैठकीच्या आरंभी श्रध्दांजली सभा झाली.सारेच दोन मिनिटे स्तब्ध उभे होते.त्यानंतर शिरस्त्याप्रमाणे काही ज्येष्ठ सदस्ययांचा   मा.अध्यक्ष महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्याचे फोटोही काढण्यात आले नंतर नियोजनाप्रमाणे ते फोटो  व्हॉटसअ‍ॅपवरही टाकले गेले.  ठरल्याप्रमाणे टाळ्यांचा कडकडाटही केला गेला.

अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत इतिवृत्त वाचनाची पध्दत बंद झालेली आहे तो रिवाज पुढंही चालू ठेवला गेला.इतिवृत्त वाचन किंवा त्यावर चर्चा करण्यात वेळ घालविणे योग्य नाही अशा “उदात्त” हेतू डोळ्यासमोर ठेऊन अध्यक्ष थेट ’मुद्यावर’ आले.कारण एका दिवसात अनेक नवीन  अर्जांचा फडसा पाडायचा  होता .असंख्य  प्रकरणांचं नुतनीकरण करायचं होतं.त्यामुळं चर्चेत वेळ घालविणं योग्य नव्हतं. सर्वच सदस्यांना हे दिसत असल्यानं इतिवृत्त न वाचल्याबद्दल कोणीच आक्षेप घेतला नाही. अन्य बैठका दोन दिवस असतात आणि नूतनीकरणाची बैठक एकच दिवस का? असा बालबोध प्रश्‍न विचारूनही कुणी मा.अध्यक्षांची अडचण आणि सदस्य सचिवांची गैरसोय केली नाही. असे सहिष्णू सदस्य असल्यामुळेच बैठकांचे कामकाज सुरळीत सुरू आहे हे येथे नमुद करणे आवश्यक आहे. बैठक सुरू होताच चहा आला,एक सदस्य म्हणाले,चहा थंड आहे त्यावर त्यांच्या शेजारचे दुसरे सन्मानिय सदस्य म्हणाले,’सदस्यांची डोकी शांत राहावीत म्हणून चहाही थंड दिलाय’.असं हसत खेळत कामकाज केवळ अधिस्वीकृती समितीतच होतं.नंतर ज्यूसही आला.त्याचा आस्वाद सर्वांनी घेतला.

बैठकीतील वातावरण थंड होतं आणि हॉलही एसी मुळं  थंड झाला होता.मग अध्यक्ष महोदयांनी आदेश सोडला ’एसी कमी करा’.त्याकडं कुणाचं लक्ष नव्हतं.मग अध्यक्षांनी पुन्हा आदेश दिला.’एसी कमी करा’.एसी बंद न करण्यामागं कुणाचं कारस्थान आहे असा विनोदही मग अध्यक्षांनी केला.स्वाभाविकपणे या विनोदालाही काही सदस्यांना दाद द्यावी लागली. मग एसी कमी झाला.दोन तासात सर्व अर्जांचा फडश्या पाडून झाल्यानंतर जेवणाची सुटी घेतली गेली.जेवण शेजारीच विश्रामगृहात होते.तिथं चालत जायला दोन मिनिटे गेली.मेनू छान जमला होता.उकडीचे मोदक होते.पुरणपोळीही होती.जेवण बुफे पध्दतीचे होते.सारेच परस्परांना  आग्रह करताना दिसत होते.असे प्रमळ वातावर हे या समितीचं एक वैशिष्ट्ये आहे. जेवण छान झाल्याचे सर्वच सदस्य आणि अधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसत होते.

भोजणानंतर पुन्हा बैठक सुरू झाली.नूतनीकरण चुटकीसरशी संपलं. अधिस्वीकृती समितीचे काम किती वेगाने चालते हा संदेश महाराष्ट्रला यातून नक्की मिळाला असेल. अधिस्वीकृती समितीच्या नावावर कमी वेळात जास्तीत जास्त प्रकरणाचा निपटारा करण्याचा आणखी एक नवा विक्रम ठाण्यात नोंदविला गेला.या झटपट पध्दतीने अनेकांना ‘न्याय‘ मिळाला.कारण कुणाचे अर्जच तपासता आले नाहीत.गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या मंडळींनाही ’त्यांना शिक्षा कुठं झालीय’? असा बहाना करीत शुध्द करून घेण्यात  आले .’बडयांना’ खुष करताना त्याचा फायदा अनेकाना  झाला.हा मुद्दा आपण रेटून नेल्याचा आणि अंतिमतः आपला ‘विजय‘ झाल्याचा आनंद  अध्यक्षांच्या चेहर्‍यावर विलसत होता.गुन्हा नोंद असलेल्यांना  माफी देण्यामागे जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याची मा.अध्यक्षांची भूमिका होती.ती अन्य सदस्यांनी शांतपणे मान्य केली.

मग ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आले. अध्यक्षांनी स्मीत हास्य करीत त्याचं स्वागत केलं. पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षांनी पाहुण्यांचे आणि पाहुण्यांनी नंतर अध्यक्ष महोदयांचे स्वागत केले.त्यावर काहीे .सदस्यांनी टाळ्या वाजविण्याचे इतिकर्तव्य पार पाडले. अशा प्रकारे  अत्यंत आनंदात नेहमी प्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली.पुढची बैठक कुठं घ्यायची यावर चर्चा झाली.ज्येष्ठ आणि सन्माननिय सदस्य भाऊ नांदेडकर  म्हणाले आम्हाला शनिवार-रविवार अन्य कामं असतात तेव्हा बैठक मंगळवार,बुधवारीच झाली पाहिजे.त्याला सर्वाच सदस्यांनी हरकत घेतल्याने भाऊंना  गप्प बसावे लागले.त्याबद्दलची नाराजी त्यांच्या आणि सदस्य सचिवांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती.मात्र ‘बैठक शनिवार -रविवारीच झाली पाहिजे असा आग्रह धरणारांनी  जरा चष्मा बदलावा’ असा हितोपदेश अध्यक्षांनी केला.असा सल्ला देताना अध्यक्ष महोदय विनोद जगदाळे यांच्याकडं बघत होते.मात्र त्यांना चष्माच नसल्यानं अध्यक्ष चष्मा बदलण्याचा सल्ला नेमका कोणाला  देत आहेत  याचं गुढ  काही उलगडलं नाही.

.शेवटी रिवाजाप्रमाणे संयोजकांचे उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल आभार प्रदर्शन झाले.नेहमीप्रमाणे फोटो ही काढले गेले.अशा प्रकारे कसलीही गडबड,गोंधळ न होता बैठकीचे कामकाज संपले.ठाण्याची बैठक वरील सर्व कारणांसाठी(?)  ऐतिहासिक ठरली.

                    अध्यक्ष        सदस्य सचिव

————————————————————————————————————————-

अधिस्वीकृती समितीचं हे संभाव्य इतिवृत्त आहे. यामध्ये नेमके कामकाज काय झालंय,बैठकीत कोण काय बोललंय याचा थांगपत्ता कोणाला लागू नये अशी व्यवस्था केली गेली आहे.पुण्याच्या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या त्याचा उल्लेख इतिवृत्तांत नाही.ठाण्याच्या बैठकीतही एस.एम.देशमुख यांनी 20 वर्षांचा अनुभव आणि 50 वर्षे वय असणार्‍या पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती देण्याबाबतचा जीआर सहा महिने झाले तरी का निघत नाही यावरून सदस्य सचिवांना चांगलेच धारेवर धरले तो उल्लेखही येणार्‍या इतिवृत्तांत असणार नाही.जे काही होतंय ते केवळ आमच्यामुळंच असा आभास निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय इतिवृत्तांतही कुणाला श्रेय मिळणार नाही याची काळजी घेतली जातेय.अशा प्रकारे गोलमाल इतिवृत्त असणार आहे.अर्थात सत्तेच्या बळावर हे सारं होतं असलं तरी राज्यातील पत्रकारांना कोणामुळं काय होतंय याची नक्की माहिती आहे.त्यामुळं ही सारी खटाटोप व्यर्थ जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here