अलिबागचे ‘भाऊ’ ..

0
1971

अलिबागचे भाऊ

दैनिक कृषीवलचा संपादक म्हणून 1994 मध्ये मी रुजू झालो.. दुसरयाच दिवशी भाऊ सिनकर यांच्या “कुलाबा दर्पण” मध्ये बातमी आली, “भूमीपूत्रांना रोजगार मिळाला पाहिजे असा आग्रह धरणारया जयंत पाटील यांना आपल्या दैनिकांसाठी कोकणात संपादक मिळाला नाही का? तो मराठवाडयातून का आणला? ” अशी ती बातमी होती. .. या बातमीची मी दखल घेण्याचं कारण नव्हतं पण नंतरही अनेक वेळा कुलाबा दर्पण मधून माझ्या विरोधात बातम्या येत गेल्या..अनेकदा व्यक्तीगत चारित्र्यहनन करणारया बातम्याही असत.. पण १८ वर्षात मी अशा बातम्यांची कधी दखल घेतली नाही..कारण मला हे पक्क माहित होतं की, सिनकरांचा राग माझ्यावर नव्हता तर कृषीवलच्या संपादकांवर होता.. माझ्या जागेवर अन्य कोणी असते तरी सिनकरांची भूमिका तीच राहिली असती.. त्यामुळे त्यांना काय लिहायचे ते लिहू दिले मी मात्र त्यांच्या विरोधात कधी एक ओळही लिहिली नाही.. मात्र सातत्यानं व्यक्तीशः माझ्या विरोधात बातम्या येत असल्याने कधी त्यांच्याशी संवाद साधण्याच्या भानगडीतही मी पडलो नाही.. मी १८ वर्षे अलिबागला होतो, अनेक वेळा आम्ही समोरा समोर आलो पण एकदाही परस्परांशी बोललो नाही.. कारण मी ही काही कमी नव्हतो.. त्यांच्या एवढाच हट्टी आणि दुराग्रही होतो.. आहे..
भाऊ सिनकरांशी माझं मैत्रीचं नातं कधी निर्माण झालं नसलं तरी एक निर्भय, प्रामाणिक, अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर होता.. अलिबागमधील पाटील कुटुंब आणि सिनकर यांचा कायम उभा दावा.. दररोज पाटलांच्या विरोधात काही तरी बातमी कुलाबा दर्पण मध्ये असायचीच .. ..त्यावेळेस व्हॉटसअ‍ॅप वगैरे नसले तरी बातमीची जोरदार चर्चा अलिबागेत व्हायची..बातमीत भाषेच्या वगैरे मर्यादा हा विषय नसायचा.. बरयाचदा बिखारी आणि अगदी खालच्या पातळीची भाषा वापरली जायची..मग हस्ते.. परहस्ते दर्पणचा अंक माझ्यापर्यंत आणि तमाम पाटलांपर्यंत पोहोचायचा.. यातून काही वेळा सिनकर यांच्या घरावर हल्ले झाले अगदी नगर पालिकेने त्यांचं पाणी कापण्याचा देखील प्रयत्न केला गेला.. पण सिनकर कधी शरण गेले नाहीत.. प़भाकर पाटील आणि दत्ता पाटील यांचा तेव्हा प़चंड दरारा होता.. भले भले त्यांना घाबरायचे पण भाऊ सिनकर यांनी कधी पाटलांची दहशत जुमानली नाही..किंवा त्यांना ते घाबरले नाहीत .. मला नेहमी प़श्न पडायचा हा माणूस कश्यासाठी एवढा टोकाचा विरोध करतोय? बरं पाटलांना विरोध करून पाटलांच्या राजकीय विरोधकांकडून त्यांना काही लाभ मिळालेत असंही कधी झालं नाही.. कॉग्रेस त्यांचा फक्त वापर करून घेतेय असं मला कायम वाटायचं.. ते खरंही होतं.. कारण कॉग़ेसनं त्यांना कधी एखादी कमिटी देखील दिली नाही.. त्यांनाही ते कळत असावं पण त्यांनी आपली “लाईन” कधीही बदलली नाही.. आपल्या भूमिकेशी एवढा एकनिष्ठ पत्रकार मी दुसरा पाहिला नाही.. या भूमिकेमुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं.. त्याचीही सिनकर यांनी कधी पर्वा केली नाही.. ते अगदी व़त समजून पाटलांना विरोध करीत राहिले.. शेवटी व्हायचं ते झालं.. अखेरच्या काळात आर्थिक अडचणीमुळे त्यांना आपला प्रिय कुलाबा दर्पण विकावा लागला.. त्यानंतर हा निधड्या छातीचा पत्रकार मनातून खचला असावा.. विरोधकांना कायम नामोहरण करणारं प़भावी हत्यार हातातून गेल्यानं ते हतबल ही झाले.. त्यातून त्यांनी पुन्हा एक साप्ताहिक सुरू केले पण दर्पणचं तेज त्या साप्ताहिकाला मिळालं नाही.. थोडे हट्टी, थोडे हटवादी, काहीसे अबोल पण आपल्या भूमिकेवर कायम ठाम असणारे भाऊ सिनकर अलिबागकरांच्या कायम स्मरणात राहतील हे नक्की..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here