पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीचे पत्रकार अमिर लियाकत कायमच आपल्या वक्तव्यांमधून भारतावर निशाणा साधत असतात. नुकतेच त्यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर तोंडसुख घेतले. अर्णब यांच्या ओरडून बोलण्याच्या पद्धतीवर ते मासेविक्रेत्यासारखे बोलतात असे लियाकत म्हणाले.

याआधीही लियाकत यांनी गोस्वामी यांच्याबाबत बोलताना अतिशय वाईट शब्द वापरले होते. टीव्हीवर अशाप्रकारे ओरडून बोलून काही होत नाही व्यक्तीने अक्कल वापरुन बोलणे गरजेचे आहे. तसे न केल्याने अर्णब यांना ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीने काढून टाकले असल्याचेही ते म्हणाले. इतके बोलून लियाकत थांबले नाहीत, तर भारतातीलही अनेक लोक अर्णबचा तिरस्कार करतात, असा आरोप त्यांनी केला.

याहूनही पुढे जात लियाकत यांनी अर्णब यांना समोरासमोर येऊन बोलण्याचे आव्हान दिले. यासाठीचा दिवस आणि वेळ अर्णब यांनीच ठरवावी, असेही ते म्हणाले. लियाकत म्हणाले, ”अर्णब यांनी एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलून दाखवावे. एकीकडे पाकिस्तानचा झेंडा आणि दुसरीकडे भारताचा झेंडा लावून बोलूयात आणि मग कोण जिंकतो ते पाहू.”

अशाप्रकारे अर्णब गोस्वामी यांच्यावर मुक्ताफळे उधळणारे लियाकत यांनी भारतातील ‘झी न्यूज’ या न्यूज चॅनलविषयीही अशा प्रकारची हिन दर्जाची वक्तव्य केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here