गुन्हा अवैद्य धंद्याची बातमी दिल्याचा..
अपंग पत्रकारास पोलिसांनी गुरासारखे झोडपले..
राज्यातील पोलीस आपली मर्दुमकी गुंड- माफियांच्या विरोधात दाखविण्याऐवजी पत्रकारांवर हल्ले करून दाखवित आहे.सांगोल्यातली घटना ताजी असताना आता माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील अपंग पत्रकार विकास अशोक काटकर यांना पोलिस अधिकार्यांनी बेदम मारहाण तर केलीच त्याच बरोबर त्याला पोलीस ठाण्यापासून एक किलो मिटर दूरवर नेऊन सोडून दिले.काटकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात असा आरोप केला आहे की,गाडीतून नेऊन पोलिसांनी आपल्याला जबरदस्तीने दारू पाजली.या घटनेचा दिंद्रुड पत्रकार संघानं धिक्कार केला आहे.
या बाबतचं सविस्तर वृत्त असे की,अशोक काटकर यांनी देवदहिफळ येथील अवैध धंद्याची बातम्या सातत्यानं दिल्या होत्या.मात्र त्याची दखल न घेतली गेल्याने त्यांनी 15 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता एसपींना फोन करून अवैद्य धंद्याची माहिती दिली.त्यामुळं एपीआय श्री.सानप आणि पीएसआय टाकसाळ संतप्त झाले.त्यानी 18 तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास काटकर यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले आणि तेथे काटकर यांना केवळ बातम्या दिल्या म्हणून मारहाण केली.आर्वच्च शिविगाळही केली गेली.हा सारा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेला आहे.त्यानंतर पोलिसांनी काटकर यांना गाडीत बसवून गावाच्या बाहेर नेले तेथेही मारहाण केली आणि यापुढे पोलिसांच्या विरोधात बातम्या न देण्याची तंबीही दिली.द्रिंद्रुड पोलीस ठाम्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरू असल्याचे काटकर याचं म्हणणं आहे.ही घटना अन्य पत्रकारांना समजल्यानंतर सर्व पत्रकार एकत्र झाले त्यांनी घटनेचा निषेध केला असून पत्रकारास मारहाण करणार्या पोलिस अधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक आणि मुख्यमंत्र्यांकडं पत्राव्दारे केली आहे.या घटनेचा मराठी पत्रकार परिषदेचे औरंगाबाद विभागीय चिटणीस अनिल महाजन यांनी निषेध केला आहे.सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषी पोलीस अधिकार्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी महाजन यांनी केली आहे.