आचार्य प्र.के.अत्रे,भाऊ पाध्ये,पा.वा.गाडगीळ,ह.रा.महाजनी,श्रीपाद शंकर नवरे,”नवाकाळ”कार यशवंत कृष्णाजी खाडीलकर,न.र.फाटक,ज.सं.करंदीकर,बाळासाहेब भारदे,”मराठवाडा”कार अनंतराव भालेराव,दादासाहेब पोतनीस,नारायण आठवले यांच्या सारख्या दिग्गज पत्रकारांनी अध्यक्षपद भूषविलेल्या मराठी पत्रकार परीषद या संघटनंचं अध्यक्षपद दुसर्यांदा भूषविण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.1998 मध्ये झालेल्या परिषदेच्या निवडणुकीत मी कार्याध्यक्ष म्हणून मी निवडून आलो.त्यानंतर परिषदेच्या घटनेप्रमाणे 2000 मध्ये अध्यक्ष झालो. 2002 नंतर परिषदेत एक स्वयंसेवक म्हणूनच मी कार्य करीत राहिलो.मागच्या ऑगस्टमध्ये परिषदेचे तत्कालिन कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे यांच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर परिषदेने त्यांचा राजीनामा घेतला.(आता या बेहेरेना नंदुरबार जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.) त्यामुळे ते अध्यक्ष होऊ शकले नाहीत.तेव्हापासून अध्यक्षपद रिक्तच होते.मध्यंतरी परिषदेच्या कार्यकारिणीची जी सभा झाली त्यात सर्व म्हणजे साठ सभासदांनी मी अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती मला केली होती.तेव्हा मी सविनय नकार दिला होता.मात्र गेली काही दिवस परिषदेच्या विरोधात काही व्यक्ती सातत्यानं अपप्रचार करू लागल्या होत्या.विशेषतः ठाणे येथे परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा होऊच नये यासाठी उध्दव ठाकरे यांच्यापर्यत कागाळ्या केल्या गेल्या.परिषदेवर प्रशासक असल्याच्या खोटे मेल,व्हॉठसअॅप पाठविण्यात आले.’प्रशासक असल्यानंच परिषदेला अध्यक्ष नाही’ अशाही थापा मारल्या गेल्या.त्यामुळे नाही म्हटले तरी पत्रकारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.रत्नागिरीसह काही जिल्हयात तर परिषदेमुळे विविध पदं उपभोगलेलेच ठणाणा करीत सुटले.प्रत्येक आरोपाला व्यक्तीगत उत्तर देणं शक्य नाही.हे उत्तर कृतीतूनच द्यावे या हेतून काल मुंबईत परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली होती.बैठकीस 31 जिल्हयातील अध्यक्ष तसेच परिषद प्रतिनिधी उपस्थित होते.ज्यांनी परिषदेची विविध पदं भूषविली होती तीच मडंळी परिषदेला कशी त्रास देत आहे याची माहिती किरण नाईक यांनी दिली.परिषदेची होणारी बदनामी आणि विरोधकांच्या कुरघोड्या थांबवायच्या असतील तर तातडीने परिषदेला अध्यक्ष दिला पाहिजे अशी विनंती त्यांनी कार्यकारिणीला केली..त्यानंतर काही नावांचा विचार झाल्यानंतर माझे नाव समोर आले.सर्वांनी आग्रह केल्यानंतर मी हे पद स्वीकारले आहे.हे पद स्वीकारताना आपण ज्या खुर्चीवर बसणार आहोत त्या खुर्चीवर किती उंचीच्या व्यक्ती बसलेल्या होत्या याची जाणीव मला आहे.त्यांचं पत्रकारितेतील कार्य,पत्रकारितेतील त्यांचं योगदान,आणि मराठी पत्रकार परिषदेसाठी त्यांनी खाल्ल्लेल्या खास्ता याचीही मला कल्पना आहे.त्याच्या एवढी उंची मला गाठता आली नाही तरी या संस्थेची उज्जवल परंपरा माझ्यामुळे कलंकित होणार नाही याची मी नक्की काळजी घेईल.ती घेताना माझ्या पुर्वसुरींचा पत्रकारितेमागचा दृष्टीकोन,त्याची समाजाप्रतीची बांधिलकी आणि केवळ बंद खोलीत बसून उपदेशात्मक पत्रकारिता न करता प्रसंगी रस्त्यावर उतरून लोकांच्या प्रश्नांना भिडण्याची त्यांची वृत्ती याचाही विसर मी पडू देणार नाही..हल्ली अनेकजण असा टाहो फोडत असतात की,रस्त्यावर उतरणं,जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं हे काय पत्रकाराचं काम असतं का ? असा प्रश्न विचारणार्यांना पत्रकारिता कळलेली नाही असं माझं ठाम मत आहे.कारण आपण पत्रकारिता अमरिकेत किंवा ब्रिटनमध्ये करीत नाही.इंडियात करतो.इथले प्रश्न,इथल्या समस्या,इथली मानसिकता वेगळ्या आहेत.त्यामुळंच किमान मराठी पत्रकारांनी लोकांचे प्रश्न हाच आपल्या पत्रकारिताचा आत्मा समजून काम केलेलं आहे.टिळक-आगरकर-आंबेडकर यांनी पत्रकारिता याचं ध्येयानं केलेली आहे.काहींना परंपरेचं हे जोखडं उतरून टाकण्याची घाई झालेली आहे.जोखड ंउतरायला हरकत नाही पण अगोदर सारे प्रश्न संपले पाहिजेत.ते जोपर्यत संपत नाहीत तो पर्यत ‘हे’ आमचे काम नाही असं पत्रकारांना म्हणता येणार नाही.मराठी पत्रकार परिषदेच्या सर्वच अध्यक्षांनी सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता केली. लोकांसाठी लेखणी तर चालविलीच ,त्याचबरोबर ते रस्त्यावर उतरूनही लढत राहिले.आचार्य अत्रेंना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात उतऱण्याला कोणी सांगितलेलं नव्हतं.अनंत भालेरावांना हैदराबाद मुक्ती संग्रामात लढण्याची गरज नव्हती,जनशक्तीकार ब्रिजलाल पाटलांना सामांन्यांच्या संघटना उभारून त्याच्यासाठी रस्त्यावर उतऱण्याची गरज नव्हती.अनंतराव पाटील असतील,रंगा आण्णा वैद्य असतील,नारायण आठवले असतील नाही तर सुधाकर डोईफोडे असतील हे सारे अध्यक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकांसाठी भांडत राहिले.माझी हीच भूमिका असल्यानं मी लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची नेहमीच तयारी ठेवतो.मुंबई-गोवा महामार्गाचा विषय नक्कीच पत्रकारांचा होता.कारण रस्त्यावर पडणारे रक्त त्यानाच रोज बघावे लागत होते.राजकीय पक्षांना बधिरता आल्यानंतर त्याना जागं कऱण्याचं काम पत्रकारांचं आहे आणि ते त्यानी केलं आहे.यात कोणाला गैर वाटत असेल तर त्याचं ते मत त्याना लखलाभ.माझी सामांन्यांच्या हक्कासाठीची लढाई सुरूच राहणार आहे.माझ्याकंडं साधनं मर्यादित असतील पण माझी इच्छाशक्ती दांडगी,आणि माझ्याबरोबर समविचाराची पत्रकारांची मोठी फौज असल्यानं माझ्या परिनं मी लोकांसाठी लढत राहणार आहे.पुढील दोन वर्षे हा लढा अधिक प्रभावीपणे मी लढणार हे तर उघडच आहे.कारण ती मराठी पत्रकार परिषदेची परंपरा आहे आणि मी या परंपरेचा पायीक आहे.त्यामुळं चार-दोघांना काय वाटेल याची पर्वा मी कधी करणार नाही,यापुर्वी मी ती कधी केली नाही.या लढाया मी माझ्या प्रोफाईलमधील रिकाने भरण्यासाठी लढत नाही तर माझे समाजाप्रती असलेले उत्तरदायीत्व या भूमिकेतून लढतो हे आमच्या काही मित्रांनी कायम स्मरणात ठेवावे.
मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीने माझ्यावर जो विश्वास दाखविला आणि माझ्यावर जी जबाबदारी सोपविली आहे त्याबद्दल मी परिषदेच्या कार्यकारणीचा मनापासून आभारी आहे.परिषदेचे नेतृत्व दोनदा कऱण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.कारण परिषदेच्या 76 वर्षांच्या देदीप्यमान परंपरेत दोन वेळा अध्यक्षपद भूषविण्याचा मान माझ्यापुर्वी फक्त एकाच अध्यक्षाला मिळाला होता.मला ही संधी मिळत आहे.या संधीचं सोनं करून परिषदेचा लौकीक वाढविण्याचा माझा प्रयत्न असेल.परिषदेसमोर प्रामुख्यानं दोन प्रश्न आहेत.मुंबई मराठी पत्रकार संघानं परिषदेच्या जागेवर बेकायदेशीर कब्जा मिळविलेला आहे.न्यायालयात जाऊन ती जागा मिळवायची आहे.नाशिक पत्रप्रबोधिनीच्या नावाने सुरू असलेल्या संस्थेची काही मंडळींनी वाट लावली आहे.मोठे आर्थिक घोटाळेही तेथे झालेले आहेत आणि धर्मदाय आयुक्तांनी त्यांच्यावर कडक ताशेरेही ओढलेल आहेत.ही दोन्ही प्रकरणं मार्गी लावली पाहिजेत अशी सदस्यांची इच्छा आहेत.या शिवाय पत्रकारांचे जे प्रश्न आहेत,त्यात कायदा ,पेन्शन यासाठीही परिषदेची लढाई पुढे चालूच राहणार आहे.या प्रश्नांबरोबर परिषद संघटना म्हणून अधिक भक्कम करणे,काही जिल्हा संघानीं नव्या पत्रकारांना सदस्य करून घेण्याचे ंबद केले आहे त्यामुळे परिषदेची वाढ खुंटली आहे.ती मनमानी थांबवून परिषदेची व्याप्ती वाढविणे,तालुका तालुक्यात परिषदेचा विस्तार व्हावा यासाठी सतत झटत राहण्याचा प्रयत्न मी यापुढेही करीत राहणार आहे.पुढील दोन वर्षात परिषदेच्या झेडयाखाली किमान दहा हजार पत्रकार आले पाहिजेत असा माझा प्रयत्न मी आणि माझे सहकारी मिळून करणार आहोत.पत्रकार प्रशिक्षणं शिबिराचे आयोजन करणे,पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेणे,पत्रकार मदत निधी उभारून गरजू पत्रकारांना आर्थिक मदत करणे,पत्रकार आरोग्य सेवा कक्षाची व्याप्ती वाढविणे आदि प्रकल्पही पूर्णत्वास न्यायचे आहेत.त्यासाठी अर्थातच राज्यातील पत्रकार मित्रांची मदत मला हवी आहे.मी आणखी एका कारणासाठी भाग्यवान आहे.राज्यातील पत्रकाराचं जे प्रेम मला मिळालं ते इतर कुणाच्याही वाट्याला आलेलं नाही.पत्रकारांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं हे कालपासून माझ्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव होतोय त्यातून दिसून आलं आहे.मी सर्वाचा मनापासून आभारी आहे.मी आपल्या ऋुणातच राहू इच्छितो.माझ्या कार्य काळात काळात मी उतणार नाही,मातणार नाही,घेतला वसा टाकणार ही या निमित्तानं ग्वाही देतो. सर्वाचे पुनश्च आभार.
एस एम देशमुख