दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या कारवाईचे ‘लाइव्ह’ प्रक्षेपण टीव्ही चॅनेल्सवरून दाखवण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. नुकत्याच जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे झालेल्या दहशतविरोधी कारवाईचे विविध चॅनेल्सनी लाइव्ह प्रक्षेपण केल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने ही नियमावली जारी केली आहे.
टीव्ही चॅनेल्सनी दहशतविरोधी कारवाईची जागा, सुरक्षा दलाने तैनात केलेले मनुष्यबळ, दलांच्या हालचाली, योजना तसेच कारवाईसंबंधी अन्य माहिती यांवर लक्ष केंद्रीत करू नये, असे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत. सुरक्षा दलांच्या कारवाईची माहिती टीव्हीच्या माध्यमातून दहशतवाद्यांपर्यंत पोहोचू नये तसेच निष्पाप जीव वाचवले जावेत, या दृष्टीने हे निर्देश देण्यात आले आहेत.
‘देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवायांचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येऊ नये. ही कारवाई संपेपर्यंत केवळ सुरक्षा दलांनी निर्धारीत केलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचेच वार्तांकन करण्यात यावे,’ असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
‘या प्रकरणांची संवेदनशीलता लक्षात घेता सर्व टीव्ही चॅनेल्सनी याबाबत सहकार्य करावे,’ अशी अपेक्षा माहिती व प्रसारण सचिव बिमल जुल्का यांनी व्यक्त केली. सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवायांच्या लाइव्ह प्रक्षेपणास बंदी घालावी, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्रालयाने याआधीच घेतली आहे. या पार्श्वभूमीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाने हे निर्देश दिले आहेत.(मटवरून )