डॉक्टरांना हवेत पिस्तुल परवाने…

0
1112
मुंबई : निवासी डॉक्टरांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी अनेक महिन्यांपासून ‘महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना’(मार्ड) लढा देत आहे. अनेकदा शासनाशी संपर्क साधूनही निवासी डॉक्टर अजूनही असुरक्षित असल्याने डॉक्टरांना शस्त्र परवाने द्या, अशी मागणी मार्ड संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 
२०१६मध्ये निवासी डॉक्टरांना मारहाणीच्या सात घटना घडल्या आहेत. तर, २०१५मध्ये ३३ निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे. निवासी डॉक्टर रुग्णालयात काम करीत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा मिळत नाही. अनेकदा रुग्णांचे नातेवाईक हे डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण करतात. अशावेळी डॉक्टरांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालय असो वा खासगी प्रॅक्टिस डॉक्टरांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्या, अशी मागणी केल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
 
२ जुलै २०१५ला वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लेखी आश्वासन दिले होते. त्यात म्हटले होते की, एका रुग्णाबरोबर रुग्णालयात दोनच नातेवाईक असतील. पण, अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. लिखित स्वरूपातील सुरक्षेच्या कोणत्याही बाबीचे पालन केलेले नाही. मारहाण करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येत नाही. गुरुवारी पहाटे नांदेडमधील एका निवासी डॉक्टरला तीन जणांनी मारले. यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच यावर ठोस उपायांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.(lokmat news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here