आमचे ‘कुटुंब प्रमुख’

    0
    2256

    रायगड प्रेस क्लब ही पत्रकारांची केवळ संघटना नाही, ते पत्रकारांचे कुटुंब आहे.संतोष पवार हे या कुटुंबांचे कुटुंब प्रमुख आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कुटुंब प्रमुख म्हणून नक्कीच काही अधिकार असतात,तश्याच काही जबाबदाऱ्याही असतात.कुटुंब एकसंध ठेवण्याचं महत्वाचं कामही कुटुंब प्रमुखाला करावं लागतं.कुटुंबातील सदस्यांचे राग-लोभ,हेवे-दावे,वाद-विवाद जसे सोडवावे लागतात तसेच त्यांच्याताली एकोपा कायम ठेवण्याचा प्रयत्नही करावा लागतो.गेली बारा वर्षे संतोष पवार ही तारेवरची कसरत समर्थपणे पार पाडत आहेत.कुटुंब सांभाळायचं तर कुटुंब प्रमुखाकडं संयम असावा लागतो,दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती असावी लागते,तटस्थपणाची भूमिकाही आवश्यक असते आणि मुळात म्हणजे प्रत्येक सदस्यांचं सुख,दुःख आपलं समजून त्याच्याशी समरस होण्याची संवेदनशीलता असावी लागते.ही सारी स्वभाव वैशिष्टये संतोष पवार याच्याकडं असल्यानंंंं ते रायगडच्या पत्रकाराचं हे कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकले आहेत. (मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस या नात्यानं ते परिषदेच्या झेंडयाखाली कार्यरत असलेल्या सर्व पत्रकारांचे देखील कुटुंब प्रमुख आहेत.)
    रायगड प्रेस क्लब स्थापन झाला तेव्हा कोणालाच वाटले नव्हते की,या संस्थेची लोकप्रियता,व्याप्ती एवढी वाढेल म्हणून .पण संतोष पवार असतील,मिलिंद अष्टीवकर असतील,अभय आपटे,किंवा विजय पवार,संतोष पेऱणे या सर्वांनी प्रयत्नपूर्वक ही संस्था भरभराटीला आणली.अनेक लढे लढले.ते यशस्वी करून दाखविले.या साऱ्या चळवळीत संतोष पवार यांची भूमिका नक्कीच महत्वाची होती.कदाचित त्यामुळेच असेल पण नंतर मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस म्हणून अखिल भारतीय स्तरावर काम करण्याची संधी संतोष पवार यांना मिळाली.
    संतोष पवार हे हाडाचे पत्रकार आहेत.बातमीचा त्यांना वास येतो.मग ते त्याचा पाठपुरावा करतात.आई-वडील स्वातंत्र्यसैनिक असल्यानं सामाजिक उत्तरदायीत्वाचे महत्व त्यांना सांगण्याचीही गरज पडत नाही.सामाजिक बांधिलकीचे बालकडू त्यांना घरातूनच मिळाले आहे.त्यामुळं बातमीदारी करताना सामाजिक हिताचा विचार त्यांनी नेहमीच प्राधान्यानं केला.मला नेहमी वाटतं की,मुरूड असेल किंवा माथेरान असेल या गावांची ओळख करून देण्याची गरज नाही.ती साऱ्यांना आहेच पण या गावांना वलयांकित कऱण्याचं श्रेय मुरूडचा छायाचित्रकार सुधीर नाझरे असेल किंवा माथेरानचे पत्रकार संतोष पवार असतील यांना नक्कीच जाते.त्यांनी कॅमेऱ्यातून आणि लेखणीतून दोन्ही गावांना जगासमोर नव्यानं पेश केलं.त्याचा परिणाम पर्यटक वाढण्यात झाला आहे.या गावाचं वैशिष्टये जसं नव्यानं जगासमोर आलं तव्दतच गावाच्या वेदनाही लोकांना कळल्या.संतोष पवार यांना माथेरानबद्दल असलेली कमालीची आपुलकी,प्रेम,माथेरानकर असल्याचा अभिमान आणि माथेरानच्या प्रश्नांबद्दल कमालीची तळमळ हे मी गेली वीस वर्षे अनुभवतो आहे.अनेक स्तरावर त्यांनी माथेरानचे प्रश्न मांडले आणि ते सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. माथेरानच्या नावातच एक चळवळ आहे आणि ही चळवळ त्यांनी लेखणीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरू ठेवली आहे.माथेरानचे अनेक प्रश्न आहेत मात्र ते मांडतानाही त्यांनी सकारात्मकता दाखविली.तेथील प्रश्नांचा बाऊ करीत त्याचा पर्यटनावर परिणाम होणार नाही याचीही दक्षता त्यांनी कटाक्षानं घेतली.प्रश्नांबद्दल कधी आक्रस्ताळेपणा केला नाही की,कधी आमची उपेक्षा होतेय म्हणून कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यातही उभं केलं नाही.संयमानं प्रश्न मांडले .ते मांडताना बोटचेपे धोरणही कधी स्वीकारला नाही त्यामुळं एक-एक करीत माथेरानच्या समस्यांचा निपटारा होत गेला आहे.एका छोटया खेड्यात राहणारा पत्रकार सकारात्मक लेखणीच्या माध्यमातून शहराच्या प्रश्नांची कशी उकल करू शकतो हे संतोषनं रायगडला दाखवून दिलं आहे.त्याचा मला नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे.
    संतोषचा आणखी एक गुण नेतृत्व करणाऱ्यांनी नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे.साऱ्यांच्या साऱ्याच गोष्टी संतोषला पटतात असं नाही पण संतोषनं कुणाबद्दलही कटुता दाखविलीय,किंवा एखादयाबद्दल काही टोकाची टीका टप्पणी केलीय असं होत नाही.संतोष पवार रागावलेत,चिडलेत असंही मी तरी कधी पाहिलं नाही.माणसं जोडण्याचं आणि जोडलेली माणसं टिकविण्याचं कौशल्य संतोष पवार यांच्यात आहेत.दोन परस्पर विरोधी माणसंही संतोषची मित्र असतात.आणि ही मैत्री जपताना एकडच्या काड्या तिकडं आणि तिकडच्या काडया इकंडं असा नैतिक व्यभिचारही संतोषनं कधी केला नाही.त्यामुळं मित्राचं एक मोठं जाळं ते निर्माण करू शकले.संतोषच्या मित्रात पत्रकार जसे आहेत तसेच राजकारणी आहेत,उद्योगपती आहेत आणि अधिकाराही आहेत.ही मैत्री निकोप असते.या मैत्रीचा स्वार्थासाठी वापर केलाय असं कधी होत नाही.त्यामुळंंंंंंं संतोषच्या एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती आयुष्यभर संतोषचा मित्र म्हणून वावरत असते.संतोषनं नेहमी सांगतात,हेच माझं भांडवल आहे आणि ते खरंही आहे.
    पत्रकारितेबद्दल अनेक मतप्रवाह हल्ली व्यक्त होत असतात.पत्रकारांबद्दल अनेकदा बरे-वाईट बोलले जाते.मात्र पत्रकारिता करताना शुध्द चारित्र्य त्यांनी राखले.आपल्याकडं कोणी बोट दाखवू शकेल असं कोणतंही काम त्यांनी कधी केलं नाही,किंवा कुणाची लाचारीही कधी पत्करली नाही.जे पटत नाही ते सौजन्यपूर्वक पण स्पष्टपणे सांगण्याची हिंमतही त्यांनी दाखविली आहे.त्यामुळंच रायगडमधील तरूण पत्रकार संतोषचा कमालीचा आदर करताना दिसतात.राजकारणातही त्याचा एक नैतिक दबदबा आहे तो त्यांच्या चारित्र्यामुळंच.संतोष पवार एक चांगले संघटक आहेत.पत्रकारांमध्ये हा गुण अभावानेच आढळतो.त्यामुळं ते विविध संघटनांमध्ये लिलया काम करू शकतात. पत्रकारांना एकत्र ठेवणे,त्यांच्या कडून सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करून घेणे हे काम सोपे नाही ते संतोष पवार करीत आहेत.ते माथेरानचे नगरसेवक असले तरी ते राजकारणात जास्त रमत आहेत असं वाटत नाही.कारण पत्रकारिता हा त्यांचा स्वभाव आहे,समाजसेवा हा ते आपला धर्म मानतात.पत्रकारिता आणि समाजसेवेच्या माध्यमातून माथेरानचे,रायगडमधील पत्रकारांचे प्रश्न मांडणाऱ्या या हाडाच्या पत्रकाराचा आज वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्चा.संंतोष पवार यांच्याहातून माथेरानची आणि रायगडमधील पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक होत राहावी हीच मनोकामना.
    संतोष पवार यांच्याशी माझी मैत्री वीस वर्षांची.ते अगोदर सकाळसाठी काम करायचे.मात्र दोन वर्षे त्यांचा पाठपुरावा करून त्यांना मी माझ्या दैनिकासाठी काम करण्याची विनंती केली.नंतर ते वार्ताहर म्हणून माझ्या दैनिकात काम करू लागले.पण आमचं हे नातं एक संपादक आणि वार्ताहर असं कधीच राहिलं नाही.समान मैत्रीचं हे नातं बनलं.ही मैत्री नक्कीच निकोप असल्यानं कुणाची दृष्ट तिला लागली नाही.रायगडमध्ये मी रमतो त्याचं काऱणच मला संतोष,मिलिंद,अभय सारखे असंख्य मित्र लाभले म्हणून.माझ्यातील आणि रायगडमधील या साऱ्या मित्रांमधील मैत्रीचा हा धागा अधिक मजबूत होओ हीच संतोषच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इच्छा.( एसेम)

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here