दगदग,धावपळ,तणाव,अवेळी जेवण,जाग्रणं या सर्वांचा पत्रकारांच्या प्रकृतीवर प्रतिकुल परिणाम होत असतो.प्रकृतीकडं दुर्लक्ष करण्याचाही बहुतेकांचा स्वभाव असतो.परिणामतः अगदी तरूण वयात अनेकांवर वेगवेगळ्या गंभीर आजारांना सामोरे जाण्याची वेळ येते..गेल्या दोन वर्षात किमान 9 तरूण पत्रकाराचं ह्रदयविकाराने निधन झाले किंवा त्यांच्यावर बायपास करण्याची वेळ आली.काही जण पॅरेलेसेसचे शिकार झाले तर काहींना ब्रेन हॅमे्रज झाले.अचानक अशी काही आपत्ती आली तर संबंधित पत्रकाराचे कुटुंब दिशाहिन होते. मदतीचे हात पुढे येतातच असेही नाही.सरकार काही करेल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नसतो.हे सारं टाळण्यासाठी आपणच आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक असते.नियमित शारीरिक तपासण्या केल्या तर संभाव्य संकटापासून आपली सुटका होऊ शकते.त्यामुळेच मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने गेल्या वर्षीपासून राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे.गेल्या वर्षी 3 डिसेंबर रोजी राज्यातील 16 जिल्हयात आणि 126 तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी कऱण्यात आली होती.यावर्षी संपूर्ण राज्यात ही शिबिरं व्हावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.येत्या 3 डिसेंबर रोजी जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्या पुढाकाराने शिबारांचे आयोजन केले जात असून या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.यावर्षी किमान दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी व्हावी असे प्रयत्न आहेत.पत्रकारांनी या उपक्रमास सक्रीय सहभाग नोंदवावा ,ही शिबिरं यशस्वी कऱण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात येत आहे.