आभार ,बीड जिल्हयातील तमाम पत्रकारांचे !

बीड जिल्हयातील तमाम पत्रकारांचं मला अभिनंदन करायचंय,त्यांना धन्यवाद द्यायचेत.सर्व पत्रकारांच्या सहकार्यानं आणि प्रयत्नानं बीड जिल्हयात मराठी पत्रकार परिषदेचं नवं.सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक पत्रकार संघटन उभं राहतंय.अनेक जिल्हयात परिस्थिती अशी आहे की,जी प्रस्थापित मंडळी आहे ती तरूण पत्रकारांना बरोबर घेतच नाही.त्यांना प्रवाहात सामावून घेतले तर आपलं पद आणि अस्तित्व धोक्यात येईल अशी त्यांना भिती असते.बीडमध्येही हेच सुरू होतं.दोघे -चौघे  वर्षानुवर्षे बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा  कारभार हाकत होते.त्यामुळं जिल्हयातील तरूण पत्रकार एकतर विविध स्थानिक पातळीवरील संघटनेत विखुरलेले होते किंवा संघटनेपासून अलिप्तच होते.त्यामुळं तिथं भक्कम एकमुखी संघटन उभं राहात नव्हतं.मी बीडचा असल्यानं बीडमधील संघटनेची हा दुरवस्था सारखी बोचत होती.परिस्थिती बदलली पाहिजे आणि जिल्हयात परिषदेच्या नेतृत्वाखाली भक्कम संघटन उभं राहिलं पाहिजे ही गोष्ट परिषदेने मनावर घेतली.त्यासाठी वडवणी येथील ग्रामीण पत्रकार अनिल वाघमारे यांची विभागीय अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती केली गेली.त्यानंतर धारूर येथील पत्रकार अनिल महाजन यांच्याकडं मराठवाडा विभागीय सचिव पदाची जबाबदारी सोपविली गेली अभ्यासू पत्रकार अतूल कुलकर्णी यांची परिषदेवर नियुक्ती केली गेली. या तिघांनी  मनावर घेतलं,- पत्रकार एकत्र  केले,त्यांना विश्‍वास दिला,आपण एका राज्यव्यापी संघटनेचे सदस्य होत आहात हे वास्तव पटवून दिलं.त्याचा चांगला परिणाम झाला.पत्रकारांनी विश्‍वास दाखविला आणि आज बीड जिल्हयात मराठी पत्रकार परिषदेची  नव्यानं बांधणी झाली आहे.हे करताना मृतावस्थेत आलेली अगोदरची संघटना बरखास्त केली गेली.मराठी पत्रकार परिषद,बीड या नावानं संघटना सुरू ठेवण्याचं ठरलं.त्यासाठी अस्थाई समिती नेमली.या अस्थाई समितीनं जिल्हयात फिरून साडेचारशे पत्रकारांना परिषदेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदस्य करून घेतलं .नव्या दमाचे,नव्या विचारांचे,असे अनेक पत्रकार आज परिषदेबरोबर जोडले गेले आहेत.हे करताना मी स्वतः जिल्हयातील बहुतेक तालुक्यांना भेटी देऊन तेथील पत्रकारांच्या भावना समजावून घेतल्या.सर्वाचं म्हणणं होतं आम्हाला तुमच्याबरोबर यायचंय,पण येऊ दिलं जात नाही.म्हणजे पत्रकारांना विश्‍वासार्ह संघटना हवी होती पण आम्हीच कमी पडत होतो.अर्थात ते सारं आता इतिहास जमा झालं आहे.सदस्य नोंदणी झाल्यानंतर निवडणुका घ्यायच्या आणि त्याही ऑनलाईन निवडणुका असा परिषदेने निर्णय घेतला.त्यानुसार तयारीही झाली.मात्र जिल्हयात साडेचारशे पत्रकार प्रथमच एकत्र येत आहेत.निवडणुका झाल्या तर कटुता येते,नव्यानं गट-तट निर्माण होतात,वाद होतात त्यामुळं किमान या वेळेस तरी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा अनेक सदस्यांनी व्यक्त केली.सदस्यांच्या या भावनेला मोठा प्रतिसाद मिळाला.अध्यक्ष,सरचिटणीस आणि कोषाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आला.कार्याध्यक्षपदासाठी दोन अर्ज आले.मात्र सदस्यांच्या भावना लक्षात घेत आज अशोक खाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि सर्व पदासांठी आज बिनविरोध निवडणूक झाली.त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी सुभाष चौरे ,कार्याध्यक्षपदी दत्तात्रेय अंबेकर,सरचिटणीसपदी भास्कर चोपडे,आणि कोषाध्यक्षपदी संदीप लवांडे यांची बिनवविरोध निवड कऱण्यात आली आहे.निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आगवान आणि  सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल साळुंके यांनी उत्तम काम पाहिले.सर्वोत्तम गावस्कर यांनी सुराज्यच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रियेसाठी जागा उपलव्त्र करून दिली.या दोघांचेही आभार.शिवाय अस्थाई समितीचे ही आभार.   जिल्हयातील तमाम पत्रकारांनी,संपादकांनी  आमच्यावर जो विश्‍वास दाखविला त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचा मी आभारी आहे.बीड जिल्हयात साडेचारशे पत्रकार प्रथमच एका छत्राखाली एकत्र आले आहेत.त्यांची ही एकजूट कायम राहील आणि एक आदर्श संघटना कशी असते याचा वस्तुपाठ बीड जिल्हयातील पत्रकार राज्यासमोर ठेवतील याची मला खात्री आहे.जिल्हयातील सामांन्य पत्रकार,ग्रामीण पत्रकारांना आतापर्यंत कोणी वाली नव्हतं.यापुढं जिल्हयातील एकाही पत्रकाराला मी एकाकी आहे असं वाटणार नाही याची काळजी मी आणि माझे सर्व पदाधिकारी घेतील.हल्ले हा एक विषय आहेच पण पत्रकारांच्या आरोग्याचे प्रश्‍न आहेत,मदतीचे प्रश्‍न आहेत,गृहनिर्माणचे प्रश्‍न आहेत हे प्रश्‍न सोडविण्यासाठी नक्कीच मराठी पत्रकार परिषद,बीड कमी पडणार नाही याची ग्वाही देतो.याचबरोबर जिल्हयातील पत्रकारांनी दाखविलेल्या विश्‍वासालाही तडा जाणार नाही याची काळजी सर्व पदाधिकार्‍यांना घ्यायची आहे.आणखी एक मुद्दा येथे स्पष्ट कऱणे आवश्यक आहे.मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना आहे.या नात्यानं परिषदेला आम्ही मातृसंस्था म्हणतो.त्यामुळं आमची अन्य कोणत्याही संघटनेबरोबर वाद नाहीत,कोणी आमचा स्पर्धक नाही  किंवा आम्ही कोणाचा दुश्‍वासही करीत नाही.पत्रकार संघटीत झाला पाहिजे आणि पत्रकारांचा एक दबावगट राज्यात निर्माण झाला पाहिजे हीच परिषदेची भूमिका आहे.त्यानुसारच बीड मध्येही परिषद काम करणार आहे.परिषदेचं काम पारदर्शक व्हावं यासाठी मी बीडमध्ये जातीनं लक्ष ठेवून असणार आहे.निवणुका चार पदांसाठी होणार होत्या.मात्र त्या व्यतिरिक्त कार्यकारिणी अस्तित्वात येणार असून जिल्हयातील प्रत्येक भागातील प्रामाणिक पत्रकारांना या कार्यकारिणीत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी आणि परिषदेसाठी काम करणार्‍या पत्रकारांचा सत्कार माझ्या देवडी या गावी लवकरच करणार आहे.त्यानंतर बीडमध्येही पदाधिकार्‍यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे.सुभाष चौरे,दत्ता अंबेकर,भास्कर चोपडे आणि संदीप लवांडे या मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन.

.( एस.एम.)  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here