शिवसेना कधी एकदा देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडते आणि राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होते यासाठी काही व्यक्ती आणि शक्ती देव पाण्यात घालून बसल्या आहेत. शिवसेनेला वारंवार स्वाभिमानाची,मराठी अस्मितेची आठवण करून दिली जात आहे ती देखील भावनेच्या भरात शिवसेनेनं निर्णय घ्यावा आणि सरकारमधून बाहेर पडावं यासाठीच.बाळासाहेब असते तर भाजपकडून वारंवार होणारा हा अवमान त्यांनी सहन केला नसता हे पालूपद वरती असतंच.मात्र हे पालुपद लावणारीे मंडळी हे विसरतात की,बाळासाहेबांनाही राजकारण करताना अनेकदा राजकीय तडजोडी स्वीकाराव्या लागल्या आहेत.शिवाय बाळासाहेब असताना भाजपला सव्वाशेच्या आसपास जागा कधीच मिळालेल्या नव्हत्या. जागा कमी असल्याने बाळासाहेबांच्या काळात भाजप नेहमीच धाकटया भावाच्या भूमिकेत वावरत होता.राजकारणात आकडे वाढले की अरेरावी वाढत जाते. भाजपचा आकडा वाढला अन भाजप एकाएकी थोरल्या भावाच्या भूमिकेत पोहोचला .त्यातून धाकट्यावर कुरघोडी,त्याचा अवमान वगैरे सुरू झाले .आजच्या स्थितीत बाळासाहेब असते तरी अशी कुरघोडी भाजपनं केलीच नसती असं म्हणता येणार नाही. संख्याबळ हे त्यामागचं कारण आहे.त्यातूनच संधी मिळेल तिथं आणि तेव्हा सेनेला अवमानित केलं जात आहे.शिवसेनेच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेतली.त्यानंतर माध्यमांत बातमी आली की,’सेनेला पंतप्रधानांनी झापलं’.ही बातमी बाहेर आली कशी? शिवसेनेचे नेते तर आपला अवमान बाहेर सांगणार नाहीत.त्यामुळं ही बातमी भाजपच्या गोटातूनच बाहेर पेरली गेली असण्याची जास्त शक्यता आहे.यामागं आमचे पंतप्रधान शिवसेनेला काडीचीही किंमत देत नाहीत हा संदेश बाहेर जावा हा भाजपचा उद्देश असू शकतो.सेनेने कितीही खुलासे केले तरी भाजपवाल्यांची ही खेळी यशस्वी ठरली आहे यात शंका नाही. हे झालं एक उदाहरण पण प्रत्येक टप्प्यावर सेनेला अवमानित करीत राहायचं आणि सेनेच्या जनमानसातील प्रतिमेला तडे जातील अशी खेळी करीत सेनेची कोंडी करून तिला नामोहरम करायचे ही भाजपची नीती आहे, प्रश्न आहे ,भाजपच्या या नीतीला सेनेने कसे उत्तर द्यायचे याचा.शिवसेना राजकीय पक्ष आहे आणि सेनेला वातानुकुलीत खोलीत बसून सल्ले देणार्या बोरूबहाद्दरांपेक्षा राजकारण जास्त कळते.त्यामुळं कोणी ‘शिवसेनेची मांजर झालीय’ म्हणो की सेनेने सत्तेसाठी स्वाभिमान गहान ठेवला आहे म्हणो प्राप्त परिस्थितीत शिवसेना ज्या पध्दतीचे राजकारण करते आहे त्याला पर्याय नाही हे स्पष्टय.याची काही कारणं आहे.पहिलं म्हणजे,केंद्रात भाजपकडं एवढं बहुमत आहे की,शिवसेनाबरोबर असली काय अन नसली काय नरेंद्र मोदी सरकारला काहीच फरक पडणार नाही.राज्यातही पाठिंबा काढून घेतल्यानं देवेंद्र फडणवीस सरकार पडेल असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे.तशी वेळ आलीच तर बारामतीकर मंडळी भाजपला मदत करू शकते.नाही तरी विधानसभेचे निकाल जाहीर होत असतानाच प्रफुल्ल पटेल यांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दाखविली होतीच.त्यामुळं सेनेने पाठिंबा काढून घेतला तर राष्ट्रवादी समोर येऊन फडणवीस यांचे सरकार वाचवू शकते.शिवसेनेला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून सातत्यानं जे कोणी उचकवत असतात ते राष्ट्रवादीवालेच किंवा त्यांचे हितचिंतक जास्त असतात याकडं दुर्लक्ष होऊ नये.नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या दोस्तीचाही या अंगानंच विचार करावा लागतो.दुसरीकडं भाजपचे नेते सातत्यानं कृष्णकुंज भोवती घिरटया मारत आहेत.रेल्वेचं इंजिन आता पुर्वी सारखं धावणार नसलं तरी ते अजूनही मराठी मतांमध्ये विभाजन नक्कीच करू शकतं.सेनेने सत्तेतून बाहेर पडणं याचा अर्थ राष्ट्रवादी आणि मनसेला भाजपच्या जवळ येण्याची मुभा देण्यासारखं आहे.असं झालंच तर ती सेनेसाठी राजकीय आत्महत्या ठरू शकते.सेना नेतृत्वालाही हे कळत असल्यानं ते सारं हलाहल पचवत परिस्थिती अनुकुल होण्याची वाट पहात आहे हे उघड आहे. पाठिंबा काढून घेतल्यानं सरकारचं काहीच होणार नसेल तर केवळ स्वाभिमान दुखावला म्हणून कोणताही राजकीय पक्ष अशी मस्ती करू शकत नाही .तसं करणं राजकीयदृष्टया कुणाला परवडणारंही नसतं. अवमान सहन होत नसला तरी ती त्याची राजकीय मजबुरी असते.शिवसेनेसमोर हीच मजबुरी असल्यानं सेना एकाच वेळी सत्तेत आणि विरोधात अशी दुहेरी भूमिका पार पाडत आहे.सेनेकडं त्याशिवाय अन्य कोणताच मार्ग नाही.शिवाय सेना सत्तेत आहे म्हणजे लोकहितविरोधी निर्णयाला सेनेने ‘हो ला हो’ म्हटले पाहिजे असं काहीच नाही.सेना हा स्वतंत्र पक्ष आहे,त्यांची प्रत्येक प्रश्नावर स्वतंत्र भूमिका,मतं आहेत.त्यामुळं सत्तेत राहून सेना विरोधात मत कसे व्यक्त करते या म्हणण्याला अर्थ नाही.भाजप मुंबई महापालिकेत यापेक्षा वेगळं काय करतेय?.सेनेबरोबर महापालिकेतली सत्ता उपभोगायची आणि वरती रस्त्यांवरील खडयांपासून भ्रष्टाचारापर्यंत बेंबीच्या देढापासून कोकलत राहायचं हे कोणतं राजकारण आहे? .सेनेचा कथित भ्रष्टाचार किंवा महापालिकेतला कारभार तुम्हाला मान्य नव्हता तर तुम्ही सत्तेतून बाहेर का पडला नाहीत ? असा प्रश्न खरं तर भाजपलाही विचारता येऊ शकतो पण भाजपकडं गोबेल्सच्या भाऊबंदांची मोठी पलटण असल्यानं या प्रश्नाची तेवढी चर्चा होताना दिसत नाही.
राजकारण एवढं सहज,सोपं नसतं.ते सोयीनं करायचं असतं हे जसं भाजपलं कळतं तसंच ते सेनेलाही समजतं.त्यामुळं राजकीय सोय-गैरसोय पाहताना स्वाभिमान,अस्मिता,तत्वं,मूल्य वगैरे शब्द तकलादू ठरतात.आम्ही पत्रकार हे कायमच विसरतो,आणि राजकीय पक्षांना मूल्यांच्या राजकारणाची आठवण करून देण्याची नको ती उठाठेव करतो. राजकारणात चार पाऊलं पुढं जाताना दोन पाऊलं मागंही यावं लागतं.इशारे देताना त्यातला फोलपणाही इशारे देणार्यांना जसा माहिती असतो तसाच तो ज्यांना इशारा असतो त्यांनाही माहिती असतो.त्यामुळं कोणी कितीही जर-तरची भाषा वापरली तरी ती केवळ लोकांना दाखविण्यापुरतीच असते.दिलेल्या तारखांना कधीच कोणी पाठिंबा काढून घेत नसतो हे राजकारणात सातत्यानं आपण सारेच बघत असतो.त्यामुळं सेनेने छपन्न इशारे दिले असले काय आणि हजारदा नव्या तारखा दिल्या तरी पुढील निवडणुकीपर्यंत सेना सत्तेतून बाहेर पडू शकत नाही हे राजकारण कळणार्या प्रत्येकाला ठाऊक आहे.लोकांना काय वाटतं ,किंवा पत्रपंडित काय तारे तोडतात हे पाहून कोणी राजकारण करीत नसते.राजकारण करताना पक्षाचा विचार करावा लागतो.सत्ता हेच जर राजकीय पक्षांचे साध्य असेल तर त्यासाठी काही तडजोडी कराव्याच लागतात.मग त्या लोकांना आवडोत अथवा न आवडोत.अशा तडजोडी सेना करीत आहे आणि त्यांना त्या कराव्याच लागतील.सर्वपक्षांनी सुरू केलेल्या तत्वशून्य राजकारणाचा अपरिहार्य भाग म्हणूनच शिवसेनेच्या या मजबुरीकडं पहाणं भाग आहे.त्यामुळं दोष एकटया शिवसेनेला देता येणार नाही.
भाजपला शिवसेनेची अडचण जशी ठाऊक आहे तद्वतच कितपत ताणायचं हे देखील माहिती आहे.शिवसेनेचा दुरावा भाजपलाही परवडणारा नाही.शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या मदतीनं भलेही फडणवीस सरकार वाचेल पण त्याचे दुरगामी परिणाम भाजपला भोगावे लागतील.कारण भाजपनं भ्रष्टाचार मुक्त सरकारचा नारा देत राज्यात सत्ता परिवर्तन घडवून आणले होते.कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेल्या जनतेनं या पक्षांपासूून मुक्ती मिळविण्यासाठीच भाजपच्या पदरात मतांचं घवघवीत दाण टाकलं आहे.अशा स्थितीत ज्या पक्षातील अनेक नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत,ज्या पक्षाचे काही नेते तुरूंगाची हवा खात खितपत पडले आहेत त्यापक्षाला जवळ करून सरकार चालविणं राज्यातील जनतेला कदापिही मान्य होणारं नाही.त्याची किंमत भाजपला पुढील निवडणुकीत मोजावीच लागेल. भाजप नेतृत्वाला हे नक्की माहिती असल्यानंच सेनेला कधी धाकात ठेवत,तर कधी कुरवाळत पुढं जायचं अशी भाजपची नीती आहे.राज ठाकरेंचा फार उपयोग होणार नाही,हे ही भाजपला नक्की माहिती आहे.मात्र सेनेला कहयात ठेवण्यासाठी राज ठाकरेंची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न होतो आहे.’मुंबई महापालिका निवडणुकीत आमच्याबरोबर युती केली नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जावू’ अशी भीती सेनेला दाखविणयासाठीच आशिष शेलार असोत किंवा नितीन गडकरी असोत कृष्णकुंजला वारंवार भेटी देत असतात.अशा स्थितीत सेनेच्या कोणत्याही चुकीच्या निर्णयाचा फटका भाजप आणि सेनेलाही बसणार असला तरी जास्त नुकसान सेनेचेच होणार आहे हे उघड आहे.
दोन्ही पक्षाचं कितीही पटत नसलं तरी शिवसेना स्वतःहून सरकारचा जसा पाठिंबा काढून घेऊ शकत नाही तव्दतच भाजपही सेनेला सत्तेतून बाहेर हाकलू शकत नाही.असं करणं कोणत्याच पक्षांला परवडणारं नाही .आपल्यामुळं सरकार पडलं असा संदेश जननेत जाणं राजकारणात अडचणीचं असतं.त्यामुळं आम्हाला सरकार टिकवायचं होतं मात्र समोरच्यानं आगळीक केली असं वक्तव्य करायला संधी मिळावी असा प्रयत्न दोन्ही बाजू करीत असतात. या सार्या अडचणी असताना आम्ही पत्रकार फुकाचे सल्ले देत असतो.ते कोणी गांभीर्यानं घेत नाही.कारण आमच्या लेखण्या दोन्ही बाजुंनी चालतात.म्हणजे आज उध्दव ठाकरे स्वाभिमान जपत नाहीत म्हणून आम्ही त्यांना ठोकतो उद्या त्यांनी पाठिंबा काढून घेतला आणि हाती काही लागले नाही तर मग आम्हीच त्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे करायला मोकळे असतो.त्यामुळं वास्तवाचं भान आणि परिस्थितीचा रेटा या अंगानंही राजकीय घडामोडींचा विचार करण्याची गरज असते आणखी एक महत्वाचा मुद्दा शिल्लक उरतो.सेनेतल्या अनेकांना सत्ता हवी आहे.विशेषतः जे सत्तेत आहेत त्यांना सत्तेबाहेर पडणं अवघड होणार आहे.स्वाभिमान जपत सत्तेतून बाहेर पडायचे तर पक्षातंर्गत विरोधाला नेतृत्वाला तोंड द्यावं लागेल.यातून कदाचित पक्षातही फूट पडू शकते.पक्षातील काही जण भाजपच्या संपर्कात असल्याच्या वावडया अधून-मधून उठत असतात.या सार्या वास्तवाकडं दुर्लक्ष करून कोणताही आतताई निर्णय घेणं शक्य नसतं.त्यामुळंच अनेकदा परस्पर विरोधी भूमिका घेण्याची,अवमान सहन करण्याची भूमिका सेनेला घ्यावी लागत आहे.त्यात शिवसेना नेतृत्व काही चूक करतंय असंही नाही.कारण भाजपनंही अनेक वर्षे अशीच फरपट अनुभवलेली आहे.अनकेदा अवमान सहन केलेला आहे,मातोश्रीवर जाऊन अनेकदा अपमानीत होऊन भाजप नेत्यांना रिक्त हस्ते परतावे लागलेले आहे.देशातला असा कोणताच पक्ष नसेल की,त्याला कधी ना कधी शिवसेनेची आज जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेतून जावं लागलेलं नसेल.हे राजकारण आहे आणि राजकारणात सारे दिवस सारखे नसतात.जसे दिवस येतील तसे राजकारणात बदलावे लागते.जे परिस्थितीनुसार बदलतात तेच राजकारणात टिकतात.जे बदलत नाहीत ते नामशेष होतात हा काळाचा महिमा आहे.स्वाभिमानाच्या गोष्टी करणारे एक तर राजकारणाबद्दल अनभिज्ञ असतात किंवा ते सहेतूक असं बोलत असतात.आज तत्वाचं ,विचाराचं ,स्वाभिमानाचं राजकारण शिल्लक नाही.त्यामुळं एकटया शिवसेनंनं तसं राजकारण करावं अशी अपेक्षा चुकीची ठरते.मग शिवसेना जी अस्मितेची भाषा वापरते त्याचं काय ? असा प्रश्न विचारला जाउ शकतो . उत्तर सोपे आहे .अशी भाषा काही एकटी सेनाच वापरते असे नाही सारेच राजकीय पक्ष ती वापरत असतात.तरीही प्रसंगानुरूप सोयीचं राजकारणच करीत असतात.प्राप्त परिस्थीत शिवसेना तेच करीत आहे.शिवसेनेकडे आज तरी दुसरा पर्याय नाही.उध्दव ठाकरेंना स्वबळावर सत्ता मिळवायचीय आणि पक्षही टिकवायचा आहे त्यामुळंच त्यांना काही तडजोडी कराव्या लागत आहेत.ते स्पष्ट बोलू शकत नाहीत पण त्यांची मजबुरी लपून राहिलेली नाही.
एस.एम.देशमुख
९४२३३७७७००
या लेखाची कॉपी माझ्या ब्लॉगवरून करता येईल.त्यासाठी www.smdeshmukh.blogspot.in