11 वर्षांत अवघ्या दोघांना पत्रकारितेची पी.एचडी.

  0
  793
   मार्गदर्शक नाही; विभागाचा चार जण असल्याचा दावा
  मुंबई – मुंबई विद्यापीठाकडे “संज्ञापन आणि पत्रकारिता‘ या विषयासाठी मार्गदर्शक नसल्यामुळे पत्रकारितेतील संशोधनाची आबाळ सुरू आहे. 11 वर्षांत अवघ्या दोघांना पी.एचडी. मिळू शकली आहे. पी.एचडी.साठी चार मार्गदर्शक असल्याचा पत्रकारिता विभाग प्रमुखांनी केलेला दावा खुद्द कुलगुरूंनी खोडून काढला आहे. या परिस्थितीला विद्यापीठ प्रशासन तसेच संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातील समन्वयाचा अभाव कारणीभूत आहे, हे “सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम‘ने उघड केले आहे.

  मुंबई विद्यापीठाने विविध विषयांत संशोधन करण्यासाठी पात्रता परीक्षा म्हणजेच पी.एचडी. एन्ट्रन्स टेस्ट (पेट)साठी अर्ज मागवले आहेत. ते दाखल करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत आहे; मात्र संज्ञापन आणि पत्रकारिता विषयावरील संशोधनासाठी एकही मार्गदर्शक नसल्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. संशोधनासाठी किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे, हे स्पष्ट केलेले नाही. या अपूर्ण माहितीमुळे “पेट‘चा अर्ज दाखल करण्याबाबत संशोधनासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.

  विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाविषयीची माहिती अद्ययावत केली जात नसल्याचा फटका होतकरू संशोधकांना बसू लागला आहे. त्यामुळे 11 वर्षांत पत्रकारितेच्या केवळ दोन विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची पी.एचडी. मिळवता आली. अशा स्थितीत पुन्हा विद्यापीठाकडून संशोधनासाठी “पेट‘चे अर्ज मागवण्यात आल्याने पत्रकारितेच्या मार्गदर्शकाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देण्यात येत आहे. संज्ञापन आणि पत्रकारितेतील संशोधनासाठी विद्यापीठाकडे चार मार्गदर्शक आहेत. तीन वर्षांपासून विभागाकडून विद्यापीठ प्रशासनाला संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करण्यास सांगण्यात येत आहे; मात्र याबाबत कार्यवाही झाली नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. पत्रकारितेतील संशोधनाबाबत विद्यार्थी इच्छुक असूनही या गोंधळामुळे ते “पेट‘कडे वळत नाहीत.
  – डॉ. सुंदर राजदीप, विभागप्रमुख, संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग, मुंबई विद्यापीठ

  या विषयाच्या शिक्षकांची उणीव भासत असल्याने हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विद्यार्थीही या विषयाच्या संशोधनाकडे जास्त वळत नाहीत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या “पी.एचडी. एन्ट्रन्स टेस्ट‘च्या जाहिरातीतील माहिती अद्ययावत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी संभ्रमात राहू नये.
  – डॉ. संजय देशमुख, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ (सकाळवरू साभार )

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here