एनडीटीव्हीवरील बंदीची  बातमी येत असतानाच मुंबईतील तीन फोटोग्राफर्सना टाटाच्या बॉम्बे हाऊसमधील सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची बातमी आल्याने सरकार,भांडवलदार आणि समाजकंटक माध्यमांबाबत किती असहिष्णू झाले आहेत हे पुन्हा एकदा समोर आले आहे.पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण की आज बॉम्बे हाऊस समोर पत्रकारांना झालेली मारहाण या वर्षातली 66 वी घटना आहे.अन हे सारे प्रकार पत्रकार कामावर असताना म्हणजे  डयुटी करताना झालेले आहेत.काय करणार आहेत या घटनेबद्दल आम्ही पत्रकार संघटना,? काय करणार आहे सरकार ? आणि काय करणार आहे समाज?  हे प्रश्‍न पुन्हा उग्र पणे अंगावर येत आहेत.फोटोग्राफरची चूक काय होती,? ते आपली डयुटी पार पाडत होते.टाटाच्या बॉम्बे हाऊसमधील मुख्यालयात सायरन मिस्त्री आले होते.तेमुख्यालयात प्रवेश करीत असताना त्यांची छबी टिपण्यासाठी फोटोग्राफर्स सरसावले.त्यांना सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केला त्यांना धक्काबुक्की करून दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र सर्वच छायाचित्रकारांसाठी फोटो महत्वाचा असल्याने ते पुन्हा पुन्हा फोटो घेण्याचा प्रयत्न करीत होते.त्यानंतर सायरन मिस्त्री मुख्यालयात गेले,छायाचित्रकार कॅमेरे सावरत परत फिरले.प्रकरण शांत झाले असे दिसत असतानाच सुरक्षा रक्षक बाहेर आले आणि त्यांनी छायाचित्रकारांवर हल्ले चढविले.दिसेल त्या छायाचित्रकारांना सुरक्षा रक्षकांनी बेदम मारायला सुरूवात केली.पाठलाग करून मारहाण केली.त्यात टाइम्स ऑफ इंडियाचे संत कुमार,हिंदुस्थान टाइम्सचे अरजित सिंग,मिड डे चे अतुल कांबळे जखमी झाले आहहेत.या घटनेचा विविध पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे.ते स्वाभाविक ही आहे मात्र वारंवार असे दिसून आलंय की,अशी घटना घडली की,आम्ही व्हॉटस अ‍ॅपवर चर्चेचे फड रंगवत असतो.मग रस्त्यावरील आंदोलनात कधी न दिसणारे अनेक मान्यवर (?)  पत्रकार वेगवेगळे सल्ले द्यायला लागतात,हे करा,ते करा वगैरे.असे सल्ले देणार्‍यांपैकी बहुतेकजण कायद्याला विरोध करीत असतात.आज कायदा असता तर या हल्ल्याबद्दल सुरक्षा रक्षकांना अटक झाली असती आणि त्यांना तुरुगाची हवा खावी लागली असती.तो नसल्यानं एनसी दाखल केली जाते.याला कारवाई म्हणता येत नाही.काही होत नाही,आम्ही  चर्चेचे फड रंगवितो यामुळे हल्लेखोरांनी पत्रकारांची पोथी ओळखली आहे.त्यामुळं असे हल्ले होत राहणारच आहेत.अशी घटना घडली की,थेट मुख्यमंत्र्यांना भेटणे,रस्त्यावर उचरून आंदोलन करणे,यापुढे सायरन मिस्त्रीच्या सर्व बातम्या आणि छायाचित्रांवर बहिष्कार टाकणे असे प्रयोग करावे लागतील.एकी नसल्यानं ते होत नाहीत  दरवेळा तेच ते रडगाणे गावे लागते .आजच्या घटनेत एकच स्वागतार्ह घटना घडली आहे,ती म्हणजे सर्वच वाहिन्यांनी ही बातमी चालविली आहे।ठळकपणे प्रसिध्दी दिली आहे.त्याबद्दल सर्वच संपादकांचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे आभार.पुढेही जर आपण एकजूट दाखविली नाही तर हल्ले होत राहणार,डोकी फुटत राहणार,सरकार नक्राश्रू गाळत राहणार,समाज तटस्थपणे बघत राहणार आणि आपण घरात बसून फेसबुकवर वांझोटया चर्चा करीत राहणार.या घटनेचा प्रत्येक पत्रकाराने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.हल्ल्यात जे पत्रकार जखमी होतात त्यांच्याकडेच संशयानं पाहण्याची एक मानसिकता आहे.ती चुकीची आणि आपल्याच लोकांचं मानसिक खच्चीकरण कऱणारी आहे.प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनने या प्रकरणी आंदोलन करावे आम्ही सर्वशक्तीसह या आंदोलनात सहभागी होऊ.संपूर्ण महाराष्ट्र मुंबईतील फोटोग्राफर्सबरोबर आहे.सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत किमान आता तरी लवकर कायदा करावा ही अपेक्षा आहे

( मराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रकाशित ) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here