१ तालुका ५ दिवस ३ आत्महत्या..

0
2972

एका तालुक्यात पाच दिवसात तीन
शेतकरयांच्या आत्महत्या
तर संपूर्ण मराठवाडयात किती?

शेतकरयांच्या आत्महत्येच्या बातम्या अंगाचा थरकाप उडवित आहेत.. बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं प़माण चिंता वाटावं एवढं प़चंड आहे.. गेल्या पाच दिवसात माझ्या वडवणी तालुक्यात तीन शेतकरयांनी आत्महत्या केल्या.. कवडगाव, लिंबगाव ही माझ्या गावाजवळ ची गावं आहेत.. तेथील हे शेतकरी आहेत.. एका तालुक्यात पाच दिवसाला तीन आत्महत्या.. तर मग जिल्ह्यात, विभागातले आकडे किती मोठे असू शकतात.. जरा विचार करा..
पावसानं शेतीची वाट लावली.. कपाशी, सोयाबिन ही पिकं जमिनदोस्त झाली.. तूरीचं बियाणं देखील निघणार नाही.. गंमत कशीय बघा.. सोयाबिन घरात आलंय तेव्हा भाव पडले.. साधारणतः महिन्यापुर्वी सोयाबिन दहा – बारा हजार रुपये क्विंटल होतं.. आज साडेचार – पाच हजार रूपये भाव नाही.. मजुरांनी सोयाबिन काढायला एकरी चार हजार रूपये घेतले, मळणी यंत्र चालकांनी ४००रूपये क्विंटल भाव काढला.. हा खर्च निघेल एवढं सोयाबिन देखील पदरात पडलं नाही.. कपाशीचंही असंच.. जेथे ५० क्विंटल कपाशी व्हायची तिथं दोन क्विंटलही कपाशी निघत नाही..शेतकरयाकडे कपाशी नाही म्हणून भाव वाढविले गेले.. गावात ८००० रूपये क्विंटल कापूस खरेदी सुरूय.. पण उपयोग काय.? .. अख्खं गाव झोडलं तरी १०० क्विंटल कपाशी मिळणार नाही.. तात्पर्य शेतकरी पूरणत:नागवला गेलाय..
सरकारनं काय केलं? नुकसान भरपाई पोटी हेक्टरी २०,००० रूपये देण्याची घोषणा केली..ती रक्कम दिवाळीपूर्वी मिळाली नाही तर अनेकांना अंधारात दिवाळी साजरी करावी लागेल.. ही रक्कम फक्त दोन हेकटरसाठीच मिळणार आहे.. विदर्भ आणि मराठवाड्यात असंख्य शेतकरी असे आहेत की ज्यांची जमिन धारणा किमान पंधरा ते वीस एकर आहे.. नुकसान भरपाई मिळणार फक्त पाच एकरसाठी.. ती ही फक्त ४० हजार.. म्हणजे रडतीचे डोळे पुसणे.. अशा स्थितीत शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय?
ही सारी स्थिती आजची आहे का? नाही.. हा खेळ वर्षानुवर्षे सुरूय.. तो राजकारणी, अधिकारी, माध्यमं आणि शेतकरी संघटनांना देखील माहिती आहे.. त्यावर कोणी बोलत नाही.. एक महिन्यापासून सारं राजकारण आर्यन खान भोवती फिरतंय, माध्यमांचे मालक टीआरपीसाठी हे दळण दळत राहा म्हणून संपादकांच्या मानगुटीवर बसलेत.. त्यामुळे शेतकरयांच्या व्यथा, शेतकरयांच्या आत्महत्या या विषयाचं कोणालाच काही पडलं नाही.. शेतकरयांच्या आत्महत्येला टीआरपी मिळत नसल्याने माध्यम मालकांना ही काही पडलं नाही.. शेतकरी संघटनांनी स्वतःला कुठल्या ना कुठल्या राजकारण्यांच्या दावणीला बांधून घेतलंय.. शेतकरी नेत्याला जो पक्ष खासदारकी, आमदारकी देईल त्याची पालखी उचलणयाचं काम शेतकरी नेते करीत आहेत.. एवढं अस्मान कोसळलंय, पण एकही शेतकरी संघटना रस्त्यावर येत नाही का? याचं उत्तर या नेत्यांनी दिलं पाहिजे.. पण अशी उत्तर देण्याच्या भानगडीत कोणीच पडत नाही.. स्वतःची दुकान चालली की बस्स.. मग जगाला आग का लागेना.. शेतकरी ही मोठी ताकद आहे त्यांना सक्षम आणि निस्वार्थ नेतृत्व मिळालं तर सत्तेला वठणीवर आणण्याची ताकद शेतकरयामधये आहे..पण असं नेतृत्व कोठून आणणार? सर्वांनीच गोड बोलून शेतकरयांचा काटा काढलयानं शेतकरयांचा कोणावर विश्वास उरला नाही.. आपण एकाकी पडलोत, कोणीच वाली उरलेलं नाही ही भावना शेतकरयांना आत्महत्येस प़वृत्त करीत आहे.. म्हणजे शेतकरयांच्या आत्महत्येला सरकार किंवा कोणी एक घटक नव्हे तर आपण सारेच समान जबाबदार आहोत..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here