उंदेरी किल्ला
असा उधळला किल्ला विक़ीचा डाव”

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अशा काही घटना, प्रसंग घडत असतात की, ते कायम आपल्या मनात घर करून राहतात.. काही बातम्यांच्या बाबतीत पत्रकारांना हाच अनुभव येतो.. या बातम्या कायम स्मरणात राहतात.. अलिबागच्या समुद्रातील उंदेरी किल्ला विक़ीची बातमी देखील माझ्या मनात कायम पिंगा घालत असते.. पंधरा – सोळा वर्षे उलटून गेली.. ही बातमी आणि त्यानुषंगानं घडलेल्या घटना मी विसरू शकलो नाही..
‌अलिबाग – मुरूड परिसरात समुद्रात जंजिरा, पद्मदुर्ग, कुलाबा, खांदेरी, उंदेरी असे काही जलदुर्ग आहेत.. यातील जंजिरा आणि कुलाबा सोडले तर अन्य दुर्गावर पर्यटकांना जाता येत नाही किंवा जायला बंदी आहे असं म्हणा.. त्यामुळे पद्मदुर्ग, खांदेरी – उंदेरी हे जलदुर्ग निर्मनुष्य असतात.. खांदेरी – उंदेरी पर्यटकांसाठी खुले करण्याची आणि या जल मार्गावर जलवाहतूक करण्याची घोषणा रायगडचे तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनी २००५ च्या डिसेंबरमध्ये केव्हा तरी केली होती.. पुढारयांच्या अशा फसव्या घोषणा करण्याची सवय आणि हौस असल्यानं आम्ही पत्रकारांनी या घोषणेकडं गांभीर्याने पाहण्याची गरज नव्हती.. टाळ्या मिळविण्यासाठी अशा घोषणा असतात हे पत्रकारांना अनुभवानं ज्ञात होतं.. मात्र मे. डॉल्फिन स्टोनक़ेस्ट इस्टेटस् प़ायव्हेट लिमिटेड या कंपनीने पालकमंत्रयांची ही घोषणा गंभीरपणे घेतली.. मंत्र्यांनी सुतोवाच केलंच आहे तर आज नाही तर उद्या उंदेरी किल्ल्यावर जलवाहतूक सुरू होणारच आहे, तत्पुर्वी हा किल्ला आपल्या ताब्यात आला पाहिजे असा निर्धार करून कंपनी कामाला लागली..उंदेरीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे कंपनीचे मनसुबे होते..ते उधळून लावण्यात आम्ही यशस्वी झालो..
‌उंदेरी किल्ला हा थळ ग़ामपंचायतीच्या हद्दीत येतो..थळ गावाच्या उत्तरेला साधारणतः अर्ध्या किलो मिटर अंतरावर अरबी समुद्रात हा किल्लाय.. शत्रूंच्या आरमारावर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला.. या किल्ल्यांच्या माध्यमातून कुलाबा किल्ल्याचं रक्षण करता यावं अशी देखील यामागं योजना होती…

खांदेरी – उंदेरी या दोघी जावा जावा,

मध्ये कुलाबा गं कैसा खातंय हवा..

यासारखी काही कोळीगीत या किल्ल्यांच्या अनुषंगानं रचली गेली होती.. ती गीतं तिकडं लोकप्रिय आहेत.. जो इतिहास आहे, त्यानुसार पेशवाईचा पाडाव झाल्यापासून म्हणजे 1820 पासून ते देश स्वतंत्र होईपर्यंत म्हणजे 1947 पर्यत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.. त्यानंतर किल्ला भारत सरकारच्या अखत्यारित गेला.. .. तरीही पांडुरंग रखमा कोळी यांचं नाव वहिवाटदार म्हणून कसं लागलं,? कोणी लावलं? हे समजणं कठीण.. पांडुरंग कोळी यांच्या पश्चात त्यांच्या वारसाची नाव किल्ल्याच्या कागदपत्रावर चिकटत गेली.. त्यामुळे किल्ला आपल्याच मालकीचा आहे असा गोड गैरसमज या वारसांनी करून घेतला किंवा त्यांचा तसा समज करून दिला गेला.. .. त्यातून किल्ला बिनशेती केला गेला आणि सहाजणांची नावं सातबारावरील मालकी हक्काच्या कॉलम मध्ये दिसू लागली.. हे सारं नियोजनबद्ध पद्धतीनं झालं होतं हे तर उघड आहे.. किल्ला बिनशेती वगैरे कसा झाला? अशा बालबुद्धी प़श्नांना काही अर्थ नसतो..कारण आपल्याकडे “कुछ भी होता है” हे सर्वज्ञात आहे.. एकदा सातबारा अपडेट झाल्यानंतर किल्ल्याच्या विक़ीची प्रकिया सुरू झाली.. २५ जानेवारी २००६ रोजी रमेश हिरानंद कुंदनमल यांच्या नावे १२ लाख रूपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले..१६ मे २००६ रोजी १४५१ /२००६ या क़माकाने साठे करार करण्यात आला.. कागदोपत्री किल्ल्याची किंमत २ कोटी रूपये दाखविण्यात आली.. तुम्ही म्हणाल, दोन कोटीं रूपयांना मुंबईत 500 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट देखील मिळत नाही इथं तर अख्खा किल्ला दोन कोटीला विकला जात होता.. ते कसं शक्यय? शंका रास्तच आहे.. मात्र ही चलाखी स्टॅम्प ड्युटी वाचविण्यासाठी होती.. कागदोपत्री किंमत दोन कोटी दाखविली असली तरी व्यवहार त्यापेक्षा कितीतरी जास्त किमतीला ठरला होता.. यातून ज्यांनी किल्ला विकला ते मालामाल होणार होते..ज्यांनी खरेदी केला त्यांची चांदी होणार होती…यातली खरी गंमत पुढंच आहे..उंदेरी किल्ला विकला जाणार आहे याची कुणकुण प्रांत अधिकरयांना लागली होती.. त्यांनी अलिबागच्या
दुय्यम निबंधकांना पत्र लिहून “उंदेरी किल्ला विकण्याचा प़यत्न झाल्यास साठेकरार नोंदवून घेऊ नये” अशा सूचना केल्या होत्या..या सुचनांना तत्कालीन दुय्यम निबंधकांनी केराची टोपली दाखविली..किल्ला विक़ीचा साठेकरार त्यांनी बिनधास्तपणे नोंदवून घेतला.. एवढी हिंमत त्यांच्यात कशी आली? कोण पाठराखण करीत होते त्यांची..? हे सारे प्रश्न कायम अनुत्तरीत राहिले.. साठेकरार नोंदवून घेताना कोणत्याच गोष्टींची शहानिशा केली गेली नाही.. एरवी आधार कार्डावरील फोटो अस्पष्ट असला तरी सामान्यांना वेठीस धरणारया या विभागाने सातबारावर ज्यांची नावं देखील नाहीत अशांना विक्री करणारयांच्या कॉलम मध्ये दाखवून त्यांच्या स्वाक्षरीने व्यवहार केला.. या पंकरणात दुय्यम निबंधक कार्यालयाने जे औदार्य दाखविले ते विनाकारण असेल का? सगळ्यांना खूष केलं गेलं होतं.. आणि ‘काही काळजी करू नका आम्ही आहोत’ असा विश्वासही दिला गेला होता.. परिणामतः सारं बिनधास्त आणि निर्विघ्न पार पडलं होतं..म्हणजे बघा, किल्ला कोणाचा? विकतंय कोण? साराच गोलमाल..
‌१६ मे २००६ रोजी उंदेरी विक़ीचा साठे करार .. संध्याकाळी ४.३० वाजता नोंदविला गेला.. ठीक पाच वाजता आमचे तेव्हाचे चीफ रिपोर्टर जनार्दन पाटील यांच्या हाती पाच – सव्वापाच वाजता साठेकराराची सारी कागद पत्रे पडली.. जनार्दननं मला फोन करून “उंदेरी किल्ला दोन कोटीला विकला” गेल्याचं सांगितलं.. माझा विश्वास कसा बसेल.? . सरकारी किल्ला खाजगी व्यक्ती कसा काय विकू शकते? माझा निरर्थक सवाल? .. किल्ल्याची दुरूस्ती करायलाही जो विभाग कोणाला परवानगी देत नाही तो पुरातत्व विभाग किल्ला विक़ी ला परवानगी कसा देऊ शकेल? आणि किल्ला विकला जात असेल तर त्याकडे डोळेझाक कसा करेल? हे मला पडलेले सवाल… “कागदपत्रं घेऊन लगेच ऑफिसला ये” अशा सूचना जनार्दन पाटील यांना मी केल्या.. तो आला.. कागदपत्रं पाहून ” मी सुन्न झालो… असं कसं होऊ शकतं? या प़श्नांनं डोकं गरगरत होतं.. .. तावातावात आठ कॉलमची बातमी आणि सणसणीत अग्रलेख लिहिला.. सोबतीला उंदेरी किल्ल्याचा इतिहास देखील छापला.. ,साठे कराराचे फोटो देखील सोबत होते.. ..नंतर महिनाभर या बातमीचा आम्ही फॉलोअप घेत राहिलो.. त्याचा परिणाम झाला.. किल्ला विक़ीच्या बातमीनं सर्वत्र खळबळ उडाली.. चौकश्या सुरू झाल्या.. दुय्यम निबंधकांना तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांनी सस्पेंड केलं.. या किल्ला विक़ी प़करणात १७ जणांना आपल्या नोकरया गमवाव्या लागल्या.. नंतर हा साठे करार आणि सर्व व्यवहार रद्द करण्यात आले.. महाराजांचा किल्ला धनदांडग्यांच्या घश्यात जाणार होता.. पंचतारांकित हॉटेल तिथं उभं राहणार होतं.. जनार्दन पाटीलच्या जागरूकतेमुळं धनदांडग्यांचं हे स्वप्न भंग पावलं.. .जनार्दन
पाटीलची सविस्तर मुलाखत . टाइम्स ऑफ
इंडियानं छापली.. जनार्दनचं कौतूक
करणारी एक मोठी जाहिरात आम्ही देखील कृषीवल मध्ये छापली.. .जनार्दनला पुरस्कार मिळाले..जनार्दन पाटील एक हाडाचा पत्रकार.. त्याला बातमीचा वास यायचा.. चांगला जनसंपर्क असल्यानं बातम्या चालत त्याच्याकडे येत.. रायगड जिल्ह्यातील अशा अनेक महत्वाच्या बातम्या त्यानं दिल्या.. पुढं तो वकील झाला.. राजकारणातही गेला.. पुढील राजकीय वाटचालीत त्याला पत्रकारितेतील या संबंधांचा चांगला उपयोग झाला..किल्ला विक़ीची बातमी ही वार्ताहर म्हणून जनार्दन आणि संपादक म्हणून माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची बातमी ठरली.. एक मोठं काम आपल्या हातून घडलं त्याचं समाधान आजही आम्हाला आहे..
विषय इथंच संपणार नव्हता.. १७ मेच्या अंकात बातमी आल्यानंतर आणि साठेकरार रद्द झाल्यानंतर ज्यांचे हितसंबंध दुखावले होते अशी मंडळी आमच्या आरत्या तर उतरणार नव्हती..हितसंबंधी जनार्दनचा शोध घेत होते.. त्याला धमक्या दिल्या जात होत्या.. आमच्या विरोधात काही तरी शिजतंय याची कुणकुण पोलिसांना लागली असावी.. कारण न मागता पोलिसांनी आम्हा दोघांनाही पोलीस संरक्षण दिलं होतं..
एक महिनाभर बंदुकधारी पोलीस चोवीस तास बरोबर होता..पोलीस संरक्षण हा आपल्या सारख्या सर्वसामांन्य माणसासाठी किती त्रासदायक प़कार असतो हे आम्ही तेव्हा अनुभवत होतो. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी देखील मला फोन करून “सावध राहण्याच्या सूचना” केल्या होत्या..एक महिना मी, जनार्दन पाटील आणि आमचे कुटुंबिय तणावात होतो..आम्ही तणावात होतो पण घाबरलो नाहीत.. कारण महिनाभर सतत बातमीचा पाठपुरावा आम्ही करीत होतो.. रोज नवनवी आणि धक्कादायक माहिती समोर येत होती.. विषय फक्त खरेदीदार आणि किल्ला विकणारे यांच्या पुरताच सीमित नव्हता.. काही वरिष्ठ अघिकारी आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढे धाडस कोणी करू शकत नव्हते..हे सारं दिसत होतं.. त्या सर्वांना आम्ही अंगावर घेणं सोपं नव्हतं.. तो थोका आम्ही पत्करला होता.. पत्रकारांच्या आयुष्यात केव्हा तरी असे प्रसंग येत असतात आणि पत्रकारांचा खरा कस तेव्हाच लागतो.. सारे थोके पत्करून आम्ही आमच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिलो होतो..
एवढं सारं घडून गेल्यानंतर देखील उंदेरीची अवस्था आजही “जैसे थे” आहे.. जलवाहतूक सुरू करण्याची २००५ ची जयंत पाटील यांची घोषणा अपेक्षे प़माणे घोषणाच राहिली..खरं तर झालेल्या घोषणेनुसार उंदेरीवर जलवाहतूक सुरू झाली आणि खांदेरी – उंदेरी रोप वे ने परस्परांशी जोडले गेले तर अलिबागला एवढे पर्यटक येतील की कोणी कल्पना करू शकणार नाही.. एवढी कल्पकता कोणी दाखवत नाही.. आज अलिबागला आलात तर बघायला काय आहे? समुद्रावर तुम्ही किती वेळ थांबू शकाल? अलिबागला आलेल्या पर्यटकाला किमान दोन दिवस त्याला तेथे थांबून ठेवता येईल असा विचार करून अलिबागचं नियोजन झालं पाहिजे.. त्यासाठी कुलाबा, खांदेरी, उंदेरीचा भरपूर उपयोग करता येईल..त्यादृष्टीनं कोणी विचार करीत नाही.. आपल्या पुर्वजांच्या वैभवाचे आणि शौर्याचे साक्षीदार असलेले हे किल्ले अक्षम्य उपेक्षेचे शिकार ठरत आहेत.. मध्यंतरी कुलाबा किल्ल्याच्या तटरक्षक भिंती ढासळत असल्याची बातमी शोकाकुल करून गेली.. आम्ही असे किल्ले पुन्हा बांधू शकत नाहीत पण किमान त्यांचे रक्षण आणि संवर्धन तरी करू शकतो ना? मात्र ते देखील आमच्याकडून होत नाही .. त्यामुळे धनदांडगयांची किल्ले खरेदी पर्यंत मजल गेली.. समाजाला देखील काही घेणं – देणं नाही.. जे काही व्हायचंय ते परस्पर व्हावं अशी मानसिकता असल्याने समाज देखील अशा गोष्टींबाबत आग़ही असतो असं दिसत नाही.. आत्मप्रौढीचा दोष पत्करून सांगू इच्छितो की, कृषीवलच्या माध्यमातून आम्ही हा विषय लावून धरला नसता तर किल्ला विकला गेला होता.. सारा व्यवहार गुप्तपणे झाला होता.. आणि याचे धागेदोरेवर पर्यत पोहचलेले असल्याने किल्ला विकलयाचं कोणाला कळलं देखील नसतं.. मग एक दिवस महाराजांच्या या सुंदर आणि भक्कम किल्ल्यावर पंचतारांकित जलसा सुरू असल्याचं चित्र आपणास पहावं लागलं असतं..

एस.एम.देशमुख


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here