़खोडवेकरांची खोड मोडली…

0
1030

खोडवेकरांची खोड मोडली…
नांदेड येथील दैनिक प्रजावाणीनं जनहिताच्या काही बातम्या छापल्या पण त्या आपल्या विरोधात असल्याची समजूत करून घेत नांदेड मनपाचे आयुक्त सुशील खोडवेकर यांनी प्रजावाणीच्या जाहिराती बंद कऱण्याचा एकतर्फी निर्णय़ घेतला .हा निर्णय़ घेताना त्यांनी कोणतंही कारण दिलं नव्हतं.मनपानं जाहिराती बंद केल्यानं प्रजावाणीचं फार काही बिघडणार नव्हतं.त्यामुळं मुद्दा केवळ जाहिराती बंद करण्याचा नव्हताच,मुद्दा होता तो वृत्तपत्र स्वातंत्र्याचा,आर्थिक नाकेबंदी करून वृत्तपत्रांचा आवाज बंद कऱण्याच्या प्रय़त्नाचा. प्रजावाणीनं नेहमीच वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी मोठी झळ सोसली आहे.त्यासाठी लढा दिलेला आहे.त्यामुळं खोडवेकरांच्या अरेरावीस प्रजावाणी भीक घालण्याची शक्यता नव्हती. अपेक्षेप्रमाणं खोडवेकरांच्या निर्णय़ाच्या विरोधात प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे खंबीरपणे उभे राहिले.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदनं देखील खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभं राहण्याची भूमिका घेतली.विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आला.अखेर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी तातडीनं याची दखल घेत प्रजावाणीच्या जाहिराती परत सुरू कऱण्याचा आदेश मनपा आयुक्तांना दिला आहे.तसा एसएमएस मुख्यमंत्र्यांनी स्वतः शंतनू डोईफोडे यांना करून याची माहिती दिली आहे.वृत्तपत्राच्या खंबीर भूमिकेचा आणि पत्रकारांच्या एकजुटीचा हा विजय आहे असं आम्हाला वाटतं.मुख्यमंत्र्यांनी प्रजावाणीच्या लढ्याची तातडीनं दखल घेऊन प्रजावाणीला न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्र्याना मनापासून धन्यवाद.तसेच खोडवेकरांच्या अरेरावीला न जुमानता प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.प्रजावाणीनं घेतलेल्या भूमिकेमुळं खोडवेकरांची खोड मोडली हे बरं झालं.यानंतर तरी खोडवेकरांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न करून स्वतःचे हात पोळून घेऊ नयेत . महाराष्ट्रातील माध्यमं असा कोणताही प्रयत्न खपवून घेणार नाहीत आणि तो यशस्वी होऊ देणार नाहीत हे त्यांनी लक्षात असू द्यावं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here