ह.मो.मराठे याचं निधन

0
1090

परवा ज्येष्ठ पत्रकार,साहित्यिक अरूण साधू गेले,काल जळगावचे ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट गेले आज सकाळी सकाळी ह.मो.मराठे गेल्याची बातमी अंगावर धडकली.या तिघांनीही मराठी पत्रकारितेला नवे आयाम मिळवून दिले.ह.मो.मराठे लोकप्रभाचे संपादक असताना ते लोकप्रभाचा खप विक्रमी झाला होता.वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी लोकप्रभाची लोकप्रियता वाढविली होती.नंतर राजकारण झाले.त्यांना बाहेर पडावे लागले.नवशक्ती,पुढारी अशा अन्य काही दैनिकातही त्यांनी संपादक म्हणून काम केले होते.पत्रकार आणि साहित्यिक अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पार पाडणार्‍या,आणि दोन्ही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या ह.मो.चं जाणं नक्कीच चटका लावणारे आहे.

प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी ७७ व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सकाळी ९ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

ह. मो. मराठे यांची ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. ही त्यांची पहिली कादंबरी होती. मराठे यांनी किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. याशिवाय लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा नियतकालिकांमध्येही त्यांनी लिखाण केले. कथा, कादंबऱ्यांमधील उपरोधिक, विडंबनात्मक लेखनासाठी ते ओळखले जातात.

ह. मो. मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला. हमो या टोपणनावाने ते साहित्यिक विश्वात ओळखले जातात. हमोंनी सुरुवातीच्या काळात कोल्हापूरच्या महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. त्यानंतप ते पुढे वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात स्थिरावले. १९५६ मध्ये साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात त्यांची नाटिका प्रसिद्ध झाली. हे त्यांचे पहिले साहित्य होते. मात्र साधना साहित्यिकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने त्यांना खरी प्रसिद्ध मिळाली. १९७२ मध्ये ही कादंबरी पुस्तकरुपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातदेखील आहे.

 ह.मो. मराठेंची ‘काळेशार पाणी’ ही कादंबरी आधी ‘साधना’मध्ये आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ‘काळेशार पाणी’मधील काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत असा आरोप त्यावेळी झाला होता. ना. सी. फडके यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. या कादंबरीमुळे वाचकांमध्ये दोन तट पडले. त्यावेळी तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि ज्येष्ठांचा गट त्यांच्या विरोधात होता. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. साधनाचे विश्वस्त एस. एम. जोशी यांनी १९७३च्या सुमारास, कादंबरीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला लढवणार असल्याचे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात ‘पुलोद’ सरकार आल्यावर त्यांनी ‘काळेशार पाणी’ विरोधातील खटला मागे घेतला. दोन वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं आणि प्रेक्षक-समीक्षकांची दाद मिळवलेलं ‘दोन स्पेशल’ हे नाटक हमोंच्याच ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर आधारित आहे.

१९७०च्या सुमारास ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ आणि ‘काळेशार पाणी’ या दोन लघु कादंबऱ्यांमुळे लेखक म्हणून वाचकांसमोर आलेले ह. मो. मराठे बघता-बघता वाचकांचे लाडके ‘हमो’ होऊन गेले होते. आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अत्यंत साध्या-सोप्या शैलीत त्यांनी महानगरातील औद्योगिक जीवन रेखाटलं, त्यावर मार्मिक भाष्य केलं.

पाच वर्षांपूर्वी चिपळूणला झालेल्या ८६व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ह मो मराठे यांनी अर्ज भरला होता. त्यावेळी एका जुन्या लेखामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अध्यक्षपदासाठी प्रचार करताना दोन जातींमध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे लेखन केल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या आरोपावरून मराठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यानंतर हमोंनी आपली भूमिका स्पष्ट करत अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.

‘माझी एकूण भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची किंवा चातुर्वण्याची तरफदारी करण्याची नाहीच नाही, इतर जातींच्या विरोधातही नाही. हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा, सांस्कृतिक परंपरा असलेल्या संमिश्र भारतीय समाजात जातीजातींत निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे, तरच भारतीय समाज एकसंध राहू शकेल अशी माझी भूमिका आहे’, असं निवेदन त्यांनी केलं होतं

मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे ह.मों.ना विनम्र श्रध्दांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here