सीरियातील विध्वंसक घटनेचे बातमी वाचताना एका वृत्त वाहिनीची अँकर भावनिक झाली. रक्तबंबाळ चिमुकल्याला पाहून तिच्या डोळ्यातून आपसूक आश्रू आले. सीरियातील अलेप्पो शहरात झालेल्या हवाई हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या ओम्रान दक्नीश या ५ वर्षाच्या मुलाचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर जगभर खळबळ उडाली होती.
युद्धग्रस्त सीरियाचा भयानक चेहरा म्हणून समोर आलेल्या ओम्रान दक्नीशची बातमी वाचताना ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीची अँकर केट बोल्डुआनला स्वतःच्या भावना रोखता आल्या नाहीत. ती इतकी गहिवरली की आवाज जड झाला आणि शब्द फुटेनासे झाले. पुन्हा बातम्या वाचण्यासाठी काही वेळ घ्यावा लागला. केटचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘सीएनएन’ने फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर २४ तासात तो एक कोटी २० लाख वेळा पाहिला गेला.
“सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाचे नाव ओम्रान आहे”, हे वाक्य बोलल्यानंतर केटचा आवाज जड झाला. त्यानंतर काही क्षण केट थांबली. स्वतःचा आवाज सामान्य करण्यासाठी तिने काही वेळ घेतला. आणि पुन्हा बातमी वाचण्यास सुरुवात केली. केटने जेव्हा ओम्रान आणि त्याच्या कुटुंबाबद्दल सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा ओम्रानला वाचवण्यात आलेल्या घटनेचा व्हिडिओ दाखवण्यात आला. मात्र तेव्हाही केटचा आवाज जडच होता. बातमी वाचताना केट आश्रू आवरण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवत होते.
सीरियातील ज्या इमारतीवर हवाई हल्ले करण्यात आले. त्यातून केवळ ओम्रान एकटा वाचला. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीरियातील शहरांवर बुधवारी हवाई हल्ले करण्यात आले. त्यानंतर बचाव पथकाने ओम्रानला वाचवले. एका मोठ्या हल्ल्यामधून वाचल्यानंतर ओम्रान रुग्णवाहिकेमधील खुर्चीवर शांतपणे बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्या संपूर्ण शरीरावर धुळ होती आणि चेहऱ्यावर रक्त पसरले होते.
‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तानुसार सीरियातील हजारो मुळे देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या ५ वर्षात केवळ अलेप्पो शहरात ४ हजार ५०० मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे
मटा ऑनलाइन वृत्त ।