पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न तालुका पत्रकार संघांपैकी जुन्नार तालुका पत्रकार संघ एक क्रियाशील,परस्पर विश्वास आणि एकोपा असलेला आणि उपक्रमशीलता जोपासणारा तालुका पत्रकार संघ म्हणून ओळखला जातो.या संघाचे एक प्रतिनिधी दत्ता म्हसकर हे जिल्हा संघावर बिनविरोध निवडून आले यावरून या संघाच्या एकीची कल्पना येऊ शकते.अशा या पत्रकार संघानं काल माझा आणि जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी अध्यक्ष कृष्णकांत कोबल,कार्याध्यक्ष सुनील लोणकर,उपाध्यक्ष मार्तंड शेलार,सरचिटणीस दत्ताजी म्हसकर आणि कोषाध्यक्ष गणेश सातव यांचा सत्कार केला.यावेळी परिषदेचे विभागीय सचिव शरद पाबळे,माजी विभागीय सचिव डी.के.वळसे पाटील,जिल्हा संघाच्या माजी कोषाध्यक्षा वनिता कोरेही उपस्थित होते.
अत्ंयत आटोपशीर,देखणा असा हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमात प्रेम,आपुलकी,जिव्हाळा दिसत होता.कार्यक्रमास उपस्थिती देखील छान होती.नारायणगाव येथे पार पडलेल्या या सोहळ्यास गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती देखील मोठी होती.अनेकदा असं होतं की,आपले प्रश्न,आपली दुःख,आपल्या वेदना आपण आपल्या लोकांजवळच व्यक्त करतो.त्या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजासमोरही मांडण्याची गरज आहे.कारण पत्रकाराचे काही प्रश्न आहेत किंवा असू शकतात हे समाज आजही मान्य करायलाच तयार नाही.अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं ते लोकांपर्यंत जावू शकतील.सर्वच तालुका आणि जिल्हा संघानी याचा विचार करून आपल्या कार्यक्रमांना पत्रकारांखेरीज वेगवेगळ्या समाज घटकांना बोलावलं पाहिजे.त्यादृष्टीनं जुन्नर पत्रकार संघाचा प्रयत्न स्वागतार्ह वाटला.
.तालुका पत्रकार संघाचं आणखी एका गोष्टीसाठी कौतूक केलं पाहिजे.त्यांनी पाच ज्येष्ठ पत्रकारांचाही सन्मान केला.त्यात भरत अवचट,रामनाथ मेहेर,रवींद्र पाटे,सुऱेश भुजबळ,आणि आनंद कांबळे यांचा समावेश होता.या सर्वच मान्यवर पत्रकारांचं जुन्नर आणि परिसराच्या विकासात मोठं योगदान आहे.अत्यंत कठीण परिस्थितीत पत्रकारिता करून या मंडळींनी आपल्या भागाचे विविध प्रश्न वेशिवर टांगले,ते सोडविलेही.स्वाभिमानी आणि निर्भिड पत्रकारिता करून त्यांनी या भागात पत्रकारितेला नवे आयाम मिळवून दिले.त्यांच्या या कार्याचं विस्मरण हा कृतघ्नपणा ठरला असता.परंतू ती चूक जुन्नर पत्रकार संघानं होऊ दिली नाही. सरकार भलेही जेष्ठांना पेन्शन द्यायला टाळाटाळ करीत असेल पण आम्ही आमच्या ज्येष्ठ मान्यवर पत्रकारांची उपेक्षा करीत नाही ही गोष्ट या सन्मानाच्या निमित्तानं अधोरेखीत झाली.सत्काराला उत्तर देताना आनंद कांबळे यांनी हल्लीच्या पत्रकारितेबद्दल काही भावना व्यक्त केल्या.मला वाटतं दोन पिढीतली ही वैचारिक दरी आहे.सारा समाजच बदलला असेल तर पत्रकारिता त्याला अपवाद असणार नाही.परिस्थिती ज्येष्ठांना चिंता वाटावी अशी असली तरी सारं काही संपलेलं नाही.निष्ठेनं,सतीचं वाण समजून पत्रकारिता करणारे आजही असंख्य पत्रकार आहेत म्हणून तर आजही पत्रकारितेचा दबदबा कायम आहे.ज्येष्ठांना खंत करण्याची वेळ येणार नाही असं परिवर्तन हाच तर मराठी पत्रकार परिषदेचा प्रयत्न आहे आणि त्याला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
थोडयात कार्यक्रम छान झाला.आमचा सत्कार केल्याबद्दल अध्यक्ष नितीन ससाणे,उपाध्यक्ष रामनाथ मेहेर,उपाध्यक्ष अर्जुन शिंदे,कार्याध्यक्ष लक्ष्मण शेरकर,आणि सचिव सचिन कांकरिया तसेच जिल्हा संघाचे सरचिटणीस दत्ताजी म्हसकर आणि जुन्नर तालुका पत्रकार संघाच्या तमाम सदस्यांना मनापासून धन्यवाद.(SM )